सिन्नर l मनीषा पोटे : लढाई परिवर्तनाची…!

0

‘देव देवळात नसते, देव माणसाच्या मनात र्‍हायते
ज्या माणसाले खायला भेटत नसन त्याले खायला द्याव,

ज्याले शिक्षण नसन त्याले शिक्षण द्याव
ज्याले आसरा नसन त्याले आसरा द्याव’

हे सांगणारे गाडगेबाबा खर्‍या अर्थाने माझे आदर्श आहेत. माकडवाल्याच्या मुलाने माकडवालाच व्हायचे का? वैदूच्या मुलाने तोच वारसा चालवायचा का? ग्रामीण भागातल्या कष्ट डोक्यावर घेणार्‍या बायांनी कधी चांगले आयुष्य जगायचेच नाही का? शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण सोडणार्‍या बुद्धिमान मुलींनी बालवयात लग्न करून फक्त ‘अरे संसार संसार’चीच धून वाजवायची का? त्यांनी माणूस म्हणून कर्तृत्व कधी दाखवायचे? हे आणि असे अनेक प्रश्‍न सामाजिक कार्याचे रितसर शिक्षण व प्रशिक्षण घेताना माझ्या मनात येत असत. एमएसडब्ल्यू केल्यावर या प्रश्‍नांचा शोध घ्यायला बाहेर पडले. परिघाबाहेरचे वेगळे जग पाहिल्यावर उमगली एक वेगळी दिशा.

‘युवामित्र’चा जन्म त्यातूनच झाला. केटीएचएम महाविद्यालयात एम.ए. केल्यानंतर तेथील प्राध्यापक डॉ. जी. एल. कुलकर्णी यांनी मला एमएसडब्ल्यू हा नवीन कोर्स कर, असा सल्ला दिला आणि त्यावेळी माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. शिकत असतानाच सामाजिक कार्यकर्ते सुनील पोटे यांच्याशी ओळख झाली. आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो आणि त्यांना छात्रभारतीचा अनुभव होता. अभिव्यक्ती मीडिया सेंटरनेही या काळात मार्गदर्शन केले. दोन महिने नर्मदा आंदोलनातले काम जवळून पाहिले. मेधाताई पाटकर, बाबा आमटे यांच्याबरोबर काहीकाळ काम केले आणि आयुष्यच बदलले. प्राधान्यक्रमही बदलले.

त्यानंतर वाटले, ग्रामीण भागात काम करायची खूप गरज आहे. तिथे काम करण्यापूर्वी तिथल्या लोकांचे जगणे-वागणे आणि भाषा समजून घेणे आवश्यक होते. या सर्व कालावधीत आमचे सूर जुळताहेत, मार्ग एकच आहेत, असे लक्षात अल्यावर सुनील पोटे यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करताना आर्थिक अडचणी होत्या. त्यासाठी तीन-चार वर्षे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नोकर्‍या केल्या. त्यानंतर स्वतंत्रपणे काम करण्यासाठी रितसर ‘युवामित्र’ या स्वयंसेवी संस्थेचे रजिस्ट्रेशन केले. सध्या मी युवामित्रची प्रकल्प अधिकारी आणि सचिव आहे.

सिन्नरमध्ये वचन संस्थेंतर्गत आदिवासी भागात काम केले. ‘युवामित्र’तर्फे चास, नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुक, माळवाडी, गुरेवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, खंबाळे, मल्हार खुर्द, दत्तानगर या गावांमध्ये कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात प्रचंड अडचणी आल्या. कधी कधी नैराश्य यायचे. आपल्याला काम करता येईल का, असे वाटायचे. पण गावांमध्ये जाऊ लागले. महिलांना एकत्र आणण्यासाठी बचतगट सुरू केले. पाच वर्षे बचतगट चालवले आणि नंतर ते बंदही केले. बचतगट बंद करणारी कदाचित आमची पहिलीच संस्था असेल. कारण बचतगटातून मिळणार्‍या कर्जाचा उपयोग स्त्रीला कधीच झाला नाही, असे लक्षात आले. लग्न वा अन्य गोष्टींसाठी पैशांची उचल व्हायची. बँकेचा माणूस दारात जायचा तेव्हा त्याला सामोरी जाणारी स्त्री असायची, कर्ज फेडले गेले नाही की तिच्याशी वगणूक अपमानास्पद असायची आणि त्या कर्जाचा लाभ मात्र अख्ख घर घ्यायचे.

ज्या कामासाठी बचतगट स्थापन केले तो उद्देश सफल झाला. महिला घराबाहेर पडल्या, त्या निर्णय घेऊ लागल्या. २००५ मध्ये सिन्नरमध्ये आरोग्यमित्र हा नवा प्रकल्प सुरू केला. त्याअंतर्गत गर्भवती महिला आणि कुपोषणावर काम सुरू झाले. याअंतर्गत आम्ही कुपोषित मुलांवर मोफत उपचार करतो. मूल दवाखान्यात भरती असेल तर त्याच्या आईची जेवणाची सोय करतो. कुपोषणावर मात करण्यासाठी गूळ, सोयाबीन, गहू, मुगाची डाळ, शेंगदाण्यांचा वापर करून स्वतः आहार तयार केला. घरी जाऊन महिलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. हात धुणे, स्वच्छता, योग्य आहार. नंदूरबारमध्येही तीन गावांमध्ये काम केले. आम्हाला आर्थिक सहाय्य दिलेल्या एजन्सीने आरोग्यमित्र हा चांगला कार्यक्रम म्हणून घोषित केला. अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी शेळीपालन या जोडउद्योगाचा प्रयोग केला.

