Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video: ‘नार-पार’चे पाणी द्या; दुष्काळ हटवा

Share

वर्षानुवर्षे दुष्काळाच्या वणव्यात होरपळणार्‍या नांदगाव तालुक्यातील पिण्याचा व शेती सिंचनाचा पाणीप्रश्न जटील झाला आहे. तालुक्यात गिरणा, नाग्यासाक्या, माणिकपुंज व दहेगाव ही धरणे उशाला असूनही नांदगावकरांच्या घशाला कोरड पडत आहे. बेरोजगारी, रस्ते, वीज समस्या अजूनही दूर झाली नसल्याचे निराशामय वास्तव येथे दिसते.

रोजगारासाठी येथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी येथे एमआयडीसी, दूध संघ, कारखानदारी वाढण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. नांदगाव मतदारसंघाच्या या मुख्य समस्या सोडण्यासाठी एकत्रित वज्रमूठ बांधण्याची गरज आहे. या मतदारसंघात जनतेच्या प्रमुख मागण्यांपैकी नांदगाव व मनमाडचा पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे. ‘देशदूत मतदार संवाद’ दौर्‍यात येथील समस्यांचा घेतलेला हा आढावा.

शहरासह तालुक्यात बर्‍याच दिवसांपासून दमदार पाऊस पडला नाही. शहरातील व्यवसाय 56 खेड्यांवर अवलंबून आहे, मात्र ‘नार-पार अथवा ‘करंजवण’चे पाणी फिरले तरचं शेती, शेतकरी व व्यापारी सुखी होईल. येथे उद्योग-धंदे, कारखाने यावेत.
– कैलास कासलीवाल, नांदगाव

 तालुक्यात सलग 3-4 वर्षांपासून दुष्काळ पडला आहे. चारा-पाणी तसेच शेती सिंचन समस्या बिकट झाली आहे. पाऊस न पडल्यास भविष्यात अवघड समस्या निर्माण होऊ शकते. नांदगावला गिरणा धरणाचे पाणी स्वतंत्र द्यावे. पूर्वी शहरात पाटचार्‍या होत्या. त्या बुजल्या आहेत.
– सुनील भाबड, नांदगाव

 मनमाड येथील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यास ठोस उपाययोजना कराव्या. तीन वर्षांपासून दमदार पाऊस पडला नाही. गेल्यावर्षी दुष्काळ पाहावा लागला. खरीप, रब्बी पीक हातून गेले. आता रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई झाली असून चढ्या दराने विक्री होत आहे. शहरात अजूनही पाणीटंचाई असून रस्त्यांची चाळण झाली आहे.
– बाळाकृष्ण मिसर, मनमाड

यंदा पाऊस उशिरा पडला. मका बियाणे बोगस निघाले. फवारणी करूनही लष्करी अळी नियंत्रणात येत नाही. शासन, प्रशासन व बियाणे कंपन्यांचे साटेलोटे असल्याने यंदा अयोग्य बियाणे बाजारात आले. लष्करी अळीचा प्रादुर्भाव जात नाही. दुष्काळी पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी. शेतकरी हवालदिल झाला आहे.
– पोपट पाटील, नांदगाव

तब्बल पन्नास वर्षांपासून येथील पाणीप्रश्न गंभीर आहे. पाऊस न पडल्याने येथील प्रगती खुंटली आहे. तालुक्यात चार धरणे असूनही योग्य नियोजनाअभावी पाणीप्रश्न सुटत नाही. गिरणा, माणिकपुंज, नाग्या- साक्या व दहेगाव धरणांत 10 वर्षांपासून पाणी नाही. ‘नार-पार’ पाणीप्रश्न सुटावा. येथील सर्व व्यवहार पाण्याअभावी पिछाडीवर गेले आहेत.
– रमणलाल लोढा, नांदगाव

नांदगाव शहरात 10 -12 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. महिलांवर पाणीबचतीचे संकट येते. यामुळे पाणी काटकसरीने वापरावे लागते. येथे मोठी धरणे आहेत, मात्र त्यांचा उपयोग दुसर्‍याच तालुक्याला होतो. शेजारच्या तालुक्यात दोन- चार दिवसांत पाणीपुरवठा होतो. धरण आमच्याकडे फायदा मात्र दुसरीकडे, अशी दयनीय अवस्था आहे. येथील पाणीप्रश्न लवकर सुटावा. वीजपुरवठा खंडित होतो. रस्ते खराब झाले आहेत.
– लक्ष्मीबाई अमर जाधव, नांदगाव

नांदगाव तालुक्याची पाणी समस्या गंभीर आहे. यावर उपाययोजना मात्र होत नाही. पिण्यास पाणी मिळत नाही, शेती सिंचन समस्या वेगळीच. पाणी नसल्याने शहर व तालुक्याचा विकास खुंटला आहे. सुवर्ण व्यवसायात सध्या तेजी आहे. दुष्काळामुळे ग्राहकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने या व्यवसायावर परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी शासन-प्रशासनाने पुढे यावे, ही अपेक्षा.
– किशोर बाविस्कर, नांदगाव

मनमाड शहरात वर्षानुवर्षे पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. रस्ते, वीज, गटार, स्वच्छता या समस्या जैसे थे असल्याने त्या सुटण्याची गरज आहे. पावसानंतर शहरासह परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून ‘केसावर फुगे’सारखी अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
– प्रकाश बोधक, मनमाड

मनमाड शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने पायी चालणेही अवघड होत आहे. खड्ड्यांतून दुचाकी चालवताना पाणी अंगावर उडाल्याने नाहक वाद निर्माण होतात. शहरातील पाणीप्रश्न गंभीर असल्याने तो लवकर सुटावा ही अपेक्षा!
– नितीन परदेशी, मनमाड

तब्बल सव्वा ते दीड लाख लोकसंख्येचे मनमाड शहर आहे. येथे रेल्वेचे जंक्शन असूनही अपेक्षित विकास झाला नाही. पाण्याअभावी उद्योग-धंदे ठप्प आहेत. शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. शहर मोठे असल्याने तालुका व्हावा. सर्व सुविधांयुक्त रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा आहे.                                                                                                                                                                        -संदीप सानप, मनमाड

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!