Type to search

काव्य कट्टा

देशदूत काव्य कट्टा : अप्रूप

Share

झाडांस सावलीचे अप्रूप वाटते ना
हरणास कस्तुरीचा अभिमान होत नाही।
उद्दामते नदी ना फेसाळत्या प्रवाहे
मोरास रूप आहे गुणगान गात नाही।

चंद्रास शांततेचे मिळते ना पारितोषिक
सूर्यास शोभणारे कौतूक होत नाही।
ताऱ्यांस होत नाही बाधा कधी अहंची
वाऱ्यास मात आला मज ऐकिवात नाही।

धरती मुकी मुकी अन आभाळ शांत आहे।
कोकीळ ही बिचारा ताठ्यात गात नाही।
आभार रे समुद्रा तू संयमीत आहे
जो रौद्र एरवी पण उन्मत्त होत नाही।

ते पाखरू खुशीने उडते नभांगणी पण
गाठून उंच जागा मदमस्त होत नाही।
मातीच माणसाचे अंतिम सत्य तरीही
जाणून अज्ञ काही नतमस्त होत नाही

हे वस्त्र जीवनाचे भासेल भरजरी पण
अक्षय्य शाश्वतीचा त्याचाही पोत नाही।
भंगूर जीवनाचे क्षण फ़ार फार थोडे
तव माणसांत अजुनि गणना ही होत नाही।

  • जयश्री वाघ
    नाशिक
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!