नाशिक l रितू अग्रवाल (शैक्षणिक) : ‘फोकस्ड एज्युकेशन’ हेच बलस्थान

0
माहेर काय किंवा सासर व्यावसायिकता ही आमची ‘पॅशन’ राहिली आहे. व्यावसायिकतेतून आर्थिक उन्नतीचे ध्येय साध्य करण्याचा हेतू राहिलाच, तथापि ते करताना गुणवत्ता व प्रामाणिकपणाचा पैलू जपण्याचा पावलोपावली प्रयत्न केला. शिक्षणसंस्था उभारणीच्या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली ती मुळी गुणवत्तेच्या शोधातूनच. मात्र, गुणवत्तेचा हा शोध आज स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणसंस्था म्हणून लौकिक पावलेल्या लिटिल वंडर्स व विस्डम हाय साठी ‘बेंचमार्क’साठी ठरतोय. मी मूळ नाशिककर. सेंट फिलोमिना शाळेत शिक्षण घेतले.

 महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे बीवायके मध्ये घेतले. माझ्या वडील चंद्रकांत अग्रवाल यांचा व्यवसाय होता. ट्रॅक्टरचे डिलर व चंद्रकांत ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे संचालक म्हणून ते नाशिकच्या व्यावसायिक विश्‍वाला ज्ञात होते. याशिवाय, हिन्दुस्थान मोटर्सचे डिलर म्हणूनही ते कार्यरत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी हर्ट्झ कार रेंटल नामक कंपनीत नोकरीला प्रारंभ केला. दोन वर्षांनंतर अर्थात १९९४ मध्ये माझा विवाह मनीष अग्रवाल यांच्यासोबत झाला. परिणामी, माझी नोकरी खंडित झाली. माझ्या सासरची पार्श्‍वभूमीदेखील उद्योजकीय स्वरूपाची आहे. सातपूर औद्योगिक परिसरात नाशिक सुपर टूल नामक आमची फॅक्टरी आहे.

सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये काही वर्षे घालवल्याने गुणवत्तेशी चांगलेच नाते जोडले गेले. अशातच माझ्या मुलीला शाळेत टाकण्याची वेळ आली. मात्र, तेव्हाच्या परिस्थितीत नाशिकमध्ये अस्तित्वात असलेल्या शाळांपैकी गुणवत्तेच्या कसोटीवर एखादीही शाळा माझ्या पसंतीस उतरली नाही. माझ्याप्रमाणेच मुलीचेही करियर उत्तम घडले जावे, या ध्येयाने अखेर आम्ही मुंबईला गेलो आणि तेथील काही शाळांची चाचपणी केली. त्यावेळी नाशिक व मुंबई येथील शैक्षणिक जगतातील फरक ध्यानी आला. तिकडे असलेल्या अनेक गोष्टींमध्ये नावीन्य होते, विद्यार्थीभिमुख उपक्रमांचा अंतर्भाव होता. तिकडची ‘प्ले ऍण्ड लर्न’ संकल्पना मला चांगलीच भावली. आणि बस्स.. तेथील वास्तवाने माझ्या विचारांना गती दिली आणि गुणवत्तेच्या कसोटीवर शिक्षणसंस्था स्थापण्याच्या विचारावर शिक्कामोर्तब झाले.

‘प्ले ऍण्ड लर्न’ संकल्पनेमुळे मुले एखादी गोष्ट लगोलग ‘कॅश’करतात. त्यातील ‘व्हिज्युअल मेमरी’ निर्णायक भूमिका वठवते. हीच देण मला नाशिककरांना कृतज्ञतापूर्वक द्यायची होती. मुलांची कल्पनाशक्ती बहरवण्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण पद्धतीचे ‘व्हिजन’घेऊन या क्षेत्रात पदार्पण केले. सन २००० मध्ये ‘लिटिल वंडर्स’च्या स्वरूपात स्वप्नाला आकार दिला गेला. नाशिकच्या महात्मानगर परिसरात शाळेची वास्तु भाडेतत्त्वावर उभी राहिली. प्रारंभी चाळीस विद्यार्थी प्रवेशकर्ते होते. प्ले ग्रुप नर्सरीने माझ्या शैक्षणिक विश्‍वाचा श्रीगणेशा झाला. अर्थात, हे प्राथमिक विश्‍व उभारताना आव्हानांचा मोठा डोंगर पार करावा लागला. आर्थिक अडचणी आल्यात.

पण ध्येयनिश्‍चितीने त्यावर मात करण्याचे बळ दिले. माझ्या इच्छाशक्तीला पालकांनी पाठबळ दिले. अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रत्येकी दहा हजार रुपये डिपॉजिट दिल्याने माझा उत्साह दुणावला. विद्यार्थ्याची शैक्षणिक व तत्सम उपक्रमांतून सर्वंकष जडणघडण व्हावी, त्याच्यात संस्कारांचे रोपण व्हावे आणि शालेय प्रवास संपवताना त्याने ‘थँक यू टू यू’ म्हणत बाहेर पडावे, अशा पद्धतीचे शिक्षण देण्याचा माझा निर्धार होता. या त्रिसूत्रीवर वाटचाल करताना गुणवत्तेशी कोणताही समझोता आजवर तरी केला नसल्याचे मला समाधान आहे. लिटिल वंडर्सच्या माध्यमातून नाशिकमधील पहिले आयसीएसई स्कूल देणेही माझ्या करियरसाठी मैलाचा दगड ठरला. आज या शाळेत प्ले ग्रुप ते सिनियर केजी या श्रेणींत तब्बल सतराशे विद्यार्थी शिक्षण घेताहेत.

