Type to search

maharashtra कृषिदूत जळगाव

जमीन श्रीमंत होईल तेव्हाच शेतकरी श्रीमंत होईल

Share

जळगाव  – 

शेतीच्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे मूळ उत्पन्नाचा भाग कमी होऊ लागला आहे. कोणत्याही पट्ट्यात कोणतीही पिके येऊ लागल्याने जमिनीची सुपीकताही कमी होऊ लागली असून जमीन श्रीमंत होईल तेव्हाच शेतकरी श्रीमंत होईल असा सूर ‘देशदूत’तर्फे आयोजित संवाद कट्ट्यावर उमटला.

शुक्रवारी आयोजित या कट्ट्यावर ‘वातावरणातील बदलाचे शेतीवर होणारे परिणाम’ या विषयावर सहाय्यक कृषी अधिकारी अनिल भोकरे, भारत कृषक समाजाचे सचिव वसंतराव महाजन, प्रयोगशील शेतकरी तथा मुक्त पत्रकार चिंतामण पाटील हे सहभागी झाले होते. सर्वांचे स्वागत संपादक अनिल पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना अनिल भोकरे म्हणाले की, सकाळी थंडी दुपारी ऊन या वातावरणाचा शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. बदलत्या वातावरणामुळे यंदाचा हंगाम जवळपास दीड महिना पुढे गेला आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे उत्पादन आणि उत्पादकतेवरदेखील परिणाम झाला आहे.

पिकांची वाढ न होणे, अधिकची वाढ होणे असे प्रकार अलीकडे जाणवू लागले आहेत. पिकांवर कधीही न दिसणारे रोग, अळ्या अलीकडे आढळून येऊ लागल्या आहेत. हवामानाच्या बदलांमुळे अळींचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गहू, मका, हरभरा कोणतेही पीक रोगांच्या प्रादुर्भावापासून सुटलेले नाही; असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत कृषक समाजाचे सचिव वसंतराव महाजन म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे केळीच्या प्रतिवर मोठ्या परिणाम होतो आहे. हंगाम पुढे ढकलला जात आहे. अधिकच्या थंडीमुळे केळीच्या विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. ज्या भागात जे पिकतेच त्याचा शालेय पोषण आहारात समावेश केल्यास त्या पिकालादेखील चांगले दिवस येतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

उत्पन्न वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला मात्र, त्यातून जमिनीचा पोत खराब होवून उत्पन्नांवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनाचा भाग कमी होवू लागला आहे. जमीन श्रीमंत होईल तेव्हाच माणूस श्रीमंत होईल असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रयोगशिल शेतकरी चिंतामणी पाटील म्हणाले की, मक्यावर यंदा रोगांचे मोठे आक्रमण झाले आहे. तीन वेळा फवारणी करुनदेखील 75 टक्के उत्पादन घटले आहे. कापसावर बोंड अळीचा प्रार्दुंभाव आहे. या बदलत्या हवामानामुळे पर्यांयी पिकेदेखील धोक्यात आली आहेत. नेमके काय करावे याबाबत शेतकर्यांना निर्णय घेता येत नाही.

गहु पेरणीचा कालावधी संपल्यानंतरही गव्हाची पेरणी सुरु आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात उत्पन्नाची कोणतीही श्वाश्वती राहिलेली नाही. संशोधनालाही आव्हान देईल असे सध्याचे वातावरण आहे. मात्र अशा बदलत्या परिस्थितीत बदलती पीकपध्दती अंगीकारणे हाच उत्तम पर्याय आहे. असेही त्यांनी सांगितले.

उन्हाळी मुग,भुईमुग यासारख्या पिकांचे क्षेत्र वाढत आहे. हवामान बदलानुसार कमी कालावधीत येणारी पीक घेण्यावर भर दिला पाहिजे. असे मार्गदर्शन श्री. भोकरे यांनी केले. तर केळी पट्ट्यात सुरु झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या सत्रावर महाजन यांनी चिंता व्यक्त केली. एकुण क्षेत्रापैकी 30 टक्के फळबागेची लागवड केली तर शेतकरी तग धरु शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!