नाशिक l कांचन पिंगळे (शेतकरी) : माझे गुलाब सातासमुद्रापार

0

माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं’

मी जाई, जुई, मोगरा नाही; पण आपल्या सर्वांचे आवडते, देखणे फूल, प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाची शेती करते. सुमारे आठ वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळाचा तडाखा आमच्या द्राक्षबागेला बसला आणि आम्ही नवीन फायदेशीर पीक घ्यायचे ठरवले. हवामान बदलाचा, वार्‍या वादळाचा, अतिउम्ष्याचा परिणाम ज्याच्यावर फारसा होणार नाही असे पीक कोणते? प्रदर्शन, पुस्तके, लेख या सर्व माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाने केल्या जाणार्‍या गुलाबाच्या शेतीचा पर्याय समोर आला आणि मी १४ पैकी ४ एकर क्षेत्रात हा प्रयोग करायचे ठरवले. कामाची विभागणी झाली. माझे यजमान आणि सासरे द्राक्षबागेचे व्यवस्थापन पाहतील आणि मी पॉलिहाऊसमधील फूलशेती सांभाळेन. सुरुवातीला आत्मविश्‍वास नव्हता; पण यजमानांनी मार्गदर्शन केले आणि मीही आधुनिक शेती चांगल्या प्रकारे करू लागले. रोपे आणण्यापासून ते फुलांच्या काढणीपर्यंतची सर्व कामे मी मजुरांकरवी पार पाडते. आता आमची फुले इंग्लंड व हॉलंड या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ठराविक सिझनपुरती आणि दिल्ली, इंदूर, मुंबई, नागपूर या डोमेस्टिक बाजारपेठेत वर्षभर विक्रीसाठी जातात.

एक अल्लड मुलगी ते पॉलिहाऊसचा व्यवसाय एकहाती सांभाळणारी शेतकरी महिला हा माझा प्रवास खूपच सहजपणे झाला. माझे माहेर कसबे सुकेणे इथले. शिक्षण बारावीपर्यंतच झाले. नंतर लग्न होऊन सासरी दिंडोरीला आले. सासरची १४ एकर द्राक्षबाग होती. पण वादळामध्ये झालेल्या नुकसानीनंतर आम्ही ४ एकर क्षेत्रात बारा महिने चालणारे आणि बाजारपेठेसाठी अनुकूल असे पीक घ्यायचे ठरवले. दहा एकर जमिनीवर थॉमसन, शरद, सीडलेस ब्लॅक या द्राक्षांच्या जातींची लागवड केली आणि चार एकर क्षेत्रासाठी पॉलिहाऊसमधील गुलाबाची निवड केली.

या प्रयोगाआधी पॉलिहाऊसच्या उभारणीचा आणि त्यातील पीकपद्धतीचा अभ्यास करणे आवश्यक होते. त्यासाठी आम्ही पॉलिहाऊसमधील गुलाबाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांना भेटलो. या पिकाबाबतचे रितसर प्रशिक्षण घेण्यासाठी माझे यजमान पुण्याच्या हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन आले. तिथे मिळलेली माहिती आणि प्रशिक्षण त्यांनी मला दिले आणि सांगितले, ‘पॉलिहाऊसमधली शेती आता तू सांभाळायची.’ माझ्यावर घरच्यांनी इतका विश्‍वास टाकल्यामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला आणि मी काम करायला जोमाने सुरुवात केली. मळ्यातच घर असल्याने येण्या-जाण्याचा प्रश्‍न नव्हता. पॉलिहाऊस उभे करायला सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागला.

या पिकासाठी लाल मातीची आवश्यकता असते. ही माती त्र्यंबकेश्‍वरहून आणली. लाल मातीमध्ये शेणखत मिसळून त्याचे बेड तयार केले. ठिबक सिंचन योजनेतून रोपांना पाणी देण्याची व्यवस्था केली. द्राक्षबागेपेक्षा या प्रकारच्या शेतीला पाणी कमी लागते आणि उत्पन्नही अधिक मिळते. पॉलिहाऊसपासून दोन किलोमीटरवर कालवा आणि शेततळे असल्याने पाणी मुबलक प्रमाणात मिळाले. पेरणीसाठी सर्व व्यवस्था उभी केल्यानंतर टॉप सिक्रेट जातीची गुलाबाची रोपे पुण्याहून आणून लावली.

आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याचा प्रयोग केला; पण तो यशस्वी तर झाला पाहिजे. म्हणूनच कामाचे नियोजन करणे मला अतिशय महत्त्वाचे वाटले. रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनापासून काढणी झालेली गुलाब फुले टिकवण्यासाठी शीतगृह उभे करण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्था आम्ही मळ्यातच कर्ज काढून उभ्या केल्या. आमच्याकडे मजुरांच्या पाच जोड्या काम करतात. त्यांची राहण्याची व्यवस्थाही मळ्यात केली आहे. मजूर सकाळी ८ वाजता कामाला येतात. प्रत्येकाला त्यांचे काम नेमून दिलेले असते. सकाळी उन्हाच्या आत फुले उतरवून ती शीतगृहात ठेवली जातात.

रोपावर अळी दिसली की कीडनाशक फवारणे, रोज दोन वेळेला खत आणि ठिबकने पाणी देणे, पाच ते सहा दिवसांतून एकदा ओलावा टिकवण्यासाठी शॉवरनेही पाणी द्यावे लागते. पॉलिहाऊसमधील शेती बंदिस्त स्वरुपाची असल्यामुळे वातावरण बदलाचा या शेतीवर जास्त परिणाम होत नाही. रोपे लावल्यानंतर साधारण तीन महिन्यांनंतर फुले येतात. एका झाडाला पंचावन्न ते साठ फुले येतात. हे पीक वर्षभर चालूच असते. दररोज दहा ते बारा हजार फुलांचे उत्पादन मिळते. पाचशे ते सहाशे बंच बांधले जातात. शीतगृहात फुले दहा ते बारा दिवस चांगली टिकू शकतात. फुलांची काढणी झाल्यावर जागतिक बाजारपेठेसाठी नऊ ते बारा फुलांचा एक बंच याप्रमाणे तर डोमेस्टिक मार्केटसाठी वीस फुलांचा बंच करावा लागतो.

वर्षभर आमची फुले दिल्ली, इंदूर, मुंबई आणि नागपूर या लोकल मार्केटला जातात. त्यावेळी विक्रीसाठी पाठवलेल्या फुलांचे पैसे ताबडतोब बँकेच्या माझ्या खात्यात जमा होतात. दहा टक्के कमिशनवर आमच्या फुलांची विक्री होते. पण फुले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवताना जास्तच काळजी घ्यावी लागते. २५ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत फुले पुणे येथील एस्सार या कंपनीच्या माध्यमातून इंग्लंड आणि हॉलंडला निर्यात केली जातात. कंपनीचा माणूस येऊन खराब फुले बाजूला काढतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ चांगली असल्याने भविष्यात वर्षभर फुलांची निर्यात करण्याचा माझा विचार आहे. आमचे घर आणि मळ्यापासून विमानतळ जवळ असल्यामुळे नाशिकच्या विमानतळावरून विमाने नियमित ये-जा करू लागली तर आमच्या या पॉलिहाऊसमधील गुलाब शेतीला त्याचा अधिक लाभ मिळेल.

आमच्या व्यवसायाला अधिक चलना मिळेल आणि आम्ही वर्षभर जागतिक बाजारपेठेत आमचा शेतमाल पाठवू शकू, असे मला वाटते. फुले हा नाशवंत माल आहे. त्यामुळे जलद वाहतुकीची गरज भासते आहे. माझे हे स्वप्न कधीतरी पूर्ण होईल, असा मला विश्‍वास आहे. विमानसेवा नियमित सुरू झाल्यास गुलाबाखालचे क्षेत्र वाढवण्याचा आमचा विचार आहे.

दळणवळण किंवा उच्चशिक्षणाच्या सोयींच्या अभावामुळे अजूनही ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होत नाही. पण अनेक जणींच्या घरचीच शेती असल्याने त्या शेतात निरनिराळे प्रयोग करून आपली आणि घराची चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतात. शेतकरी महिला हिंमतीने उभ्या राहिल्या, त्यांनी आपली शेती सावरली तर ग्रामीण भागाचे सध्याचे उदासीनतेचे चित्र निश्‍चित बदलेल, असे मला वाटते. हीच स्त्रीशक्तीची मोठी ताकद आहे.

दळणवळण किंवा उच्चशिक्षणाच्या सोयींच्या अभावामुळे अजूनही ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होत नाही. अनेक जणींच्या घरचीच शेती असल्याने त्या शेतात निरनिराळे प्रयोग करून आपली, घराची चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतात. शेतकरी महिला हिंमतीने उभ्या राहिल्या, त्यांनी आपली शेती सावरली तर ग्रामीण भागाचे सध्याचे उदासीनतेचे चित्र निश्‍चित बदलेल, असे मला वाटते. हीच स्त्रीशक्तीची मोठी ताकद आहे. मी जाई, जुई, मोगरा नाही; पण आपल्या सर्वांचे आवडते, देखणे फूल, प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाची शेती करते.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*