खरं तर एखादे व्रत हाती घेताना समाधानी राहून चालत नाही. नवा विचार, नवी दिशा, नवा अध्याय जोडण्यातून कल्पनाशक्ती प्रगल्भ होते. आपली कार्यकक्षा लिटिल वंडर्सच्या पलीकडे जावी, या विचाराने डोक्यात गर्दी केल्यानंतर फॉर्मल एज्युकेशन देण्यापोटी ‘विस्डम हाय’सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. स्वमालकीची शाळा सुरू करण्यामागील आव्हाने आम्ही आधीच अनुभवली होती. मात्र, आधीप्रमाणेच पालकांनी नवे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मनोमन साथ दिली. अखेर साधारणत: २००४ मध्ये पहिली ते दहावी पर्यंतची सुविधा असलेले आयसीएसई स्कूल म्हणून ‘विस्डम हाय’ आनंदवलीनजीक रामेश्‍वरनगरला उभे राहिले. नावीन्य स्वीकारण्याच्या विचाराने त्यानंतरही मला स्वस्थ बसू दिले नाही. मग ‘केंब्रिज विस्डम हाय’ स्थापण्याची कल्पना पुढे आली. तिथे पालकांच्या आग्रहास्तव ज्युनिअर कॉलेज सुरू झालेय.

त्याला दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. तेथील प्रतिसादही कमालीचा उत्साहवर्धक आहे. एखाद्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख तेथील कार्यरत व्यक्तींच्या गुणवत्ता, कौशल्य आणि स्वत:ला वाहून घेण्याच्या वृत्तीवर शत-प्रतिशत अवलंबून असते. मुलांच्या कलेने घेतले, तर बरेच काही साध्य होते. त्यांच्यात ‘ऍटिट्युड’ तयार करणे आवश्यक असते. आमच्या प्रत्येक प्रकल्पात आम्ही याच मुद्यांवर भर दिला. आमच्या आजवरच्या यशाचे भले तर ते गमक म्हणता येईल. साधारणत: नववीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करियर निश्‍चितीचा फॉर्म्युला वापरतो. आमच्याकडे तसे एकूण सव्वीस प्रकार अस्तित्वात आहेत.

आम्ही पत्र पाठवून पालकांकरवी विद्यार्थ्यांचा कल जाणून घेतो. त्यानंतर दहा दिवसांच्या एक उपक्रमात त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्राचे सखोल ज्ञान देण्यात येते.त्या क्षेत्रातील फायदे-तोट्याच्या गोष्टींबद्दलही त्यांना ज्ञात केले जाते. तिथे त्याची ध्येयनिश्‍चिती होते. आणि एक जबाबदार, ध्येयवादी विद्यार्थ्याला घडवण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. आमचे करियर कौन्सिलिंग सेंटरही अस्तित्वात आहे. सात दिवसांच्या येथील प्रशिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वृद्धिंगत होतो. तिथे त्यांचा ‘करियर पाथ’ वृद्धिंगत होतो. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या काळात आम्ही सामाजिक उपक्रमशीलतेसाठी उद्युक्त करतो.

मला या कार्यात शिक्षक, शालेय कर्मचारी व पालकांचे अमूल्य सहकार्य मिळते. तथापि, माझ्या कुटुंबियांकडून मिळणारा पाठिंबाही शब्दांपलीकडे आहे. प्रत्येक ध्येयवादी व्यक्तीचा एक ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असतो, तसा माझादेखील आहे. नाशिक महापालिकेच्या काही शाळा दत्तक घेऊन त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यादृष्टीने प्रशासनासोबत माझा पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आम्ही ‘कनेक्ट अकॅडमी’ देखील चालवतो. इथे गतिमंद मुलांना शिक्षण देण्याचे कार्य चालते. त्यासाठी काही मानसोपचार तज्ज्ञ तैनात करण्यात आले आहेत. संस्थेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शिक्षणासारखा पवित्र वसा हाती घेतल्याचे मला मनोमन समाधान आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत हा प्रवास सुरू ठेवताना नवनव्या संकल्पना राबवण्याचा माझा निर्धार आहे.

मुलांच्या जडणघडणीसाठी शालेय अभ्यासक्रमाशिवाय कौशल्य विकसन क्षेत्र निर्णायक ठरते. त्यांच्यात ग्राफिक व कॉम्प्युटर स्किल्स विकसित व्हावे. त्यांचे ‘प्रेझेंटेशन स्किल’उत्तम असावे. आमच्या संस्थेत इयत्ता नववी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना त्याच पद्धतीने घडवतो. किंबहुना ‘फोकस्ड एज्युकेशन’ हेच आमचे बलस्थान आहे.

शिक्षण संस्थेच्या विकासाचा आलेख शत-प्रतिशत शिक्षकांच्या कौशल्यावर अवलंबून असतो. त्याचा थेट व दृश्य परिणाम शिक्षणाच्या दर्जा व गुणवत्तेतून अधोरेखित होतो. त्यासाठी विशिष्ट श्रेणीतील मोटिव्हेशन व सकारात्मक वृत्तीची पेरणी करणे संस्थाचालकांचे कर्तव्य ठरते. आमच्या तीनही प्रकारच्या शाळांमध्ये आम्ही प्राधान्याने ती बाब करवून घेतो. तेदेखील आमच्या यशाचे गमक आहे.

(शब्दांकन:मिलिंद सजगुरे)

LEAVE A REPLY

*