सिन्नर l माया सोनवणे : क्रिकेट मैदानावरची राणी

0

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात
बहरलेली माणसांची अजब जंगले….
हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो संपला

सुनील गावस्कर या ज्येष्ठ क्रिकेटपटूचे हे बोल प्रत्येक क्रिकेटपटूला किती लागू होतात, नाही? पण आता क्रिकेटराजाबरोबर क्रिकेटराणी हा शब्दही प्रचलित व्हायला हवा. कारण आता आम्ही महिला क्रिकेटपटूही हिरवळीची क्रिकेटची मैदाने गाजवतोय. मीही परिस्थितीशी लढत, झगडत, गरिबीला तोंड देत चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतेय. म्हणूनच आतापर्यंत महाराष्ट्र संघात तसेच रणजी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. मी सिन्नरच्या कानडे मळ्यात राहते. घरची परिस्थिती नाजूकच आहे. वडील कामाला जातात. आई विड्या वळण्याचे काम करायची. मोठा भाऊ आहे.

आमच्या छोट्याशा घरातली मोठी संपत्ती म्हणजे आम्ही एकमेकांना धरून आहोत. तीच आमची ताकद आहे. माझ्या कुटुंबियांनी माझ्याबरोबरीनेच मी मोठी क्रिकेटपटू होऊन भारताचे प्रतिनिधित्व करावे, हे स्वप्न बाळगलेय. हे स्वप्न ही आमच्या विचारांची श्रीमंती आहे. सुप्त गुणांचे मोकळे पंख पसरून मोठी झेप घ्यायचीय. अनेकांच्या नजरा आपल्या खेळाकडे लागलेल्या असतात. त्यांचाही अपेक्षाभंग होऊ नये, असे खेळायचेय. मी दुसरीत शिकत होते. शाळेतून घरी आले की सायकल चालवायला परिसरातल्या मोकळ्या जागेवर जात असे. त्यावेळी आमच्या इथे राहणारे सुनील कानडे काका त्यांच्या मुलीशी तिथे बॅट-बॉल खेळत असत. त्यांना बॅटने टोलवलेला बॉल देण्यासाठी कुणीच नव्हते. ते काम मी करत असे. कानडे काकांकडे पॅड, बॅट, बॉल, हेल्मेट हे क्रिकेटचे किट होेते. त्यांनी चार-पाच दिवस मला खेळायला घेतले.

त्यांच्या लक्षात आले की, मी चांगले खेळते आहे. त्यांनी मला बॉल टाकायला शिकवले. त्याचवेळी माझ्या मोठ्या भावालाही समजले की मला क्रिकेट खेळायला, त्यातल्या त्यात बॉलिंग करायला आवडते. आमचा खेळातला उत्साह आणि आवड पाहून कानडे काकांना वाटले आपण मुलींची क्रिकेटची टीमच का करू नये? गल्लीतल्या मुलींना घेऊन आम्ही मुलींची क्रिकेट टीम तयार केली. सिन्नरहून शिवाजी जाधव सर नाशिकला क्रिकेटचा सराव घेण्यासाठी कोच म्हणून जायचे. नाशिकला चांगले मैदान असून तिथे मुलींच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात, असे त्यांनी सुचवले. आमच्या घरापासून काही अंतरावर एक नेट लावलेली मोकळी जागा होती; पण ती सरावासाठी तितकी योग्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आम्हा मुलींना सरावासाठी नाशिकला घेऊन जायचे ठरवले. मी दहा-बारा वर्षांची असताना नाशिकला जाऊन सराव करायची. त्यानंतर सिन्नरला एक मैदान झाले होते, तिथेही सराव करत असे.

नाशिकमधले प्रशिक्षण संपल्यावर चांगल्या खेळाडूंची एक टीम तयार करतात. त्यात माझी निवड झाली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेतही माझी निवड झाली. २०१३ मध्ये राज्य पातळीवरील संघात माझी निवड झाली. २०१४ मध्ये मी बीसीसीआयची खेळाडू होते आणि त्यावर्षी सर्वात जास्त विकेट घेणारी खेळाडू ठरले. त्याचवर्षी माझी रणजी क्रिकेटसाठीही निवड झाली. महाराष्ट्र, मुंबई, सौराष्ट्र, बडोदा, गुजरात या पाच टीममधून जे खेळाडू चांगले खेळतात त्यांची एक टीम तयार केली जाते. त्याही टीममध्ये माझी निवड झाली. पण २०१६ साली खेळतानाच माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आणि मी दोन सामने कमी खेळले. ते सामने खेळले असते तर कदाचित मी भारतात पहिल्या क्रमांकाची बॉलर असते. आता मी चौथ्या क्रमांकावर आहे.

ही माझी क्रिकेटची वाटचाल आहे. पण ही वाटचाल म्हणजे अडथळ्यांची शर्यत होती आणि आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने बाहेर सामन्यांसाठी खेळायला जाण्यासाठी पैसे नसायचे. माझे पप्पा त्यावेळी मित्रांकडून पैसे उसने घेत आणि मला खेळायला पाठवत. क्रिकेट हा महाग खेळ असल्याने आमच्या १५ जणींमधल्या आता आम्ही दोघीच खेळतोय. कानडे काकांनी मला खूप मदत केली. आई-पप्पा आणि भावाचे मोठे पाठबळ आहेच. एक मुलगी म्हणून क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी मला कधीच रोखले नाही.

उलट जेवढे शक्य होईल तितके मला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला. माझा परफॉर्मन्स चांगला असल्याने त्यांनी मला ऋण काढून मदत केली, असे म्हणावे लागेल. राज्य पातळीवर खेळायला लागल्यावर मलाही समज येत गेली. सिन्नरलाच काय; पण ग्रामीण भागात अजून खेळाडूंना हव्या त्या सुविधा मिळत नाहीत. सरावासाठी शहरांमध्ये जाण्या-येण्यात त्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होते. मीही नाशिकला जाते. रोज चार तास सराव करते. शंभर बॉल टाकले जातात. विकेट मिळणे यावर लक्ष केंद्रित करते.

फिटनेससाठी धावणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार या गोष्टी नियमित करते. कडाक्याच्या थंडीच्या दिवसातही सकाळी सहा वाजता नाशिकला जाण्याचा नियम मोडला नाही. तिथून सिन्नरला आल्यावरही थोडा वेळ सराव करते. माझ्या आहाराकडे अतुल गोसावी सर, शिवाजी जाधव सर, भाऊ आणि आई-वडील काटेकोर लक्ष देतात.

सध्या मी सिन्नरला बी.ए.च्या पहिल्या वर्षाला आहे. अभ्यासाला वेळ मिळत नाही. परीक्षेच्या काळात स्पर्धा असतील तर माझी परीक्षा वेगळी घेतली जाते. स्पर्धांच्या निमित्तानेे मी म्हैसूर, कटक, ओडिशा, अहमदाबाद, राजकोट अशी भारतभर फिरले आहे. स्पर्धेच्या वेळी विरोधी संघातील खेळाडू आपल्या बॉलिंगचे कौतुक करतात. तो क्षण आनंदाचा असतो. अजून मेहनत करून मला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघात खेळायचेय. नुसते खेळायचे नाही तर क्रिकेटचे मैदान गाजवायचेय, हुकायचे नाही.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*