सातारा परिसरात साकारले आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासना गृह

आज सरस्वती पूजन
सातारा परिसरात साकारले आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासना गृह

औरंगाबाद- Aurangabad

माता सरस्वतीच्या उपासकांसाठी औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात कवी व गीतकार श्याम खांबेकर यांच्या संकल्पनेतून आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासनागृह साकारण्यात आले आहे. कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व कलाकारांसाठी हे हक्काचे व्यासपीठ ठरत असून वर्षभर कलेच्या प्रांगणातील उपक्रमांची येथे रेलचेल असते. नवरात्री (Navratri) आणि वसंत पंचमीला  तर येथे उत्साहाला उधाण येते. मंगळवारी सरस्वती पूजनानिमित्त येथेयाठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हरहुन्नरी कलाकार श्याम खांबेकर यांनी सातारा परिसरातील खंडोबा मंदिर रस्त्यावर मार्तंडनगरमध्ये आद्य आद्येश्वरी सरस्वती (Adya Adyeshwari Saraswati) उपासना गृह साकारले आहे. खांबेकर देशातील सरस्वतीचे एकमेव मंदिर असणाऱ्या तेलंगाणातील बासर येथील सरस्वती देवीचे उपासक आहेत. गेली ४० वर्षे ते नित्यनियमाने बासरला जातात. दूरचे अंतर असल्याने बासरला जाताना भाविकांची अडचण होते. ही बाब लक्षात घेऊन खांबेकर यांनी त्यांच्या सातारा परिसरातील जागेवर आद्य आद्येश्वरी सरस्वती (Adya Adyeshwari Saraswati) उपासनागृह साकारले आहे. २०१७ च्या सरस्वती देवीच्या जन्मदिनी म्हणजेच वसंत पंचमीला उपासना गृह भाविकांसाठी खुले झाले.

मकराना येथून आणली मूर्ती

उपासना गृहात सरस्वती मातेची रेखीव संगमरवरी मूर्ती आहे. ही मूर्ती त्यांनी खास राजस्थानच्या मकराना येथून तयार करून घेतली आहे. राजस्थानच्या कलाकारांनी उपासना गृहात मूर्तीची स्थापना केली. देवीचे आकर्षक रूप डोळ्यात भरते. २०१७ ला वसंत पंचमीला मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी बासर येथील संत-महंतांची उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यासपीठ

श्याम खांबेकर म्हणाले, हे पारंपरिक मंदिर नसून उपासना गृह आहे. सरस्वती उपासकांना एका व्यासपीठावर आणणारे एक व्यासपीठ आहे. येथे एका वेळी १०० लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. गायक, संगीतकार, चित्रकार, नर्तक, शिल्पकार अशा सर्वच कलाकारांना आपल्या कला सादर करण्यासाठी येथे मुक्त प्रवेश आहे. त्यांच्यासाठी वर्षभर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. योगासने, छंदवर्ग, उन्हाळी शिबिरे असे कार्यक्रम सुरू असतात.

वसंत पंचमीला देवीचा उत्सव

सरस्वतीचा जन्मदिन वसंत पंचमीला दरवर्षी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. आतापर्यंत सूर्यकांत शेजूळ, अभय, अर्पिता आणि अथर्व कुलकर्णी, शरद दांडगे, राजेश सरकटे, आरती पाटणकर, विनोद वैष्णव, बाबूराव दुधगावकर, नांदेडचे डॉ. नंदकुमार देशपांडे, नाशिकच्या जुई खांबेकर, अमरावतीचे सुरेश दंडे, अनुजा धोत्रे, सुरेश विधाते, सुरेश आणि कृष्णकुमार, स्नेहा राऊत, निकिता चव्हाण यांनी देवीच्या चरणी आपली कला सादर केली आहे.

अक्षर लेखनाचे संस्कार

बासरला देवीच्या मंदिरात चिमुकल्यांवर अक्षर संस्कार म्हणणजेच पाटी-पेन्सील पूजन केले जातात. आद्येश्वरी उपासना गृहातही याची सोय असल्याचे खांबेकर म्हणाले.

उपासकांचे व्यासपीठ

तेलंगानातील बासर येथे माता सरस्वतीचे एकमेव मंदिर आहे. मात्र, भाविकांना तेथे जाण्यात अडचण येते. वेळ आणि श्रम जातात. ही अडचण दूर करण्यासाठी आपल्या शहरात सरस्वती उपासनागृह साकारले आहे. कलेच्या उपासकांसाठी हे सदैव खुले आहे.

- श्याम खांबेकर, संस्थापक,

आद्य आद्येश्वरी सरस्वती उपासना गृृह, सातारा, औरंगाबाद

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com