नाशिक l ऍड. मीनल केंगे (विधिज्ञ) : जमिनींचे गुंते सोडवताना…

0
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे शून्यातून विश्‍व उभे करण्याची मला नेहमीच आस होती. तेवढी जिद्द आणि चिकाटी माझ्यापाशी लहानपणापासूनच आहे. वकिलीच्या क्षेत्रात पदार्पण करताना अनेक संकटे कोसळली, पण अंगभूत बंडखोरपणामुळे मी इथेही नेहमीपेक्षा वेगळी वाट चोखाळून वेगळे अस्तित्व सिद्ध करू शकले. भूमाफियांची दहशत असो वा एखाद्याने देऊ केलेली नको असलेली केस, मी त्यापुढे कधीच झुकले नाही. कारण इतर क्षेत्रांप्रमाणेच वकिलीच्या क्षेत्रातही बुद्धी आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे आणि तो माझ्याकडे आहे.

माझे मूळ गाव संगमनेर. पदवीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. शाळेत असताना वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत भाग घेऊन त्यात यशही मिळवत असे. माझे वडील वसंत मारवाडी हे शेती आणि बांधकाम व्यवसायात होते. घरात शिक्षणाला पोषक वातावरण होते. परीक्षेनंतर त्या काळात हुशार मुलांनी सायन्सलाच जायचे, असा ट्रेंड होता; पण माझा कल आर्ट्सकडे होता. आर्ट्सला अक्षरशः बंड करून प्रवेश घेतला. अर्थशास्त्र आणि इंग्रजी साहित्य हे माझ्या आवडीचे विषय होते. पुढे मी इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आणि वकील होण्याचा निर्णय घेतला. वडिलांचा माझ्या या निर्णयाला ठाम पाठिंबा होता. त्यांना वाटायचे, ही जिद्दी आहे, सातत्य कायम ठेवले तर नक्की पुढे जाईल. ते म्हणायचे, ‘कुणी अरे केले की आपण का रे करायचे. उगाचच सहन करायचे नाही. 
’पण आईला वाटायचे, मी प्राध्यापक होऊन सुरक्षित आयुष्य जगावे, कोणत्याही जास्त जोखमीच्या क्षेत्रात उतरू नये. पण माझा निर्णय झाला होता. मी नाशिकच्या विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घ्यायचे ठरवले. पहिल्यापासून आत्मविश्‍वास आणि जिद्द या दोन महत्त्वाच्या गोष्टी माझ्याबरोबर होत्या. घरचे कुणीही वकिली क्षेत्रात नसल्याने हे क्षेत्र नवखे होते; पण मला साजेसे होते. एलएलबी करत असताना हिंदू लॉ या विषयात मी टॉपर होते. याच दरम्यान घरी अचानक संकट आले. वडील आजारी पडले आणि अंथरूणाला खिळून होते. आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली. नाशिकला चार वर्षं पेईंग गेस्ट म्हणून राहिले, त्यासाठी सहाशे रुपये खर्च यायचा. आपण तेवढेही पैसे कमवू शकत नाही, याचे वाईट वाटायचे. त्यावेळी प्रशिक्षणार्थींना स्टायपेंड देण्याचा प्रघात नव्हता. तो आता सुरू होतोय. कोणत्याही प्रशिक्षणार्थी वकिलांना वरिष्ठांकडे काम करावे लागते. कार्यपद्धती समजून घ्यावी लागते.

मी वकिलीला सुरुवात केली तेव्हा महिला वकिलांनी फक्त घटस्फोटितांचे दावे चालवायचे, असा जणू अलिखित नियम होता. पण मी मात्र आवड म्हणून जमिनी, मालमत्ता याच्याशी संबंधित कामे करायचे ठरवले. न्यायालयात प्रॅक्टिससाठी जागा भाड्याने घेतली. वडील शेती करत असल्यामुळे जमिनीचे उतारे लहानपणापासूनच पाहिलेले होते. मी प्रशिक्षणार्थी म्हणून ज्यांच्याकडे काम करत होते ते माझे वरीष्ठ निवृत्त होण्याच्या मार्गावर होते. सन १९९८ मध्ये वकील झाल्यानंतर तीन वर्षें मी त्यांच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून जात होते. त्यांची जवळपास सगळी कामे जमिनीशी संबंधित होती. माझी वकिलीची सनद घ्यायला मला मुंबईला जावे लागणार होते. तिथेच माझ्या वरिष्ठांचेही एक काम होते.

