Video: देशदूत संवाद कट्टा : चित्रपट अभिनय ते निर्मितीक्षेत्रात नाशिककर पुढे

jalgaon-digital
3 Min Read

‘देशदूत संवाद कट्टा उपक्रमात फिल्ममेकिंग क्षेत्रातील मान्यवरांचा विश्वास’

नाशिक । प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची कर्मभूमी म्हणून नाशिकचे महत्व वादातीत आहे. असे असले तरी चित्रपटनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई-कोल्हापूरसारख्या सुविधा नाशिकमध्ये पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. मात्र तरी देखील उपलब्ध साधनांचा आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत नाशिकचे असंख्य चेहरे अभिनयापासून ते निर्मितीच्या क्षेत्रात पुढे जात असल्याचा विश्वास चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी व्यक्त केला. नाशिकच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रातील याच वाटचालीचा आढावा दै. देशदूतच्या शनिवार संवाद कट्टा या उपक्रमात घेण्यात आला.

चित्रपट निर्मिती हे खरे तर अतिशय संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात करियरच्या असंख्य असून तुमच्याकडे काम करण्याची जिद्द आणि आवश्यक तांत्रिक बारकावे असतील तर यश नक्कीच मिळते. आज निर्मिती क्षेत्राचा विचार केल्यास चित्रपट, जाहीरात, टीव्ही सिरियल्स आणि अलीकडेच यु ट्यूबसारख्या समाजामाध्यमावरून सर्वाधिक पहिल्या जाणार्‍या वेबसिरीजमध्ये असंख्य संधी आहेत. तुमच्याकडे योग्य कथा असली कि अनेक गोष्टी सोप्या होतात.

या कथेची मांडणी करण्याची जाण असणे मात्र त्यासाठी आवश्यक असल्याचा सूर या संवाद कट्टयाच्या माध्यमातून उमटला. कथेचे ट्रेण्ड बदलत असून पारंपरिक त्याच-त्याच चेहर्‍यांना प्रेक्षक कंटाळले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षेनुरूप बदल निर्मिती क्षेत्रात देखील जाणवायला लागले असून चित्रपट, मालिका, वेबसिरीज बनवताना त्याबद्दल अधिक काळजी घेतली जाऊ लागली आहे. हा एकूणच निर्मितीक्षेत्राचा आश्वासक परिणाम म्हणावा लागेल.

या क्षेत्रात काम कताना तुमचे शिक्षण नाही तर कामाची आवड महत्वाची मानली जाते. सिनेमा बनताना टीमवर्क महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्टींची तांत्रिक माहिती असणारी माणसे सोबत असली तर प्रवास अधिकच सोपा होतो. निर्मात्याला प्रत्येक गोष्टीतले जुजबी ज्ञान हवेयाकडे चर्चे दरम्यान लक्ष वेधण्यात आले.

कलावंत म्हणून या क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाने अगोदर स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात. आपला परफॉम उत्तम कसा राहिल याची काळजी घेतली तर काम करताना परिस्थितीला अनुसरून बदल करता येतात या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांना या क्षेत्रात मोठी संधी असून पडद्यासमोर आणि पडद्यामागे देखील काम करण्याची तयारी असेल तर तुमच्या परिश्रमाचे नक्कीच चीज होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निषाद वाघ, रणजित गाडगीळ, अतुल शिरसाठ यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला. देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सूत्रसंचालन केले.

वेबसिरीजमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य

आपल्याकडे नाटक, सिनेमा, टीव्ही मालिकांवर सेन्सॉरशिप आहे. सेन्सॉरच्या हस्तक्षेपाशिवाय नाटक , सिनेमाचे सादरीकरण होऊ शकत नाही. मात्र अलीकडे मोठ्या प्रमाणात येणार्‍या वेब सिरीज ला मात्र असे बंधन नसल्याने अधिक मोकळेपणाने व प्रभावीपणेविषय मांडणी करता येते. वेब सीरिजच्या माध्यमातून कलाकार आणि निर्मात्याला स्वतःचे वेगळेपण सिद्ध करण्याची संधी आहे ही बाब देशदूत कट्ट्यावर अधोरेखित करण्यात आली.

लघुचित्रपट निर्मितीला व्यासपीठ देणार

देशदूत येत्या काळात जिल्हयातील हौशी आणि व्यावसायिक निर्मात्यांसाठी विशेष स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेदरम्यान चित्रपट निर्मितीशी संबंधित संस्था आणि तज्ञाचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे. चित्रपट निर्मितीतले असंख्य बारकावे या निमित्ताने शिकायला आणि अनुभवायला मिळतील असा विश्वास डॉ. बालाजीवाले यांनी व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *