वाडीवऱ्हे (नाशिक) l प्रीती शेजवळ : गावविकासाचे ‘अनमोल’ समाधान

0
सामाजिक कार्याचा वसा मला घरातून मिळाला. माझे काका, मोठे आजोबा, हे सामाजिक कार्यकर्ते होते. केवळ राजकारणापेक्षा गावाचा विकास झाला पाहिजे, अशा चर्चा लहाणपणापासून घरात चालत असे. त्या ऐकतच मी मोठी झाले. माझे शिक्षण बीबीए. एमबीए त्यानंतर मानव संसाधनात मी पुन्हा व्यवस्थापनाची मास्टर्स डिग्री घेतली. एका उद्योगाची व्यवस्थापकीय संचालक व्हावी, हे स्वप्न पाहिले. राजकारणात प्रवेश करेल, असे स्वप्नातही वाटले नाही. मात्र शिक्षणाचा फायदा समाजकार्यासाठी करावा, असे माझ्या वडिलांना वाटे. माझे काका विजय शेजवळ ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांच्या प्रेरणेतून मी समाजकारणात उतरले.

वाडीवर्‍हे गावाचा विकास मंदावला होता. गावाचा पाणीप्रश्‍न, रस्ते आणि इतर मूलभूत सेवा-सुविधांची समस्या मोठी होती. इथे खर्‍या अर्थाने नियोजन अवश्यक होते, असे मला दिसले आणि मी सरपंचपदासाठी उभी राहिले. गावकर्‍यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे २०१४ साली प्रचंड मतांनी निवडून आले. गावाचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी गावात पाईपलाईन टाकली. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी फाईल टाकली आहे. लवकरच हे काम मार्गी लागेल, असा मला विश्‍वास आहे. दरम्यान आमच्या गावात केवळ ५ रुपयांमध्ये गावकर्‍यांना २० लिटर पाणी उपलब्ध करून देणारे एटीएम मशीन बसवले आहे.

घनकचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागावा म्हणून ओला-सुका कचरा विलग करणारे यंत्र बसवली आहे. गावात ‘कुंभथॉन’ चमूच्या माध्यमातून स्ट्रिट ऍडे्रस पथदर्शक तयार केले. सर्वात वैशिष्टपूर्ण विकासात मला ई-लर्निंग कार्यक्रमाचा उल्लेख करावा वाटतो. या अतर्ंगत आम्ही गावातील अंगणवाडी, जि.प. शाळांमध्ये एलईडी स्क्रिनद्वारे दृक्-श्राव्य शिक्षण देत आहोत. अशा प्रकाराचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून तो पथदर्शी ठरत आहे. त्यामुळे वाडीवर्‍हे गावाला २०१८ सालाचा आदर्श स्मार्टग्राम पुरस्कार मिळाला आहे. याचे आज समाधान वाटते.

व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण गावाच्या विकासात मी पदोपदी वापरते. सीएसआरच्या माध्यमातून सुमारे ३५ लाखांची कामे केली आहेत. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न आहे. महिलांना स्वयंपूर्ण करणारा उद्योग-व्यवसाय करता यावा, यासाठी मी पहिल्यांदाच इगतपुरी गावातील महिलांना एकत्र करून आर्थिक स्वावलंबन या उपक्रमातून रोजगार, स्वयंपूर्णतेचे धडे दिले. घरगुती उद्योग, चॉकलेट निर्मिती आणि रेशीम उद्योगातून रोजगार दिला. गावात मासांहार विक्रीवर बंदी केली.

दारुबंदीसाठी ग्रामसभा घेऊन कुठल्याही दारू दुकानांना परवानगी द्यायची नाही, हा ठराव पास करून घेतला. प्रत्येक मोठ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा माझा मानस आहे. प्रत्येक घरावर नंबर देऊन शहरासारखे ब्लॉग क्रमांक देण्यासाठी काम करणार आहे. सरपंचपदावरुन गावासाठी काम करताना आज खूप समाधान वाटते. व्यवस्थापनातची पदव्यत्तर पदवी घेऊन सरपंच होणारी मी राज्यातील पहिली महिला ठरली आहे. ग्रामविकास मंत्री होण्याचे स्वप्न आहे. स्मार्ट सिटीप्रमाणे प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज व्हावे, असे माझे स्वप्न आहे. महिलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजकारण, राजकारण करावे. शिक्षणाच उपयोग केवळ स्वार्थासाठी नसावा. तर ज्या समाजात आपण नावरुपाला आलो, त्याच्यासाठी काहीतर कार्य करावे, असे मला वाटते.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*