गोट रिसोर्स सेंटर उभे करून एक चांगला उद्योग उभा राहिलाय. शेळीपालन करून कुटुंबे सावरली आहेत. ‘पशुसखी’ हे मॉडेल यशस्वी झाले. माकडवाडीमध्ये माकडवाले, वैदू, भराडी, जोशी यांच्या मुलांसाठी बालवाडी चालवून मराठी भाषा शिकवली. त्यामुळे शाळेत गेल्यावर या मुलांना भाषा समजायला अवघड जात नाही. वैदूवाडीमध्ये दसर्‍याच्या दरम्यान यात्रेमध्ये बोकडबळीची प्रथा आहे. ही प्रथा थांबवण्यासाठी आपण याचे चित्रिकरण करायचे आणि ती फिल्म बळी देणार्‍यांना दाखवल्यास कदाचित त्यांचे मनपरिवर्तन होईल, असे वाटले होते.

ते चित्रिकरण करताना हत्या पाहणे हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग होता. त्यावेळी मी वस्तीप्रमुखाला भेटल्यावर तो म्हणाला, ही प्रथा बंद केली तर तुम्ही इथे कधीच दिसणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. अप्रत्यक्षपणे त्याने धमकीच दिली होती. प्रसंग अनेक आले; पण हिंमत येत गेली. गेली १८ वर्षे मी ग्रामीण भागात काम करते आहे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला-बाल हे माझ्या कामाचे महत्त्वाचे भाग आहेत. २००१ साली ‘क्षणोक्षणी शिक्षण’ हा उपक्रम सुरू केला. ‘निसर्गमित्र’ उपक्रमांतर्गत देवनदी पुनरुज्जीवित केली. या कामात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सुमारे ३० गावांमध्ये विधवा, परितक्त्या, भूमिहीन महिलांसाठी तसेच शेतमजुरांसाठीही काम करते आहे.

सावित्रीबाई फुले ही कंपनी सुरू केली आहे. शोषखड्डे, परसबाग यासारखे उपक्रमही राबवले जातात. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही त्या माध्यमातून करतो. किशोरवयातली मुले म्हणजे देशाचे भावी जबाबदार नागरिक. मुलींना शरीराची ओळख, जैविक बदल समजावून सांगितले जातात. पाळी या प्रक्रियेची माहिती दिली जाते. एक दिवसाचे प्रशिक्षण घेतले जाते. त्यात मुलींच्या आईला सामावून घेतले जाते. या प्रक्रियेत प्रत्येक पोलीस स्टेशनलाही जोडून घेतलेय. वैद्यकीय मदत, गृहभेटी, समुपदेशनाद्वारे ६ हाजार मुली जोडल्या गेल्यात. मुली अगदी रात्री दहालाही फोन करतात. एका सातवीतल्या मुलीने मामेभावाबरोबर पळून जाणार असल्याचे मला पत्र लिहिले. ही आई-वडिलांची चौथी आणि ‘नकुशी’ होती.

मला तिच्याआधी आईचेच समुपदेशन करावे लागले. तिच्या घरातले वातावरण चांगले नसल्याने तिने असा अविचार केला. समुपदेशनाने ते घर सावरले. बालविवाह रोखण्यासाठी, जन्मदर आवाक्यात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरण, सरकारी योजनांची ओळख करून देण्याचे कामही आम्ही करतो आहोत. गेल्या डिसेंबरपासून जव्हारमधील दहा गावांमध्येही कुपोषणासंदर्भात काम सुरू केलेय. रामनगर भागात शंभर टक्के दारुबंदी केली. दिवसा लोक मजुरीसाठी जातात म्हणून रात्री बैठका घेतल्या. गावातल्या १० हातभट्ट्या बंद केल्या.

मागील वर्षी जलसंवर्धन केल्यामुळे ओसाड जमिनी लागवडीखाली आल्या. ‘कृषीमित्र’ या उपक्रमांतर्गत माती आणि पाणी यांची तपासणी होते. बघता बघता कामाचा व्याप वाढलाय. समोर आव्हाने आहेत. ज्याच्याकडे जे नाही ते देण्याचा छोटा प्रयत्न आहे. माझे काम पाहून आई-वडिलांचाही पाठिंबा मिळालाय. मुलगी अगदी लहान असल्यापासून प्रत्येक गावात जाताना तिला घेऊन जायची. तिला कुणाच्या तरी घरी ठेवायचे आणि बैठका घ्यायच्या. त्यामुळे हे काम तिच्या अंगवळणी पडलेय. कार्यकर्ते तयार झाले. ११० लोकांचा स्टाफ आहे. अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मेधाताई पाटकर, बाबा आमटे यांच्याबरोबर काहीकाळ काम केले आणि आयुष्यच बदलले. प्राधान्यक्रमही बदलले. त्यानंतर वाटले ग्रामीण भागात काम करायची खूप गरज आहे. तिथे काम करण्यापूर्वी तिथल्या लोकांचे जगणे, वागणे आणि भाषा समजून घेणे आवश्यक होते. ‘युवामित्र’च्या माध्यमातून सामाजिक कामांशी जोडले गेले आहे.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*