नाशिक l तरन्नूम काद्री (आर्किटेक्ट) : महिला समाजमन घडवणारी आर्किटेक्ट

0
लहानपण म्हणजे हसणे, खेळणे, बागडणे.. तणावमुक्त जीवन काय असते हे अनुभवायचे तर त्या ‘स्टेज’सारखा दुसरा आनंद नाही. माझे वडील टेलरिंगच्या व्यवसायात होते. प्रत्येक गोष्टीत औत्सुक्य ठेवण्याच्या माझ्या सवयीतून वडिलांचा व्यवसायही सुटला नाही. ते करीत असलेल्या लहान-मोठ्या कामांचे मी निरीक्षण करीत असे. त्यादरम्यान मनात उद्भवणार्‍या शंका त्यांच्या पुढ्यात मांडून त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत मला थांबणे माहीतच नव्हते. लहानपणीची ही आवड माझ्यातील कलेच्या बीजारोपणाला पूरक ठरली. आजचे माझे आर्किटेक्चरमधील यश तेव्हाच्या पायाभरणीचे गमक आहे. परिणामी माझे वडील हेच माझे गुरू व मार्गदर्शक ठरले.

 कपड्यांना आकार देण्याची वडिलांची कला हळूहळू माझी आवड बनली. मी कागदावर चित्र काढण्यास प्रारंभ केला. शाळेत ड्राईंग स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामध्ये माझी कामगिरी सरस होत गेल्याने कला बहरली आणि आत्मविश्‍वासही वृद्धिंगत होत गेला. या कलेला ‘एक्स्पोजर’ देण्याच्या उद्देशाने आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्याचा मी निर्धार केला. या क्षेत्राचा घर सजवण्याशी, सौंदर्यवर्धनाशी असलेला संबंध मला या निर्णयाप्रत घेऊन गेला. घरात तशी मी मोठी. मन सामाजिक हेतूने घेरलेले. आठवी इयत्तेत असताना समाजावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याचे निदर्शनास आले.

दहावीची परीक्षा संपल्यावर केवळ औत्सुक्यापोटी मुंबईच्या जे. जे. आर्ट कॉलेजला भेट द्यावयास गेले. तिथली भव्यता पाहून हरखून गेले. असंख्य कलावंतांना घडवणारे विद्यापीठ म्हणून डोळ्यात साठवताना मला त्याचा अभिमान वाटला. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण नाशिकच्या एच.ए.बी. सिंध हायस्कूलमध्ये झाले. केटीएचएम महाविद्यालयातून अकरावी व बारावी विज्ञान श्रेणीत पूर्ण केल्यानंतर माझा आर्किटेक्चर विश्‍वाचा प्रवास सुरू झाला. मविप्र संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयात पाच वर्षे अभ्यास केल्यानंतर डिग्री प्राप्त केली.

पहिल्या श्रेणीचे कोंदण लाभल्याने काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षापासूनच या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. पुस्तकी ज्ञान व प्रत्यक्षानुभवाने चांगली ‘ग्रीप’ आली. चौथ्या वर्षी बंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी गेले. जे अभ्यासक्रमांतर्गत अनिवार्य असते. तिथे सुमारे चार महिने प्रशिक्षण घेऊन नाशकात परतले. साधारणत: १९९७ मध्ये अभ्यासक्रम पूर्ततेनंतर नाशकातच आर्कि. संजय पाटील यांच्याकडे कामास प्रारंभ केला. दीड वर्षांचा तिथला अनुभव माझ्यासाठी समृद्धीचा ठेवा होता.

सुदैवाने माझा विवाह आर्किटेक्चर असलेल्या अस्लम काद्री यांच्यासोबत झाला. एका प्रॉमिसिंग व्यक्तिमत्त्वाची जोड लाभल्याने माझ्या जीवनात दुग्धशर्करा योग आला. आम्ही दोघांनी वेगात प्रॅक्टिस सुरू केली. लवकरच आमची स्वतंत्र फर्म सुरू झाली. पहिले स्वतंत्र काम मिळाले ते पप्पांच्या मित्राच्या घराचे. तिथे आम्ही स्वत:ला सिद्ध केले. या काळात अनेकांचा पाठिंबा मिळाला. व्यावसायिकदृष्ट्या कामाची व्याप्ती वाढली. आर्किटेक्चर हे माझे ‘पॅशन’ बनले. खास करून सून या नात्याने मला सासरच्यांकडून मिळालेला नैतिक पाठिंबा शब्दांपलीकडे राहिला.

