Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

LIVE : देशदूत संवाद कट्टा : गडकिल्ले, मोहिमा, काळजी आणि समस्या

Share

नाशिक | प्रतिनिधी

सहभाग : सुधीर सावंत, संध्या बस्ते, दीपक पवार,  सुदर्शन कुलथे, सुषमा मराठे, मयुरी कुलकर्णी 

नंदुरबारपासून केरळपर्यंत पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सर्वाधिक किल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहेत. राज्यात असलेल्या गडकिल्ल्यांमध्ये 20 टक्के एवढा मोठा वारसा हा आपल्या जिल्ह्याच्या वाट्याला आलेला आहे. या गडकिल्ल्यांमध्येच आपल्या समाज परंंपरांचे मूळ दडलेले आहे.

आपण आपल्या परंपरा व इतिहास स्थळावर पर्यटन करताना त्यांचे संवर्धन व जतन करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरातून होणे गरजेचे असल्याचा सूर ‘देशदूत’च्या संवाद कट्यातून प्राकर्षाने पुढे आला. ही केवळ दुर्गप्रेमींची जबाबदारी नसून हे प्रत्येक पर्यटकाचे आद्य कर्तव्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

‘देशदूत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गडकिल्ले आपला इतिहास’ या विषयावरील संवाद कट्टा उपक्रमात मान्यवरांनी सहभाग घेत आपले विचार प्रगट केले. त्यात प्रामुख्याने संशोधक ट्रॅकर्स म्हणून लौकिक असलेले सुदर्शन कुलथे, ट्रॅकर्स कट्टाचे ज्येष्ठ सदस्य दीपक पवार, वैनतेयच्या संध्या बस्ते, साहस कॅम्प्सच्या सुषमा मराठे, गेटआऊट आऊटडोअर्स ग्रुपच्या मयुरी कुलकर्णी, संडे ट्रॅकर्सचे अ‍ॅड. सुधीर सावंत, ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यटनाला येणार्‍या हौशी लोकांच्या बेजबाबदार वागण्यातून पर्यटनस्थळांवर घाण वाढत आहे. अनेकवेळा लोक तोफांवर बसून फोटो काढताना दिसून येत आहेत. हा आपला वारसा आहे. याचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांच्यात बाणावण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

हल्ली गडकिल्ले, दुर्ग पाहण्यासाठी येणार्‍या तरुणांची संख्या वाढली आहे. मात्र त्याचवेळी यांच्या किल्ल्यांबद्दलच्या अज्ञानाचेही दर्शन होते. त्यांना त्या ठिकाणच्या वस्तूंचे महत्त्व व किल्ल्याचे महत्त्वाने स्थान माहीत होणे गरजेचे आहे. येणारा तरुणवर्ग केवळ मौजमजेसाठी येतो. अशावेळेस कचरा वाढत जातो. प्रत्येकाने आपल्यासोबतचे साहित्य किल्ल्यावर न फेकता खाली आणून व्यवस्थित कचराकुंडीत टाकल्यास गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे शक्य होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

गडकिल्ल्यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. त्यामुळे काही अंशाने किल्ल्यावरील स्वच्छतेबाबत येणार्‍या पर्यटकांना आपणच जागरुक केल्यास गहकिल्ले स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.

– मयुरी कुलकर्णी

पर्यटनाला जाताना प्रत्येकवेळी आपण सोबतच राहू याची शाश्वती नाही. कदाचित चुकामूक झाल्यास आपल्यासोबत सुरक्षिततेची साधने व खानपानाची जुजबी व्यवस्था बॅगेत ठेवणे गरजेचे आहे. सोबतच आधारकार्ड ठेवणे आवश्यक आहे.

– दीपक पवार

गडकिल्ले हे आपले पुरातन संंचीत आहे. त्यांचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. चांगल्या ग्रुप्समुळे गडकिल्ल्यांच्या संगोपन करण्यास मदत होते. सहज मिळू लागलेल्या गोष्टींमुळे काही लोकांना त्यांची किंमत कळत नाही. जनजागृतीची गरज आहे.

– संध्या बस्ते

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना योग्य साधनांचा वापर करावा. पायातील शूज ट्रेकिंगच्या योग्य असणे गरजेचे आहे. काठी, अत्यावश्यक मदत संपर्क, स्वत:चा रिझर्व्ह फूड व पाणी, संपूर्ण शरीर झाकणारे कपडे जेणेकरुन किडे चावण्याची भीती कमी राहील.

– अ‍ॅड सुधीर सावंत

आपल्या स्वत:च्या क्षमतांची ओळख प्रत्येकाने ठेवावी. उगाचच लोक काय म्हणतील? मागे कसा फिरू? या भावना बाजूला ठेवून केव्हाही गिव्हअप करून माघारी फिरण्याची तयारी ठेवा. उगाच नवीन त्रास निर्माण होईल

– सुषमा मराठे

1100 ते 1200 किलोमीटरच्या सह्याद्री रांगा थेट केरळच्या स्वामी विवेकानंद शिळेपर्यंत पसरलेल्या आहेत. त्यातील मुख्य व उपरांगा नाशिक जिल्ह्यात जास्त, राज्यात सह्याद्री रांगेवर 350 च्या जवळपास किल्ले. त्यातील 64 किल्ले हे नाशिक जिल्ह्यात आहेत. राज्यातील सर्वात उंच कळसूबाई, साल्हेर हे किल्ले नाशिकला आहेत. यांचा आदर आपण राखला पाहिजे.

– सुदर्शन कुलथे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!