नाशिक l मनिषा साठे : विद्यार्थी सर्वांगीण विकासाचे लक्ष्य

0
देवळालीच्या सेंट पॅट्रीक्समधून मी शालेय शिक्षण पूर्ण केले. बिटको महाविद्यालयात १२ वीत असतानाच ‘इंग्लिश प्रेप्स स्कूल’ शाळेत शिक्षिका म्हणून कामाची संधी मिळाली आणि इथूनच माझ्या अध्यापन कारर्किदीला प्रारंभ झाला. त्यानंतर मी वाणिज्य शाखेची पदवी, बीएड्, एमए इंग्रजी मुलींसोबत पूर्ण केले. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फमेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, क्राफ्ट टीचर ट्रेनिंग कोर्स असे शिक्षण घेतले.

सुभाष गुजर स्कूलमध्ये शिक्षक म्हणून शिकवले. ए. पी. पटेल स्कूलमध्येही मी काही काळ शिकवले. त्यानंतर रवींद्र विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. १८ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव हाताशी होता. त्यानंतर १०९ वर्षे जुन्या पुणे विद्यार्थी गृहाच्या काकासाहेब देवधर शाळेत २००२ साली मुख्याध्यापिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २ वर्ग आणि २१ विद्यार्थ्यांवर शाळा सुरू झाली. आज शाळेचा पसारा वाढला आहे. आमच्या शाळेत टाकाऊतून टीकाऊ वस्तू तयार करणे, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, शिक्षणेतर उपक्रम, मुलांमध्ये सभाधीटपणा वाढवा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करतो.

कर्करोगाने पीडित रुग्णांसाठी निधी गोळा करुन देणे, स्काऊट गाईड, स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण असे विविध गोष्ट शिकवत आहोत. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध पारितोषिक मिळवले आहे. मुलांमध्ये सर्वधर्मसमभावाची जाणीव रुजावी, संस्कार आणि मूल्यांचे धडे मिळावेत म्हणून आठवड्यातील सहा दिवस वेगवेगळ्या प्रार्थना घेतो. त्यामध्ये पसायदान, शिवस्तुती, मनाचे श्‍लोक यासह विविध संस्कारक्षम रचनांचा समावेश आहे. पालकांसाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही आयोजित केले आहेत. मुलांना वाचनाचे संस्कार व्हावे, यासाठी आम्ही ग्रंथालयातील विविध पुस्तके उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या नोंदी काढणास सांगतो.

नित्य प्रार्थनेच्या वेळी मुले वृत्तपत्रातील बातम्यांबद्दलही सादरीकरण करतात, यामुळे त्यांच्यातील वाचनाची अभिरुची विकसित केली जाते. आमच्या शाळेतील सर्व वर्गात डिजिटल फळे आणि दृक्-श्राव्य सादरीकरणाने स्मार्ट शिक्षण दिले जात आहे, हे मी अभिमानाने नमूद करते. शिस्त ही माझ्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग आहे. माझ्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही शिस्तीचे धडे देते. शिस्तीशिवाय जीवनात यश नाही, असे मानते. पुणे विद्यार्थीगृहाच्या पंचवटील शाखेत आम्ही २०० हून आधिक मुलांना मोफत शिक्षण देत आहोत.

काकासाहेब देवधरमध्ये काही गरीब आणि होतकरु मुलांसाठी फी माफीची सवलतही देतो. यातून शिक्षणाचा वसा अखंडित सुरू ठेवत आहोत. आजची मुले स्मार्ट झाली आहेत. त्यांच्यात उत्तम क्षमता आहेत, परंतु त्यांच्यावर पालकांनी अमूक एक करिअर कर, असे स्वप्न लादू नये, त्यामुळे मुले बंड करून उठतात. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न आपल्या पाल्यांवर लादणारे पालक मी पाहते तेव्हा दु:खी होते.

मुलांना ज्या विषयात रस असेल त्याच विषयात त्यांना करिअरची संधी दिली पाहिजे. आज समाजात सर्वच क्षेत्रातील ज्ञानवंतांची गरज आहे. मळालेल्या पारंपरिक करिअरच्या वाटेपेक्षा आणि पैशा देणार्‍या ‘तथाकथित’ कारकिर्दीपेक्षा मुलांच्या अभियोग्यता आणि कल ओळखून शिक्षणास प्रोत्साहन दिल्यास नजिकच्या भविष्यात भारतातील ही पिढी जगावर राज्य करेल, यात शंका नाही. महिलांना करिअर करण्यास कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही. त्यांनी ध्येय ठरवावे आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत अथक वाटचाल करत लक्ष्यप्राप्ती करावी. स्त्रीशक्ती उत्तुंग अफाट आहे. इच्छाशक्ती आणि इरादे पक्के असणारी प्रत्येक महिला यशाच्या आकाशाला गवसणी घालतेच, असे मी म्हणेल.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*