नाशिक l रोहिणी वाघ : विशेष मुलांना शिकवण्याचा ‘प्रयास’

0
माझे माहेर जळगावजवळच्या अंमळनेरचे. आई-वडील दोघेही शिक्षक. सासूबाईही शिक्षिका होत्या. आमच्या घरातली माझी पाचवी पिढी शिक्षणक्षेत्रात आहे. त्यामुळे प्रत्येक मूल शिकले पाहिजे, हा विचार रक्तातच रुजला आहे. मी बीए आणि बीएडही केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संस्थेत पाचवी ते दहावीच्या मुलांना इंग्रजी आणि इतिहास शिकवत असे. त्यावेळी लक्षात आले की, शिकवलेले काही मुलांना समजतच नाहीये. समस्येचे मूळ शोधण्यासाठी २००० साली विषय कच्चे असलेल्या मुलांसाठी कच्चा वर्ग सुरू केला. हा वर्ग माझ्याकडेच होता. त्यावेळी समजले की, अशा मुलांना वेगळ्या प्रकाराने शिक्षण द्यावे लागते.

त्यासाठी वेगळे शिक्षणही घ्यावे लागते. म्हणून मी स्पेशल एज्युकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. विशेष मुलांसाठी काम करणे हा माझ्या आयुष्याचा फोकस झाला. अहमदाबादला ‘ब्लाईंड पीपल असोसिएशन’च्या स्पेशल एज्युकेशनसाठी पदवीनंतरचा कोर्स आहे. जळगावहून आम्ही नोकरीनिमित्ताने २००४ मध्ये नाशिकला आलो. त्याच साली मी भारत विकास परिषदेचे अपंगांसाठीचे केंद्र चार वर्षंे सांभाळले. त्यावेळी वाटले, अजून काम झाले पाहिजे. सन २०१३ मध्ये मी कुसुमुदिनी फाऊंडेशनची स्थापना केली आणि त्याअंतर्गत ‘प्रयास लर्निंग ऍण्ड थेरपी सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रेन’ची स्थापना केली. कुमुदिनी हे माझ्या आईचे तर कुसुम हे सासूबाईंचे नाव. दोघींनीही माझ्या या कामात उत्तम साथ दिली.

आमची डॅ. कृष्णा शिंदे, डॉ. विक्रम किशन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट प्रिया गायधनी, पूजा जोशी आणि रेणुका जेजुरकर, समुदेशक मिथिला डोणगावकर, शिक्षिका निमिषा पंजवानी अशी आठ जणांची टीम आहे. प्रयासमध्ये सहा महिन्यांपासूनच्या मुलांवरही थेरपी केली जाते. विशेष मुलांना वेगवेगळ्या थेरपी देऊन सामान्य कसे करता येईल, हे आम्ही पाहतो. ६ महिने ते १८ वर्षंे या वयोगटातली दीडशे मुले सध्या आमच्याकडे उपचार घेत आहेत. यातली ७५ टक्के मुले सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जातात. त्यांना शिक्षणाच्या, समाजाच्या प्रवाहात सामावून घेतले तर त्यांचे जीवनमान उंचावता येईल. प्रत्येक मुलाला वैयक्तिक उपचार दिले जातात.

प्रत्येक मुलाच्या उपचारासाठी वैयक्तिक आराखडा असतो. आशुतोषला गाड्या आवडतात, मग आम्ही त्या माध्यमातून त्याला शिकवतो. गार्गीला गाणी आवडत असल्याने गाण्यांच्या भाषेत शिकवतो. ऑटिस्टिक असलेला अजिंक्य आता सामान्य शाळेत शिकतोय. ऑटिस्टिक असलेला साडेतीन वर्षांचा भावेश आईलाही ओळखत नव्हता. रात्रीअपरात्री तो भयानक पद्धतीने रडायचा म्हणून त्याची आई आम्हाला फोन करायची. त्याआधी दुसर्‍या डॉक्टरांनी त्यांना सागितले होते, याचे काहीच होऊ शकत नाही. त्याला उडीही मारता येत नव्हती. पण आता तो इतका बदललाय की पहिलीत जाईल. डाऊन सिंड्रोम असलेला स्वयम पाटील पोहण्यात इतका तरबेज झालाय की, त्याचे नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेय.