माझ्या व्यवसायात झोकून देण्याच्या वृत्तीला त्यांनी यत्किंचितही विरोध केला नाही. आज आमचे बेंडकुळेनगरला ‘मॉर्फोसीस आर्किटेक्टस्’ नावाने अद्ययावत कार्यालय आहे. व्यावसायिक पसाराही वाढला आहे. माझ्या कामातील गुणवत्तेची दखल स्थानिक पातळीवरील संस्थांनी घेतली आहे. इंडियन आर्किटेक्टस् ऍण्ड बिल्डर्स संस्थेच्या वतीने मला जून २०१६ मध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फेब्रुवारी २०१७ मध्ये आम्ही दोघे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् (आयआयए)तर्फे महाराष्ट्र गौरव सन्मानाने गौरवलो गेलो. या पुरस्कारामुळे आम्हाला जेवढा आनंद झाला तेवढीच जबाबदारी वाढल्याची भावना बळकट झाली.

आर्किटेक्चर क्षेत्रात मी आज छान ‘सेटल्ड’ आहे. मी आणि यजमान मिळून चांगला क्लायंट बेस तयार केला आहे. मात्र सामाजिकदृष्ट्या काहीतरी वेगळे करण्याची आंतरिक इच्छा आहे. अनेकदा रस्त्यांवरून जाताना लहान मुले भीक मागताना दृष्टीस पडतात. अंगावरील अपुरे कपडे, दीनवाणे चेहरे, रुपया-दोन रुपयांसाठीच्या त्यांच्या विनवण्या मनाला चटका लावून जाते. हे करताना त्यांच्या डोळ्यात एक आशा असते. या ‘स्ट्रीट अरब्ज’ना शिक्षणाचे धडे देण्याचा माझा संकल्प आहे. त्यांना शिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना त्यांच्यातला चांगला माणूस घडवण्याचे ध्येय मी सामोरे ठेवले आहे. माझ्या संकल्पाला अर्थातच घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या उपक्रमावर आम्ही कामदेखील सुरू केले आहे.

महिला विश्‍वाबद्दल म्हणाल तर महिला ही समाजमन घडवणारी ‘आर्किटेक्ट’ आहे. तिला कुटुंबासोबत समाजातही सन्मान मिळावा ही माझीच नाही तर समस्त महिला विश्‍वाची भावना आहे. पुरुषांच्या बरोबरीने कोणतेही काम करण्याची महिलांमध्ये क्षमता असते. पूर्वीच्या तुलनेत आज त्याबाबत बरीच सुधारणा झाली आहे. महिलांचे विश्‍व चूल आणि मूल संकल्पनेपलीकडे पोहोचले आहे. तथापि पाश्‍चिमात्य राष्ट्रांप्रमाणे भारतात सामाजिक पुनर्रचनेचा वेग आजही मंदावलेला आहे. व्यापकदृष्ट्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. महिलांसाठी असंख्य योजना आहेत. महिला सक्षमीकरणाचे सरकारी प्रयत्न दखलपात्रही आहेत.

मात्र त्यापैकी अनेक योजना केवळ कागदावर राहतात, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. विदेशात शिक्षण, आरोग्यासह विविध सुविधा मोफत बहाल केल्या जातात. आपल्याकडे किमान महिलांबाबत त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे वाटते. महिलांचे सर्वार्थाने होणारे शोषणही आजच्या दृष्टीने सामाजिक कलंक आहे. एक महिला या नात्याने मी नेहमीच संवेदनशील दृष्टीने पाहते. आर्किटेक्ट क्षेत्रापलीकडे जाऊन समाजासाठी वेगळे करण्याचा माझा आता असलेला प्रयत्न भविष्यातही अविरत सुरू ठेवण्याचा माझा मानस आहे.

कपड्यांना आकार देण्याची वडिलांची कला हळूहळू माझी आवड बनली. मी कागदावर चित्र काढण्यास प्रारंभ केला. शाळेत ड्राईंग स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामध्ये माझी कामगिरी सरस होत गेल्याने कला बहरली आणि आत्मविश्‍वासही वृद्धिंगत होत गेला. या कलेला ‘एक्स्पोजर’ देण्याच्या उद्देशाने आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्याचा मी निर्धार केला. आज आर्किटेक्चर हे माझे ‘पॅशन’ बनले. महिला विश्‍वाबद्दल म्हणाल तर महिला ही समाजमन घडवणारी ‘आर्किटेक्ट’ आहे. तिला कुटुंबासोबत समाजातही सन्मान मिळावा ही माझीच नाही तर समस्त महिला विश्‍वाची भावना आहे.

(शब्दांकन : मिलिंद सजगुरे)

LEAVE A REPLY

*