पिंपळगाव बसवंत (नाशिक) l रंजना मोरे : कुटुंबसंस्था अभंग राहाण्यासाठी…!

0
माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. विवाहानंतर वर्षातच माझ्या पतीचे अपघाती निधन झाले. अकाली वैधव्य आणि पदरात एक मुलगी यामुळे माझ्यावर मोठे आकाश कोसळले. परंतु त्या परिस्थितीत न डगमगता त्याकाळी मी हॉटेलसाठी पोळ्या तयार करून देत उपजीविका करू लागले. प्रारंभी ३०० पोळ्या करून मी देत असे. प्रामाणिकपणा आणि वेळत देण्यामुळे मला दिवसाला ५०० हून अधिक पोळ्यांच्या ऑडर्स मिळत गेल्या.

दरम्यान, मी शिवणकाम, विणकाम. दुपटी, अंगरखे शिवण्यापासून अगदी छोटीछोटी कामे करत होती. एका महिलेला पुरुषाच्या आधाराशिवाय जगताना किती कष्ट पडतात, हे अनुभवत होते. पतीच्या माघारी संसाराचा गाडा ओढताना किती त्रास होतो, याची मला जाणीव होती. इतर महिलांची अशी परवड होऊ नये म्हणून मला कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्याकाळी गावात व्यसनाधीनतेमुळे अनेक संसाराची वाताहात झालेली मी पाहत होती. मनात विचार येत आपणही पतीच्या माघारी खूप भोगले तसेच इतरांचे होऊ नये, घर मोडू नये, यासाठी कामाची खुणगाठ बांधली. विविध कारणांमुळे पती-पत्नींमध्ये होणार्‍या कलह सोडवण्यासाठी मी सरसावले.

व्यसनाच्या आहारी जाऊन मारझोड करणार्‍या एका महिलेची केस माझ्याकडे आली. नवर्‍यापासून सुटका मिळण्यासाठी त्या महिलेला काडीमोड हवा होता. ही केस मी संयमाने हाताळत त्या महिलेच्या नवर्‍याला दारुचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारा पैशांचा अपव्यय याचे गणित समजावून सांगितले. व्यसनापायी आपले पैसेही जातात आणि घरातील वातावरण बिघडते, हे मी त्याच्या गळी उतरवले. त्यांचा संसार सुखाने सुरू झाला. माझ्या पहिल्याच समुपदेशनाला यश आले आणि त्यानंतर संसार मोडण्यापासून वाचवण्यासाठी गावातीतल अनेक जोडप्यांची प्रकरणे माझ्याकडे तडजोडीसाठी येत गेली.

आर्थिक विवंचेनतून मी स्वत:ला बाहेर पूर्णपणे काढत स्थिरावले होते. अनेक जोडप्यांना समुदेशन करून त्याच्या घटस्फोटापासून परावृत्त करताना मला समाधान मिळू लागले. आता या वळणावर नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था काढण्याची मला गरज वाटू लागली. कामाला अधिक व्यापक आणि कायदेशीर रुप देता यावे, या उद्देशाने २०१२ साली महिला आधार संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकीतून स्थापन केलेल्या महिला आधार केंद्राला आज व्यापक रुप आले आहे.

संंस्थेच्या स्थापनेपासूनच मी हजारो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. नवीन मुलींना नवर्‍याशिवाय सासू-सासरे, नंदन नको असतात. त्यांना जबाबदारी घेण्याची इच्छा नसते, अशी घटस्फोटाची कारणे असतात, हे कामातून स्पष्ट होत गेले. मोबाईल फोन आणि सोशल माध्यमांचा अतिवापर हेही एक संसार दुभंगण्याचे कारण आहे. सासू तुमची आई होऊ शकते, हे मी अनेक तरुण नवविवाहितांना सोदाहरण स्पष्ट करून दाखवले आणि माझे विचार जोडप्यांना पटत गेले, कुटुंब अभंग राहावीत म्हणून अखेरपर्यंत कार्य करत राहणार आहे.

विधवा महिलांचे मुले, होतकरु, गरीब विद्यार्थ्यांना मी शालेय साहित्य, पुस्तके देण्याचे काम करते. पक्षी-प्राणी हे निसर्गाचा अविभाज्य आहे. त्यांच्या रक्षणात धन्यता मानते. सर्वांच्या सहकार्याने मी आजवर इथवर प्रवास करू शकले. माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी खडतर परिस्थितीतून पूढे येणार्‍यांना पुरस्कार देऊन गौरवत आहे.

भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले
इतके मी भोगले की मज हसावे लागले.

दुुभंगलेली मने आणि मोडत जाणारी कुटुंबे मोडण्यापासून वाचवल्यानंतर महिलेच्या तिच्या नातेवाईंकाच्या चेहर्‍यावरील आनंद माझ्यासाठी जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

LEAVE A REPLY

*