पाण्यात उडी मारल्यावर त्याच्या तोंडातल्या स्नायूंवर कंट्रोल राहायचा नाही. जीव चावली जाऊन रक्त यायचे. आमच्याकडे थेरपी घेतल्यावर पोहण्याचा पहिला टप्पा उडी मारणे असतो, तो त्याने पार केला. तो आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करतोय. ब्रेन टॉनिक आणि थेरपीमुळे ही मुले व्यवस्थित शिकू शकतात. आमच्याकडे आता नजरेला नजर देत नाही, मान धरत नाही म्हणून तीन महिन्यांचे सर्वांत छोटे बाळ आलेय. आमच्याकडे स्वमग्न म्हणजेच ऑटिस्टिक मुले, अतिचंचलता, वर्तणूक समस्या, पक्षघात, मतिमंदता, डाऊन सिंड्रोम, डिस्लेक्सिया म्हणजेच वाचन समस्या, लेखन समस्या, संवेदिक अडथळा, सामाजिक अडथळा, गतिमंदता, मेंदूची वाढ कमी, सेरेब्रल पाल्सी, अपंगत्व, उशिरा बोलणे-चालणे, अभ्यासात मागे पडणे, हट्टीपणा, शैक्षणिक समस्यांवर मार्गदर्शन आणि उपचार केले जातात.

उपचारांमध्ये ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, सेंसरी इंटिग्रेशन थेरपी, फिजिओथेरपी, म्युझिक थेरपी, प्ले थेरपी, रेमेडिअल शिक्षण, पालकांचे प्रशिक्षण व समुपदेशन, शिशू निदान चाचण्या, बुध्यांक चाचण्या या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. हायपर ऍक्टिव्ह एडीएचडी या गटात मोडणार्‍या अतिचंचल मुलांच्या भाषेचा विकास होत नाही. ही मुले समाजात मिसळत नाहीत, एका जागेवर शांत बसत नाहीत. हे सगळे शाळेत जायला लागल्यावर पालकांना जाणवते. त्यांना आम्ही ऑक्युपेशनल थेरपी देतो. डाऊन सिंड्रोमबरोबर मतिमंदत्व असेल तर अनेक अडचणी येतात; पण फक्त डाऊन सिंड्रोम असेल तर मूल उत्तम चमकू शकते. बाळांच्या उपचारांमध्ये आईला सामावून घेतो, तिला प्रशिक्षण देतो. चांगली आई व्हा, असे सांगतो.

मूल किती सामाजिक आहे, मदत करते का, जीवनाच्या शर्यतीत कोणत्याही प्रसंगी तुम्ही त्याला संघर्षाला तोंड द्यायला शिकवताय का, हे परीक्षेत गुण मिळवण्याला महत्त्व देण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यासाठी मूल आणि आई-वडिलांचा सुसंवाद आणि त्यातही मोकळेपणा असणे आवश्यक आहे. सर्वांनी मिळून रात्रीचे जेवण तरी बरोबर करा. आपल्या बाळाचे म्हणणे ऐका, त्याला गोष्ट सांगा, झोपताना जवळ घ्या, थोपटा. कौशल्य ओळखून त्याला प्रोत्साहन द्या. गुणांपेक्षा मूल्य आणि मानसिक आधाराची थाप त्याला अधिक बळ देते. अलीकडे या समस्या असलेल्या मुलांचे प्रमाण वाढलेय.

बाळ सुदृढ जन्माला येण्यासाठी आईवर मानसिक तणाव असता कामा नये. तिचा आहार आणि गरजेइतकीच औषधे यावर लक्ष हवे. लग्नाआधी तीन महिने रुबेलाचे इंजक्शन घ्यायला हवे. नियोजन करून उत्तम आरोग्य असेल तेव्हाच बाळाला जन्म द्यायला हवा. प्रयासमध्ये खेडेगावातूनही मुले येतात. अधिकाधिक विशेष मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तालुका पातळीवर शिबिरे घेतो. प्रत्येक तालुक्यात शाखा उघडली तर पालकांना आपल्या मुलांना इतक्या लांबवर घेऊन येण्याची गरज भासणार नाही, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

धुळे, जळगाव, नगर, घोटी, शिर्डी, बहीरगाव अशा ठिकाणहून मुले येतात, अपंगत्व कोणत्याही प्रकारचे असले तरी वेळीच ओळखल्यावर प्रत्येक मूल शिकू शकते. धुळ्याला सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या मिस्टरांची साथ असल्यामुळे मी हे काम निर्धास्तपणे करू शकतेय. भारतातल्या प्रत्येक स्त्रीला असेच घरून पाठबळ मिळाले तर आपला देश नक्कीच महासत्ता होईल.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*