निफाड (नाशिक) l ऍड. योगिता जाधव-शिंदे (विधी) : अजूनही चालतेच वाट संघर्षाची…

0

आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट

माझा संघर्ष महिलांवर अन्याय करणार्‍यांबरोबर आहेच; पण स्वतःशीही आहे. ग्रामीण भागातल्या अत्यंत पुरोगामी घरातली मुलगी वकील होते; पण तिला माहीतही नसतं की आपण इतरांबरोबरच स्वतःशीच लढाई लढणार असतो. महिलांच्या बाजू ऐकून घेताना, त्यांच्या यातना पाहताना आपण आपलंच प्रतिबिंब पाहत आहोत की काय, असं मनाला स्पर्शून जातं. ग्रामीण भागात अजूनही चाकोरीबाहेरची वाट चोखाळणे एका महिलेला अग्निदिव्य केल्यासारखेच आहे.

चार बुकं शिकली म्हणजे शहाणी झाली काय किंवा घरचे काम करायचे सोडून बाहेरची प्रकरणे सोडवायला जाते, हा सामाजिक दृष्टिकोन आणि त्याच्या दूषित नजरा अजूनही वेगळे काही करणार्‍या स्त्रीला छळतात. जग इतके पुढे गेलेय, महिला इतक्या क्षेत्रात आपले कौशल्य दाखवताहेत, पण सर्वसामान्यपणे आपण नागरिक म्हणून तिला समानतेचं स्थान कधी देणार, तिचा आदर कधी करणार, हा महत्त्वाचा प्रश्न मला वकील म्हणून काम करताना भेडसावतोच.

निफाड न्यायालयात मी गेली दहा वर्षं वकिली करते आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातले कुंभारी आमचं गाव. बीएएमएस असलेल्या वडिलांची प्रॅक्टिस नांदुर्डीला होती. आम्ही पाच बहिणींमध्ये माझा क्रमांक तिसरा. सहावा भाऊ. खेडेगावातलं माझे घर असले तरी आमच्या घरात कुणीही आम्ही मुली म्हणून कमी लेखले नाही, की, उजवायची घाई केली नाही. आई-वडीलच काय, आजोबांचे विचारही मुलींच्या शिक्षणाला पूरक होते. आमचे घर खेडेगावतलं असून खर्‍या अर्थाने पुढारलेले होते. आई शिलाईची कामे करायची आणि स्वतःचा खर्च कमी करून पुस्तकांना पैसे द्यायची. आई-वडील मुलांबरोबरच मुलींनाही शिकवतात.

पण मुली स्वतःच्या कमाईतले पैसे बर्‍याच वेळा आईवडिलांना देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, पण त्यांना समाधान द्यावं एवढी तरी इच्छा असते. पाचही बहिणींचे शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. मीही राज्यशास्त्र घेऊन बी.ए. झाले. घरातल्या एका तरी मुलीने वकिली करावी अशी वडिलांची इच्छा होती. वकिलीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला; पण एलएलबी व्हायला एक वर्ष असतानाच माझे लग्न प्रशांत शिंदे यांच्याशी झाले. माझे मिस्टर कृषी सल्लागार आहेत.

माझे सासर निफाडमधलेच रवळस गावातले. शेतातच घर आहे. एकत्र कुटुंबातली मी मोठी सून. माझ्या सासर्‍यांनी माझ्या कायद्याच्या शिक्षणाला पूर्ण प्रोत्साहन दिले. आपली सून वकील होणार याचा त्यांना खूप अभिमान होता. मी प्रॅक्टिस करावी अशी त्यांची इच्छा होती. कायद्याचा अभ्यास करत असतानाच माझ्या पोटात अंकुर वाढू लागला होता. त्याच अवस्थेत घरचे सगळे काम आवरून शिकायला नाशिकला जात असे. ग्रामीण भागात साडीव्यतिरिक्त इतर पोशाख घालायचा नाही, असा अलिखित नियमच जणू.

