नाशिक l डॉ. नीलम मुळे : स्वस्थ मनासाठी सारे काही..!

0
मी मूळची अमरावतीची. गेल्या १६ वर्षांपासून पक्की नाशिककर झाले आहे. मी मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मला मानसशास्त्र या विषयाने लहानपणीच मोहिनी घातली होती. एकाच घरात सगळी माणसे एकसारखी का नसतात? त्यांचे स्वभाव वेगवेगळे का असतात? त्यांच्या सवयी भिन्न का असतात? असे अनेक प्रश्‍न मला भेडसावत राहायचे. त्यावर माझ्या बालबुद्धीला साजेसा विचार सुरुच असायचा. मी नववीत असतानाची गोष्ट. वर्तमानपत्रात मानसशास्त्रावरचा लेख माझ्या वाचनात आला.

मी माहिती घेण्यास सुरुवात केली आणि लक्षात आले की मानसशास्त्रात देखील करियर करता येते आणि मी ते केले. मी मानसशास्त्र व समाजशास्त्रात एम.ए. केलेय. तर ‘योगा सायन्स ऍण्ड मेडिटेशन’ विषय घेऊन डॉक्टरेट केली आहे. काही वर्षे प्राध्यापकी-नोकरी केली. पण आता स्वत:ची प्रॅक्टीस करते आहे. माणसे त्यांना काही समस्या निर्माण झाली की दवाखान्याची पायरी चढतात. मुळात मानसिक समस्या असू शकतात, हेच समाजाला अजूनही मान्य नाही. त्यामुळे मानसिक समस्या तीव्र झाल्यानंतरच माणसांनी विपरिततेची जाणीव होते आणि ते मानसोपचार तज्ञांची भेट घ्यायला तयार होतात. मी मानसिक समस्या निर्माणच होऊ नयेत, माणसे मानसिक आजारी पडूच नयेत, यासाठी प्रयत्नशील आहे. माझ्या कामाचा फोकस तोच आहे.

ताणतणाव, आजूबाजूची परिस्थिती माणसावर परिणाम करत असते. अशा परिस्थितीत माणसाची विचारसरणी चुकली तर आयुष्य चुकते. तसे होऊ नये, यासाठी मी काम करते. व्यक्तिमत्त्व विकास कसा साधावा, सकारात्मक विचारसरणी कशी राखावी, ताणतणावांचे, भावनांचे नियमन कसे करावे याचे प्रशिक्षण देते. आत्तापर्यंत मी सात हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना यादृष्टीने प्रशिक्षित केले आहे. ताणतणावांचे, भावनांचे, कामाचे नियमन जमले नाही तर माणसे मानसिकदृष्ट्या अस्थिर बनतात, हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. आयुष्यात अन्य गोष्टींबरोबरच ही सॉफ्ट स्किल्सही तितकीच महत्त्वाची आहेत, हे माणसांना पटायला लागलेय, ही समाधानाची बाब आहे.

पालकांमधला तुटत चाललेला संवाद हा माझ्या अभ्यासाचा, चिंतनाचा व प्राधान्याचा विषय आहे. माणसे फक्त एका घरात राहातात, याचा अर्थ एका छताखाली राहातात, असा झाला आहे. एकत्र बसत नाहीत. गप्पा मारत नाहीत. जेवत नाहीत. बोलत नाहीत. विचारांचे अदानप्रदान करत नाहीत. मग अशा घरातील पुढची पिढी एककल्ली, तर्‍हेवाईक बनण्याचा धोका असतोच. म्हणायला समाज सुशिक्षित होतो आहे; पण तरुण पिढी छोट्या छोट्या कारणांवरुन निराशावाद जवळ करत आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते आहे. नवी पिढी मानसिक कमकुमत व अस्थिर बनली तर समाजाचे भवितव्य काय असेल? याचा विचार सर्वांनीच करायला हवा.

मी देखील पालकांसाठी कार्यशाळा घेते. वाढत चाललेल्या तरुणांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील, यासाठी काम करते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी दहा हजारांपेक्षा जास्त तरुणांपर्यंत पोहोचले आहे. यादृष्टीने तरुणाईचे समुपदेशन करणार्‍या टाटा इन्स्टिट्युटच्या मुंबई पॅनलमध्ये माझा समावेश आहे. समुपदेशन माणसाचे मन पालटते, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते, हे आता समाजाला पटायला लागले आहे.

आज व्यक्तींमध्ये अंगभूत जाणीवांचा अभाव दिसतो आहे. आत्मविश्‍वासाची कमतरता दिसून येते आहे. नकारात्मकतेचा, कमतरतेचा, उणीवांचा बाऊ करण्याची मनोवृत्ती वाढते आहे. अवास्तव भीती त्यांना ग्रासते आहे. या सगळ्याच्या मुळाशी नकारात्मक विचारसरणी आहे, असे माझे अभ्यासांती ठाम मत आहे. ‘मन स्वस्थ तर सगळे मस्त’ हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू आहे आणि राहाणार आहे.

(शब्दांकन : वैशाली शहाणे-सोनार)

LEAVE A REPLY

*