Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

जबाबदाऱ्या वाहताना स्वतःसाठी देखील जगा; नवदुर्गा उपक्रमात आर्किटेक्ट ग्रुपचे महिलांना आवाहन

Share
नाशिक । प्रतिनिधी
महिलांमध्ये कलाकौशल्ये आत्मसात करण्याची जाण उपजतच असते. आज प्रत्येक क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत असताना, घराच्या व कुटुंबाच्या जबाबदारीचे ओझे वागवत असताना स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र महिलांना वेळ मिळत नाही. स्वतःचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी असा वेळ काढून प्रत्येकीने काही क्षण तरी स्वतःसाठी जगले पाहीजे असे आवाहन शहरातील प्रतिथयश महिला आर्किटेक्ट ने  देशदूतच्या व्यासपीठावरून केले.
नवरात्रीनिमित्त आज दि.२ आयोजित नवदुर्गा- जागर स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमातून वास्तूविद्याविशारद म्हणून कार्यरत असणाऱ्या व या व्यवसायात यशस्वी म्हणून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिला आणि युवतींना महिलांच्या प्रश्नांवर बोलते करण्यात आले.नवरात्रीच्या चौथ्या माळेला कुष्मांड अर्थात कोहळ्याच्या रूपात देवीची आराधना करण्यात आली. देवीच्या या रूपाबद्दल माहिती सांगतानाच स्त्रीशक्तीचे  आणि कोहळ्यात असणाऱ्या गुणधर्माचे साधर्म्य देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी सांगितले.
देवीच्या रूप विश्वरूप असून शक्तीच्या रूपात तीचे अधिष्ठान आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडित असणारे व्यवसाय प्रामुख्याने पुरुषी वर्चस्वाखाली असल्याचे सांगितले जाते. वास्तुविद्याविशारद किंवा आर्किटेक्चर म्हणून बांधकाम व्यवसायात असणाऱ्या महिलांनी त्या क्षेत्रातील स्पर्धेचा सामना करताना प्रयत्नपूर्वक यश मिळवले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी वाट चोखाळणाऱ्या या महिलांकडून प्रेरणा घेता अनेकजणी नव्याने या व्यवसायात पुढे येत असल्याचे चांगले चित्र नाशिकमध्ये अनुभवायला मिळत असल्याचे नवदुर्गाच्या निमित्ताने समोर आले.

साधारणपणे १२ वर्षांपूर्वी आर्किटेक्ट म्हणून व्यवसायात उतरलेल्या महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. कारण पुरुष प्रधान संस्कृती असल्याने घरबांधणीच्या कामात महिलांचा सल्ला का घ्यावा असा प्रश्न ग्राहकांसमोर असायचा. आता मात्र हे चित्र बदलले असून व्यावसायिक म्हणून असणाऱ्या या महिलांच्या कल्पनाशक्तीचा पुरेपूर लाभ ग्राहकांना मिळू लागला आहे.
त्यामुळेच सर्व प्रकारे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात येणाऱ्या मुलींची संख्या देखील गेल्या पाच वर्षात वाढली आहे. पदवी घेऊन नव्याने व्यवसायात येणाऱ्या तरुणी आता घरच्यांशी मोकळेपणाने बोलून लग्नासाठी घाई नको असते सांगतात व पालक देखील यासाठी विरोध करत नाही जी जमेची बाजू या व्यवसायातील करियरला फायदेशीर असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. रुपाली जायखेडकर, राखी टकले, डॉ. प्राजक्ता बस्ते, ओजश्री सारडा, तेजा पारुंडेकर, अनघा पाटील या चर्चेत सहभागी झाल्या होत्या.
ग्रामीण भागातील परिस्थितीत बदल 
चूल आणि मुल यापलीकडे जाण्यास ग्रामीण भागातील महिलांना अडचणी यायच्या. आता मात्र परिस्थिती बदलली असून ग्रामीण महिला देखील कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून विविध क्षेत्रात खंबीरपणाने उभी राहते आहे. त्यात कुटुंबांचा देखील त्यांना पाठिंबा मिळतो आहे.घराच्या व कुटुंबाच्या उत्कर्षासाठी या महिला घराबाहेर पडू लागल्या असून हा सामाजिक दृष्टया झालेला सकारात्मक बदल आहे. स्वतःसाठी देखील या महिला पुरेसा वेळ देत असून शहरी भागात देखील हाच विचार रुजायला लागला आहे. स्वतःचे छंद, आवडीनिवडी जोपासून कामाच्या दगदगीतून सहज विरंगुळा मिळवता येतो. काही कुटुंबात तर काम करणाऱ्या महिलांना स्वतःसाठी देखील जगा असे सांगण्यात येते मात्र असे स्वातंत्र्य मर्यादित कुटुंबांतील महिला आणि युवतींना आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!