त्यामुळे मी साडी सावरत शेतात घर असल्याने चिखलाची, झुडुपांची वाट तुडवत अंतर्बाह्य संघर्षाचा प्रवास करत रेल्वे स्टेशनवर जात असे आणि तिथून रेल्वेनं प्रवास करून नाशिकच्या विधी महाविद्यालयात जात असे. हा प्रवास आणि शिक्षणाचा संघर्ष त्याकाळी माझ्या पोटातल्या बाळानंही अनुभवला असेल. वकील झाल्यावर मुलगा चैतन्यचाही जन्म झाला. काही कारणाने मी तो तीन वर्षांचा होईपर्यंत प्रॅक्टिसपासून दूर राहिले. सासर्‍यांचे कर्करोगाचे दुखणे आणि त्यांचं अवचित वर्षभरातच जाणे यामुळे मी खचून गेले होते. कारण माझ्यातली बुद्धिमत्ता आणि करिअर करण्याची आस त्यांनी ओळखली होती, असे म्हणावे लागेल. २००३ ला मी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. शेतातल्या मजूर बायांना चहा नेऊन देत असताना त्या विचारायच्या, ताई, तुम्ही एवढ्या शिकलेल्या, मग काम का नाही करत? त्यांच्या या प्रश्नाने मी अंतर्मुख झाले.

तीन वर्षांच्या गॅपनंतर वडिलांनी मला प्रॅक्टिस करायला प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले, तू शिकली आहेस. कायद्याचं ज्ञान तुझ्याकडे आहे. जे काम तुझ्याकडे येईल ते कर. सुरुवातीला मी चांदवड, कोपरगाव न्यायालयात जात असे. जशा केसेस येत गेल्या तशा त्या स्वतंत्रपणे लढवू लागले. निफाड न्यायालयातली मी दुसरी किंवा तिसरी महिला वकील असेन. खेडेगावात लोकांना शंका येई, ही आपली केस कशी लढवेल? पण अनुभवानंतर त्यांचा विश्वास वाढायला लागला. सन २००७ मध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली. रवळसहून निफाडला प्रॅक्टिससाठी जात असे, तेव्हा ‘सातच्या आत घरात’ हा नियम माझ्यासाठीही होता. तो पाळण्यासाठी मिस्टरांनी दुचाकी घेऊन दिली. पहिली केस कोपरगाव न्यायालयात चालवली. ही १२५ ची पोटगीसाठीची केस होती.

सुरुवातीला काही फौजदारी केसेसही आल्या होत्या, वरिष्ठांच्या मदतीने त्या सोडवल्या. लीगल एडच्या पॅनलमधल्या वकिलांच्या नावामध्ये माझ्या नावाचाही समावेश आहे. हा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचा उपक्रम आहे. तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग असतो. पैसे नसलेल्या लोकांना आम्ही लीगल एडमार्फत कायदेशीर मदत मोफत देतो. ज्यावेळी आरोपीची न्यायालयासमोर आल्यावर वकिलाची मदत घेण्याची ऐपत नसते, तेव्हा त्यांना न्यायालयाकडून वकील हवाय का असं विचारले जाते आणि पॅनलमधील वकिलाला केस लढवायला सांगितली जाते. महिलांसाठी २००५ च्या कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यासह भरपूर कायदे आहेत. कौटुंबिक कलहाच्या बर्‍याच केसेस येतात. त्या तातडीने सोडवण्याकडे माझा कल असतो.

कधी समुपदेशनाने नवरा बायको परत गुण्यागोविंदाने नांदायला लागतात, तर कधी एखादा तिढा न सुटणाराच असतो. अशा लोकांच्या केसेस न्यायालयात प्रलंबित असल्या तर दोघांचेही वय वाढत जाते, आणि दुसरे लग्न करण्यासाठी समस्या निर्माण होतात. त्यामुळे आम्ही मध्यस्थ म्हणून तोडगे लवकर काढण्याचा प्रयत्न करतो. आदिवासी जोडप्यांचे प्रश्न माझ्याकडे खूप येतात. एका आदिवासी जोडप्याचं आठेक वर्षं समुपदेशन करून आता मला त्यांचा संसार सुरळीत करण्यात यश आले आहे. नवर्‍याने दारू पिऊन बायकोला मारणे ही सामायिक गोष्ट आहे.

