नाशिक l साधना तावडे : कर्म हीच पूजा

0
समाजासाठी काम करण्याची नैसर्गिक उर्मी माझ्यात उपजत आहे. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले, नावारुपाला आणले, त्या समाजातील वंचित घटकांसाठी खारीच्या रुपाने का होईना योगदान द्यावे, असे मला बालपणीपासून वाटे. पण नेमके काय करावे हे स्पष्ट होत नव्हते. भारतीय लष्करात अनेक वर्षांची सेवा दिल्यानंतर माझे पती सुनील तावडे पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांची पहिली पोस्टिंग दुर्गम आदिवासी पाड्यावर झाली होती. त्यांच्यासोबत मी कधी कधी पोलीस स्टेशनवर जात असे. तिथे एक घटना घडली. एक अल्पवयीन मुलगी एका विवाहीत पुरुषाबरोबर निघून गेली होती. पाच-सहा महिन्यानंतर ती पोलीस स्टेशनला आली तेव्हा तिच्या तथाकथित मित्राने तिला सोडून दिले होते. त्यावेळी ती गरोेदर होती. हा प्रसंग पाहून मी विचारात पडले. विचारले तर कळाले की, तिच्यावर अन्याय करणारा माणूस एक मूल तिच्या पदरात टाकून स्वत: मात्र जामीनावर फिरतोय. तिथे महिला पोलीस नव्हत्या. त्यामुळे विवाहपूर्व संबंधांवर बोलण्यासाठी कोणीही नव्हते. मी अशा मुलींसाठी काम करावे, असे त्या दिवशी ठरवले आणि या प्रवासाला सुरुवात झाली.

दुर्गम भागातील अनेक कुटुंबे शहरात कामासाठी येतात. येताना त्यांच्या तरुण मुली वयोवृद्ध सासू-सासरे, आई-वडिलांकडे सोडून येतात. त्यांच्या अडनिड्या वयातील मुलींना मासिक पाळी, त्याकाळातील स्वच्छता यासह वयात येतानाचे बदल, धोके, शास्त्रोक्त लैंंगिकता शिक्षण देण्यासाठी कुणीच काम करत नाही, असे लक्षात आले. म्हणूनच मी मुलींसाठी काम करावे असे ठरवले. पौगंडावस्थेतील मुलींना मासिक पाळीसह शारीरिक शिक्षण देण्यासाठी आदिवासी पाड्यांवरील शाळेत जाऊ लागले. मुलींशी संवाद साधू लागले.

तोपर्यंत पहिले पाऊल या आमच्या संस्थेचा श्रीगणेशा झाला नव्हता. दरम्यान, नाशिक क्लब आस्थापनेतील सर्व मुलांनी मिळून एक समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे, हा सामाजिक माध्यमातून मांडला. प्रथम २०१२ साली गोदाकाठी उघड्यावर थंडीत कुडकुडणार्‍यासाठी ब्लँकेट वाटप केले. इथून पुढे कामाला सुरुवात झाली आणि पुढची पावले पडत गेली.

बार्‍हे गावाच्या आजूबाजूला सामाजिक कार्यासाठी जेव्हा फिरु लागले तेव्हा प्रश्‍न मासिक पाळी, त्याकाळातील स्वच्छता हा होताच, त्याहीपेक्षा लैंगिकतेविषयी कमालीचे अज्ञान, अंधश्रद्धा हेही प्रश्‍न मोठे होते. अजाणत्या वयातील मुलीशी कसे बोलावे हे मोठे आव्हान होेते. मी त्यांच्या पालकांना विश्‍वासात घेऊन या नाजूक विषयांवर काम करावे, असे ठरवले. कारण पालक कुमारी माता हा मोठा प्रश्‍न खूप सहजतेने घेतात, असे लक्षात आले. क्वचितच ही बाब पोलीस स्टेशनपर्यंत येत होती. हे खूप गंभीर होते. मग मी मुलींशी बोलू लागले. तेव्हा मला समजले की, अशा अल्पवयीन मुलींना विशीतली मुले सुंदर दिसते म्हणून ‘प्रपोझ’ करतात आणि मग पुढे सर्व होते मग मी त्यांना सांगितले. तुम्हाला आई-वडिलांनी मोठे केले शिक्षण दिले.