ते काम मी करावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी मला विचारले, ‘एका विषयावर आर्ग्युमेंट करायचे आहे, करशील का?’ माझ्यासाठी ती चांगली संधी होती. तिथे काय बोलायचेय ते सरांनी समजावून सांगितले. काही पुस्तकांचे वाचन करायला सांगितले. पुस्तकांमधले काही उतारे मी ट्रेनमध्ये वाचले. सनद केल्यावर एमआरटीमध्ये माझ्या आयुष्यातले पहिले वकीलपत्र दाखल केले. तेव्हा मी तेवीस-चोवीस वर्षांची असेन. त्यावेळी काहीजणांनी मला, तुम्ही हे करू शकाल का?असे विचारले. मी ठामपणे हो म्हणाले. चांगला अनुभव मिळाला. तयारी केल्यामुळे भीतीही वाटली नाही. माझे प्रतिस्पर्धी वकील आर्ग्युमेंटनंतर भेटले आणि चांगले सादरीकरण होते, असे म्हणाले.

अगदी सुरुवातीच्या काळात माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे असलेले काही वकील ‘ही काय बोलणार?’ असे तुच्छतेने पाहायचे. पण नंतर माझी क्षमता त्यांच्या लक्षात येत गेली. स्वतंत्रपणे प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावर कसोटीचा काळ होता. तीन महिन्यांचे बाळ नवर्‍याकडे सोडून मी काही तास काम करत असे. मी घरी परतल्यावर नवरा त्याचा व्यवसाय सांभाळत असे. सुरुवातीच्या काळात संघर्ष खूप होता पण काम आणि पैसे दोन्ही मिळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. दुसरीकडे कुठेच लक्ष दिले नाही. कारण एक लक्षात आले, काळ्या कोटाला नावे ठेवताना लोक दमत नाहीत; पण वेळ पडल्यावर काळ्या कोटाचाच आधार घेतात.

त्यांचा पहिला फोन ओळखीच्याच वकिलांना जातो. पण आजही वकील मुलींची लग्न होण्यास अडचणी येतच आहेत. आमची इतर नोकरदारांसारखी दहा ते सहा नोकरी नसते. वकिली व्यवसायात आपण जितका अभ्यास करू तितका कमीच असतो. घरात प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर काही काळाने चेंबरमधील टेबल स्पेस भाड्याने घेतली. क्लाएंटचा विश्‍वास मी संपादन करू शकत होते, त्यामुळे वकिली व्यवसायात तिथे जम बसायला लागला होता. दरम्यानच्या काळात काम चांगले चालू झाल्यामुळे टेबल स्पेस सोडून घरी टेबल टाकून काम सुरू केले. दुपारी चारपर्यंत न्यायालयात काम केल्यानंतर वाचनालयात जाऊन मग घरी जायचे, रात्री परत महत्त्वाच्या बाबींचे टायपिंग करायचे. अशी दिनचर्या चालू असतानाच न्यायालयाजवळील एका चहावाल्याने मला ‘एक चेंबर भाड्याने द्यायचेय,’ म्हणून सांगितले. आणि मी ते घेतले.

वकील म्हणून मला पहिली मोठी संधी अशोका ग्रुपने दिली. त्यावेळी मी २५ ते २६ वर्षांची म्हणजे या क्षेत्रात अगदीच अननुभवी होते. खूप अनुभव नसताना ही केस चांगल्या पद्धतीने कशी लढवू शकेल, असे काही जणांना वाटले होते. कारण माझ्याविरुद्ध तीस वर्षांचा अनुभव असलेले नावाजलेले वकील होते. मी म्हटले, मी शंभर टक्के प्रयत्न करेन. खूप अभ्यास आणि प्रयत्न करून निकाल माझ्या बाजूने लागला. तुम्ही प्रामाणिकपणाने काम केल्यास तुमच्या मागे कामे येतातच, हा अनुभव मी घेतला. काही काळानंतर मी स्वतःचेच ऑफिस घेतले.