एक केस अगदी ठळकपणे आठवतेय, एक आदिवासी महिला मला नवर्‍याशी वाद झाला की नेहमी भेटायला यायची. एकदा आपल्या नवर्‍याने दुसरे लग्न करून नाशिकला बिर्‍हाड केल्याचे तिला समजले. तिच्या घटस्फोटाचा अर्जही मंजूर झाला. पण ती मुलांसाठी त्याच्याकडेंच राहायची. तिनंही दुसरं लग्न केले होते. तिला मुलांचा ताबा हवा होता. पहिला नवरा दारूच्या आहारी गेलाच होता, तो आणि त्याची दुसरी बायको आपल्या मुलांचे नीट संगोपन करतील, याची तिला शाश्वती नव्हती. मी तिला म्हटले, आपण कायदेशीर लढाई लढून मुलांना आणू. तशी केस टाकली आणि तिला तिन्ही मुलांचा ताबा मिळाला. तो परत आला आणि मुलाला घेऊन गेला, दोन मुली तिच्याकडंच राहिल्या. त्या दोघांचीही कुटुंबं अधूनमधून दिसतात. ती मुलींचे संगोपन छान करतेय; पण मुलाचे फाटके कपडे आणि अवतार पाहून काळीज तुटतं. अशाही केसेस असतात.

एकुणात महिलांचं आयुष्य बरेच वेळा संघर्षाचे दिसते, मग त्या शिकलेल्या असोत वा अडाणी. आपल्या पारंपरिक समाजात महिलांची बुद्धिमत्ता, वेगळे काही करण्याची आस बळी पडलेली दिसते. ग्रामीण भागात वेगळे काही करणारी महिला असेल तरी तिच्या आर्थिक नियोजनापासून तिच्या जीवनशैलीतले सर्व निर्णय पुरुष किंवा सासरची मंडळी घेताना दिसतात. त्यात तिचे कार्यक्षेत्र वेगळेे असेल, त्याच्या वेळा वेगळ्या असतील तरी तिने पारंपरिक कामे चोख पार पाडलीच पाहिजेत, असा हट्ट असतो. महिलांसाठीचा कायदा हा फक्त पुस्तकी ज्ञानासाठी नाही. मी तर म्हणेन, बायांनो, अन्याय अत्याचार होत असेल तर कायद्याचा आधार घ्या. तुमची घोडदौड रोखणार्‍यांना, तुम्हाला त्रास देणार्‍यांना धडा शिकवा. कायदा तुमच्या बाजूचा आहे. कित्येक शिकलेल्या महिला यातना सहन करून तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाताना दिसताहेत, वाईट वाटते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यादिवशी मिळेल, त्याचवेळी मी ‘महिला दिन’ आहे असे म्हणेन.

महिला इतक्या क्षेत्रात आपलं कौशल्य दाखवताहेत, पण सर्वसामान्यपणे आपण नागरिक म्हणून तिला समानतेचं स्थान कधी देणार, तिचा आदर कधी करणार, हा महत्त्वाचा प्रश्न मला वकील म्हणून काम करताना भेडसावतोच. ग्रामीण भागात अजूनही चाकोरीबाहेरची वाट चोखाळणं एका महिलेला अग्निदिव्य केल्यासारखेच आहे.

महिलांसाठीचा कायदा हा फक्त पुस्तकी ज्ञानासाठी नाही. मी तर म्हणेन, बायांनो, अन्याय अत्याचार होत असेल तर कायद्याचा आधार घ्या. तुमची घोडदौड रोखणार्‍यांना, तुम्हाला त्रास देणार्‍यांना धडा शिकवा. कायदा तुमच्या बाजूचा आहे. कित्येक शिकलेल्या महिला यातना सहन करून तोंड दाबून बुक्क्याचा मार खाताना दिसताहेत, वाईट वाटते. महिलांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ज्यादिवशी मिळेल त्याचवेळी मी महिला दिन आहे असं म्हणेन. असंख्य महिला पाहिल्या. म्हणून लीगल एडअंतर्गत मी महिलांना माहिती देते. त्यांच्याशी बोलते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देते. शाळा-महाविद्यालयांत लेक्चर्स देते.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*