त्यांना एका क्षणात सोडून एका मुलाबरोबर विवाह होण्याआधी पळून जावे का? ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे ते मुलगे तुमच्यासोबत राहतात आणि तुमच्या पदरात एक बाळ देऊन मग तुम्हाला सोडून देऊन निघून जातात. याला प्रेम म्हणायचे का? असे प्रश्‍न मी त्यांना विचारले आणि मुली अंतर्मुख होऊन विचार करू लागल्या. हळूहळू त्या कोवळ्या जीवांमध्ये बदल होत गेले. हे काम पाहून मला अनेक शाळांमधून बोलवणे येत गेले. मी त्याची बोली शिकले त्याच लहेजात बोलून प्रसंंगी त्याच्यासारखे नृत्य करून त्यांना आपलेसे करून घेतले आणि मग त्यांना जेव्हा मी त्याची मोठी ताई वाटू लागली. त्याच्या श्रद्धास्थाना धक्का न लावता विज्ञानाची मदत घेऊन त्यांना विश्‍वासत घेऊन काम करणे हे खूप आव्हान होते. मासिक पाळी, कुमारी माता होणे यासह मुलींचे पौगंडावस्थेतील प्रश्‍न या मुळाशी अंधश्रद्धा आहे त्यावर आता काम सुरू केले आहे. माझे पती वर्दीतून कायदा सुव्यवस्था, गुन्हगारी निर्मूलन करतात.

पोलिसांच्या मदतीने मी ‘से नो कॅम्पेेन’ अर्थात ठामपणे नाही म्हणायला शिका, हा उपक्रम राबवला. आपुलकीचा, वात्सलाचा स्पर्श कसा असतो, हे प्रयोगातून सांगितले. बॅड टच कसा असतो, तो कसा ओळखावा, हे शिकवले. त्यामुळे मुली जागरुक झाल्या आणि आमचे कॅम्पेन सफल होत गेले.

विविध पुस्तकांचे वाचन, संत साहित्य, अध्यात्म हे माझ्या आवडीचे विषय आहे. अनुसया भजनीमंडळाच्या माध्यमातून मी अध्यात्माकडे वळाले. त्यातून संवाद वाढला. घरगुती कार्यक्रमातून मी भजने करू लागले. संतसाहित्याची गोडी लागली आणि त्याचा कार्यासाठी लोक जोडण्यासाठी आणि जोडलेल्या लोकांना सामावून घेऊन आणखी समाजोपयोगी काम कसे करता येईल, याचा मी विचार करत गेले. आपल्या कामात लोकांना सामावून घेताना त्यांना रुचेल, झेपेल, पचेल आणि आपले वाटेल असे होणे गरजचे आहे, असे मला वाटते. तेच मी करत आली आहे. आज मला दूरदूरच्या आदिवासी पाड्यांवर पौगंडावस्थेतील मुलींना शिक्षित करण्यासाठी आमंत्रणे येतात. इतरांना प्रेरणा देऊन समुदेशन करणे हे माझे आवडीचे काम आहे म्हणूनच असेल कदाचित माणसाने दुसर्‍यासाठी जगणे पाहिजे, असे मला वाटते. ध्यान, ओंकार जप, योग याने मनुष्य ‘चार्ज’ होतो. यातून मी चार्ज होते. समाजासाठी किंवा स्वत:साठी संघर्ष करताना ही ऊर्जा, बळ कामी येते. महिलांचे क्षितीज विस्तारत आहे. महिला उत्थानासाठी मी कटिबद्ध असून त्याच कामासाठी देवाने माझी नेमणूक केली आहे, असे मला वाटते.

एक महिला कुटुंब, समाज, देश घडवण्यात मोठे योगदान देऊ शकते, स्त्री शक्तीने आजवर खूप मोठे कार्य केले आहे. त्यामुळे महिलांनी परिस्थितीचे भांडवल न करता, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:सोबत आपल्या समाजासाठी जे शक्य असेल ते करावे असा संदेश मी माझ्या सखींना देईल. आज अर्ध आकाश महिलांचे आहे तरी ते समाजाला, पूर्णत्व देणारे आहे. त्यामुळे माझ्याकडून समाजासाठी जेव्हढी सेवा ईश्‍वर करून घेईल, ती आनंदाने आणि शेवटच्या श्‍वासापर्यंत करत राहण्यामध्येच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता असेल.

अडनिड्या वयातील मुलींना मासिक पाळी, त्याकाळातील स्वच्छता यासह वयात येतानाचे बदल, धोके, शास्त्रोक्त लैंगिकता शिक्षण देण्यासाठी कुणीच काम करत नाही, असे लक्षात आले म्हणूनच मी मुलींसाठी काम करावे असे ठरवले. पौगंडावस्थेतील मुलींना मासिक पाळीसह शारीरिक शिक्षण देण्यासाठी आदिवासी पाड्यांवरील शाळेत जाऊ लागले. त्यांच्याशी संवाद साधू लागले.

एक महिला कुटुंब, समाज, देश घडवण्यात मोठे योगदान देऊ शकते, स्त्री शक्तीने आजवर खूप मोठे कार्य केले आहे. त्यामुळे महिलांनी परिस्थितीचे भांडवल न करता, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:सोबत आपल्या समाजासाठी जे शक्य असेल ते करावे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*