जमिनी, मालमत्तांशी संबंधित केसेस लढवते. हे काम करत असताना असे लक्षात आले की, गरीब शेतकर्‍यांना वडिलोपार्जित जमिनी सांभाळताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी मोठ्या रकमा खर्च कराव्या लागतात, बरेचदा त्यांची फसवणूकही होते. त्यामुळे मी गरीब लोकांना येणार्‍या स्थावर मिळकतीच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी मदत करते. त्यासाठी माझ्या लॉ फर्मची मोठी टीम कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांपासून जमिनींचे भाव गगनाला भिडलेत. लोकसंख्या वेगाने वाढते आहे, पण जमिनी तेवढ्याच आहेत.

अर्थातच माफियांचे मोठे पेव फुटलेय. यांच्याविरुद्ध लढताना पुरुष वकील अधिक चांगले काम करू शकतील, असे आधी लोकांना वाटायचे. पण या लढाया लढताना मनगटी बळापेक्षा बुद्धिमत्ता, कागदोपत्रांच्या सहाय्याने केलेली लढाई अधिक उपयोगी पडते, हे मी माझ्या कामातून दाखवून दिले. त्यामुळे एक दोन कटू अनुभव सोडले तर मला अशा केसेस लढवताना फारसा त्रास झाला नाही. संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि ठामपणा यामुळे मी माझे वेगळेपण सिद्ध करू शकते आहे. अनुभव वाढत गेला तसे कुणाशी कसे बोलायचे हे समजत गेले.

पक्षकार केस घेऊन आल्यावर मी आधी टायटल तपासते, अभ्यासते, केस योग्य वाटली तरच हातात घेते. ती माझी ओळख झाली आहे. खोट्या, चुकीच्या गोष्टींना मी पाठबळ देत नाही. जमिनीसारखे सध्याच्या काळातले धगधगते क्षेत्र माझ्याशी संबंधित असूनही मी माफियांच्या, गुंडांच्या धमक्यांना कधी घाबरले नाही की, बळी पडले नाही. अशा प्रकारच्या केसेस लढताना कधी पक्षकार रात्रीतूनही बदलतात. असे बरेच किस्से आहेत. सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करावे लागते. माणुसकी आणि सामाजिक जाणिवेने शोषितांच्या मागे कायद्याच्या आधाराने उभी राहते. बर्‍याच जणांच्या जमिनी वाचवल्याचे समाधान आहे.

जमिनींच्या केसेसच्या बरोबरीने इतर केसेसही लढवते. घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असलेल्या दाम्पत्यांमध्ये मध्यस्थ म्हणून तडजोडीने केस हाताळण्याचा प्रयत्न करते. पण अगदीच तसे शक्य नसल्यास योग्य तो सल्ला देणे हे ‘मेडिएटर’ म्हणून आमचे कामच असते. स्त्रियांमध्ये प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता अधिक प्रमाणात असल्याने महिला वकिलांना प्राधान्य देण्याचे प्रमाण सध्या वाढतेय. प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना मला सांगायचेय, शिक्षण ही खूप चांगली गोष्ट आहे. बुद्धी आपल्याकडून कोणी हेरावून घेऊ शकत नाही. प्रत्येकीने भरपूर शिकावे आणि शिक्षणाचा उपयोग करावा.

मी जमिनी, मालमत्तांशी संबंधित केसेस लढवते. हे काम करत असताना असे लक्षात आले की, गरीब शेतकर्‍यांना वडिलोपार्जित जमिनी सांभाळताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी मोठ्या रकमा खर्च कराव्या लागतात, बरेचदा त्यांची फसवणूकही होते. त्यामुळे मी गरीब लोकांना येणार्‍या स्थावर मिळकतीच्या कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी मदत करते. त्यासाठी माझ्या लॉ फर्मची टीम कार्यरत आहे.

शिक्षण ही खूप चांगली गोष्ट आहे. बुद्धी आपल्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येकीने भरपूर शिकावे आणि शिक्षणाचा उपयोग करावा. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे शून्यातून विश्‍व उभे करण्याची मला नेहमीच आस होती. तेवढी जिद्द आणि चिकाटी माझ्यापाशी लहानपणापासूनच आहे. वकिलीच्या क्षेत्रात पदार्पण करताना अनेक संकटे कोसळली, पण अंगभूत बंडखोरपणामुळे मी इथेही नेहमीपेक्षा वेगळी वाट चोखाळून वेगळे अस्तित्व सिद्ध करू शकले.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*