नाशिक l मनिषा धनवटे : …मोडला नाही कणा!

0
विवाह झाल्यानंतर चौथ्या दिवशीच माझा अपघात झाला. स्पाईन स्कॉड एल-३ आणि ४ यांचा पूर्णपणे चुरा झाला. माझे दुखणे वाढत गेले. तीन शस्त्रक्रिया झाल्या. ताप मेंदूत जाऊन मी कोमात गेले. त्यातून बाहेर आल्यानंतर मला अपंगत्त्व आले. या सर्व प्रक्रियेत १७ महिन्यांत मी दृष्टीही गमवली. माझे पती इंटिरिअर डिझायनर तर मी फॅशन डिझायनर, मला कपड्यांची डिझाईन करणे, कलात्मक पद्धतीने शिवून घेणे खूप आवडते. मात्र विवाहनंतर त्याचा अवघा तेरा दिवस आम्ही आनंद घेऊ शकलो. त्यानंतर माझ्या जीवनात अशा घटना घडत गेल्या. यामुळे मी नर्व्हस ब्रेक डाऊनमध्ये गेले. एकटी घरात राहून अक्षरश: हताश वेडी झाले.

हे असे परावलंबी जीवन संपवावे, अशा निणर्याप्रत येऊन पोहोचले. पण विझलेल्या मनात आणि थकलेल्या गात्रात घराच्यांचा प्रेम, जिव्हाळा आणि पतींनी माझ्या दिव्यांगास मला दिलेला आधार यामुळे माझ्या गात्रात नवी ऊर्जा मिळत गेली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर हेमंत त्रिवेदींचा त्याच दरम्यान अपघात झाला होता. त्यांची कहाणी मला माझे डॉक्टर सांगत. त्यानेही संकटांतून त्याने स्वत:ला सावरत व्यवसायाकडे स्वत:ला वळवले होते. या संकटाने खचून न जाता स्वत:ला सावरत आपल्यावर प्रेम करणार्‍या लोकांसाठी जगले पाहिजे, अशी खुणगाठ मी बांधली. आता रडायचे नाही तर लढायचे हे मी ठरवले. मला स्वयंपाकाची आवड होती.

अनेक समाज आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीशी माझा जवळून संबंध आल्यामुळे मी उत्तम प्रकारच्या पाककला शिकले होते. त्यामध्ये कुठले मसाले कधी आणि कसे वापरायचे हे मला चांगले अवगत होते. माझ्या हाताला विशेष चव आहे. चवीचे करुन इतरांना खाऊ घालणे ही माझी आवडती गोष्ट होती. अनेक जण रेसिपीज् लिहून घेत. तयार केलेले पदार्थ मी इतरांना घरीही देत, अशी माझी पार्श्‍वभूमी होती. अपघातानंतर मी माझ्या स्वत:साठी मसाले तयार करत असे. सरोजदिदीच्या प्रोत्साहानामुळे मी मसाले छोट्या प्रमाणात पॅक करून अगदी घरगुती स्वरुपात देऊ लागले. याकामात पतीची मदत झाली. प्रारंभी मी ५ किलोचे मसाले तयार केले.

छोटे पाकीट करून मी माझ्या मैत्रिणी आणि परिवारात हे मसाले दिले. ३५ किलोचे मसाले अगदी हातोहात विकले गेले. त्यानंतर मला ६५ किलो मसाल्यासाठी आगाऊ बुकिंग मिळाले. हा सिलसिला वाढतच गेला. माझ्या मैत्रिणीच्या ओळखीतून माझे मसाले दुबईपर्यंत पोहोचले. आता मसाल्याची बॅ्रॅण्डिंग करणे महत्त्वपूर्ण होते. म्हणून मी माझ्या पतीचे नाव मसाल्याला दिले आणि श्री. योगेश नावाने माझ्या मसाल्याला ओळख मिळाली. नेत्रहिनता आणि दिव्यांंगता विसरुन मी माझ्या या कामात रमत गेले. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये माझ्या हातचे १५०० किलोहून अधिक मसाले खवय्यांची चव तृप्त करून गेलेे.

यातून मी आजारी आहे आणि मला दिसत नाही, हे मी विसरत गेले. आता आमच्या गृहोद्योगात मी २ महिलांना रोजगार दिला आहे. ५० ते ६० किलो मसाल्याचे एका वेळी उत्पादन करते. दोन मुलांचे मी दृष्टिहीनतेसह संगोपन केले. माझी समाजदार मुले, सामंजस्याने मला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारे पती योगेश यांच्यामुळेच मी मोडून पडलेल्या माझ्या आयुष्यांची पूणर्बांधणी करू शकते. माझ्या डॉक्टर देसले मॅडम मला झंझावात म्हणतात. ही मुलगी म्हणजे ‘मिरॅकल क्विन’ आहे, असे विशेषणे त्यांनी दिली आहेत. मला माहीत नाही, मी कशी आहे. परंतु मोडून पडायचे नाही, ही खुणगाठ मी बांधली म्हणूनच इथवर पोहोचू शकले, याचे समाधान मला वाटते. मी माझ्या मुलांना पाहिलेले नाही. परंतु माझी दोन्ही मुले अत्यंत निरोगी पद्धतीने जीवन जगतात, याचा मला आनंद वाटतो.

पैसा तर सर्वच कमवतात पण समाधानही महत्त्वाचे आहे. निराशेच्या गर्तेत गेलेल्या, आत्मविश्‍वास हरवून बसलेल्या महिलांसाठी कार्य करायची मनिषा आहे. अशा अगतिक महिलांच्या पंखात मला नवे बळ देता आले तर मी स्वत:ला खूप भाग्यवान समजेल. इतर महिलांना सांगणे आहे की, मी नेत्रहीन असूनही मोडून न पडता उभी राहीले तर धडधाकट स्त्री आपल्या पूर्णत्वासह काहीही करू शकते. महिलांनी आपल्याला निसर्गदत्त आवडींना ओळखून यशस्वी व्हावे.

LEAVE A REPLY

*