नाशिक l स्नेहल देव : नाशिक ‘सायकल हब’ करायचंय..!

0
मला लहानपणापासूनच कला, क्रीडा, वाचनाची आवड होती. शाळा आणि महाविद्यालयात मी सायकलवर जात असे. लग्नानंतर मी अंमळनेर सोडले आणि नाशिकला स्थायिक झाले. माझे मिस्टर म्हणाले, तुला हवा तो व्यवसाय कर. त्यावेळी मी स्वतःची सॉफ्टवेअर फर्म एसआर इंटरनॅशनल या नावाने सुरू केली. ही फर्म बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करते. सायकल चालवणे हा माझा छंद आहे. नॅशनल सायकलिंग फेडरेशन ही संघटना भारतभरातल्या लोकांना सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन देते. मी त्याची सदस्य आहे.

जास्तीत जास्त लोकांनी सायकलीचा वापर करून नाशिक प्रदूषणविरहित करणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी अबालवृद्धांना सायकल चालवण्यासाठी प्रवृत्त करते आहे. लहान मुलांसाठी सायकलिंगच्या स्पर्धा घेऊन त्यांनाही हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे. प्रतिसाद चांगला मिळू लागल्याने प्रयत्नांचे चीज होताना दिसतेय.

मी आतापर्यंत शिर्डी, इगतपुरी, कसार्‍यापर्यंत सायकलवरून ग्रुपबरोबर गेले आहे. एक अनुभव सांगते, आमच्याबरोबरच्या एका महिलेला सायकलवरून इतका लांब प्रवास करण्याची सवय नव्हती. ती मध्येच थांबत, सायकल हळूहळू चालवत होती. बाकीचे पुढे निघून गेले होते. मी तिला विचारले, का थांबलीस? ती म्हणाली, तिथपर्यंत येणे जमणार नाही, मी परत जाते.

मी तिला सोबत देत शिर्डीची राईड पूर्ण केली. आम्ही सायकलिंगसाठी दोन ग्रुप तयार केले आहेत. एक ३ ते १८ वयोगटातल्या मुलांचा आणि दुसरा १८ वर्षांनंंतर ७० ते ७२ वर्षांच्या प्रौढ लोकांचा. सायकलिंग करताना सतत पाणी पित राहिले पाहिजे. आम्ही मध्येच थांबतो, त्याला फस्ट पॉईंट म्हणतो. तेव्हा लिंबू सरबत, ग्लुकोजचे पाणी, ग्लुकॉन डी सोबत असते. बरोबर एक रुग्णवाहिकाही असते. दरवर्षी पंढरपूरला राईड असते, तिथे जायचे माझे स्वप्न आहे. सायकलिंगची सुरुवात घरापासूनच केली. माझी मुले बस किंवा व्हॅनने न जाता सायकलवरून जातात.

मी रोज ४५ मिनिटे स्वतःसाठी देते. व्यायाम करते, न्याहरी वेळेवर करते. प्रत्येक बाईने स्वतःसाठी हे केलेच पाहिजे, असे मला वाटते. नाशिकच्या सायकलिंग ग्रुपबरोबर वेगवेगळे उपक्रम राबवते. नाशिकमध्ये २०१६- १७ ला ‘नाशिक पेलेटॉन’चे आयोजन केले होते, त्याअंतर्गत १५ किमी, ५० किमी आणि १५० किमीच्या सायकलिंगच्या स्पर्धा घेतल्या होत्या.

मी स्वतःही त्यात ५० किमी अंतरावरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ‘रोटरी इंटरनॅशनल’च्या मॅरेथॉन स्पर्धेतही भाग घेतला होता. २०१७ सालच्या सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या नॅशनल एमटीबी चॅम्पियनशिपसाठी काम केले. जास्तीत जास्त लोक सायकलचा वापर करतील, तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*