त्रंबकेश्वर (नाशिक) l ललिता देशमुख-शिंदे : गोदेचा श्‍वास मोकळा करणार!

0
त्र्यंबकेश्‍वर ही माझी कर्मभूमी. समाजकार्याची मला पहिल्यापासूनच आवड. अन्यान सहन न करणे आणि न्याय हक्कासाठी बंड करून उठणे हा माझा स्वभाव आहे. मी मुळातच चळवळी वृत्तीची. राजकारण म्हणजे काय हे कळण्याअगोदरच केवळ सामाजिक कार्य करता यावे म्हणून माधुरी जोशी यांच्यामुळे प्रथम शिवसेनेत प्रवेश केला. सन २००२ साली पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आले. उपनगराध्यक्ष आणि नगराध्यपदाची माळ गळ्यात पडली. त्याकाळात अनेक समाजोपयोगी कार्य करण्याचे भाग्य मिळाले.

त्यामुळे मी अनेक चळवळी सुरू केल्या. त्यामध्ये त्र्यंबकेश्‍वर देवस्थान मंदिराचा विश्‍वस्तपदासाठी लढा आणि गोदावरीचा श्‍वास मोकळा करण्याचा लढा महत्त्वपूर्ण ठरला. त्र्यंबकेश्‍वर देवस्थानावर विश्‍वस्तपदाच्या नियुक्तीबाबत पहिल्या लढ्याची प्रेरणा मला एका महिलेकडून मिळाली. त्र्यंबकराज मंदिरात एका महिलेला शिपायांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर मी अस्वस्थ झाले. त्यावेळी ट्रस्टचा कारभार ठराविकांच्या हाती केंद्रित होता. मंदिर संस्थान आणि त्यावरील विश्‍वस्त मंडळ यााबद्दल जाणून घेतले तेव्हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे कळाले.

पुरोहित आणि त्र्यंबकेश्‍वर देवस्थानाच्या भांडणात नवीन विश्‍वस्त भरले जात नव्हते. या प्रकारणात सर्वोच्च न्यायालयाने स्टे ऑडर देत प्रकरण ‘जैसे थे’ ठेवावे असा आदेश दिला होता. १९६९ पासूनचा हा वाद होता. त्याच्याच वेळोवळी सुनावणी झाल्या. यासंदर्भात मी सन २०१२ साली विश्‍वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबत याचिकेसाठी दिल्लीपर्यंत गेले. विश्‍वस्त पदासाठी त्रयस्थ पार्टी म्हणून मी न्यायलायीन लढा दिला आणि महिला विश्‍वस्त होण्याचा मार्ग सुकर झाला. मी आज मंदिर संस्थानची विश्‍वस्त म्हणून काम पाहत आहे.

मूळ बाल गोदावरीसाठी मी असाच लढा दिला. सन १९६० सालापर्यंत खळखळणारी गोदामाई अनेक कारणांमुळे बंदिस्त करण्यात आली. तिच्यावर सिमेंटचा स्लॅब टाकला गेला. प्रथम कुशावर्त ते लक्ष्मीनारायण चौकापर्यंत स्लॅब टाकण्यात आला. त्यानंतर १९८० साली लक्ष्मीनारायण ते गायत्री मंदिर असा स्लॅब टाकला गेला. नुकत्याच सन २०१५-१६ साली झालेल्या कुंभमेळ्यामध्ये गायत्री मंदिर ते संगमापर्यंत नदीमध्ये सिमेंंट कॉंक्रिटीकरण करून गोदाचा कालवा करून तिला मृतप्राय करण्याचा घाट प्रशासनाने योजिला होता.

गोदामाईचा कोंडणारा श्‍वास मी उघड्या डोळ्यांनी बघू शकत नव्हते. म्हणून गोदामुक्तीसाठी आवाज उठवला. गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे राजेश पंडित, निशिकांत पगारे यांनीही माझ्या लढ्याला साथ दिली. त्यानंतर याचे एक आंदोलन उभे राहिले. गोदेबद्दलच्या जनतेच्या टोकदार भावना लक्षात घेत प्रशासनाचा गोदेला बंदिस्त करण्याचा डाव आम्ही हाणून पाडला. त्यानंतर गोदाचे क्रॉंक्रिटीकरण आणि प्रदूषण याबद्दल अधिक कडक निर्बंध आणले गेले. सर्वोच्च न्यायालयाने ‘नीरी’ संस्थेला नदीबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. अजूनही आमचा लढा सुरू आहेच. कुंभमेळ्याचा समावेश जागतिक वारसा म्हणून घोषित व्हावे, यासाठी मी भारत सरकारकडे प्रस्ताव दिला आणि केंद्र सरकारने तो ‘युनोस्को’कडे दिला.

चीनसारख्या मोठ्या देशंाची लॉबिंग असूनही २०१७ साली देशात चार ठिकाणी होणारा कुंभमेळा हा जागतिक वैभवशाली वारसा आहे, असे नामांकन युनोस्कोकडून आमच्या कुंभमेळ्याला मिळाले. आजवर मी अनेक लढे दिले आणि यशस्वी झाले आहे. मी कुठलेही काम माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही. मला प्रसिद्धीचा हव्यास नाही की पैशाचे आकर्षण नाही. लढा कुठलाही असो त्यात लोकहित जपले. प्रत्येक लढ्याच्या वेळी माझा किती खर्च झाला, यापेक्षा तो यशस्वी झाल्यानंतर मिळणारे समाधान मी कुठल्याही पैशाच्या तराजूत तोलूच शकत नाही. आज मागे वळून जेव्हा मी बघते तेव्हा कणभर समाधान वाटते, परंतु अजून अर्धी वाट चालणे बाकी आहे, याची जाणीव नवीन लढा लढण्याची प्रेरणा देते.

जे काही लढे मी लढले ती केवळ वाटेवरची वळणे आहेत. परंतु मंजिल अजून बाकी आहे. इथे मी विसावणार नाही. थांबणे हा माझा स्वभाव नाही. समाजासाठी, पर्यावरणासाठी खूप काम करणे बाकी आहे. नजिकच्या भविष्यात मी त्र्यंबकेश्‍वरला सांस्कृतिक वारसा नगरी(कल्चरल हेरिटेज व्हिलेज) म्हणून घोषित करावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू असून लवकरच त्यांची भेट घेणार आहे. पश्‍चिम घाटावर वसलेल्या त्र्यंबकनगरीचा पश्‍चिम घाटामध्ये समावेश आहे. येत्या काळात पर्यावरण रक्षण, गोदाप्रदूषण यासह वृक्षतोड, डोंगर फोडून पर्यावरणाचा र्‍हास करण्याच्या विरोधात मी अधिक जोमाने कार्य करणार आहे.

गोदावरी ही नाशिकपुरतीच मर्यादित नसून ती जेथून वाहते त्या प्रदेशाची शेती, पाणीप्रश्‍न आणि अर्थकारण यावर प्रभाव टाकते, त्यामुळे ती जीवनवाहिनी आहे, तिचा श्‍वास मोकळा व्हावा म्हणून मी माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत लढत राहणार आहे. मी त्र्यंबक नगरीची असेल म्हणून कदाचित माझ्यावर शिवाची ईश्‍वरीय कृपा बसरत आहे. ज्या कुठल्या कार्यासाठी मी लढा पुकारला, त्यामध्ये १०० टक्के यशस्वी होत गेले. या मागे नक्कीच आध्यात्मिक शांती कार्य करत आहे, असे मला वाटते.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*