नाशिक l डॉ. आशालता देवळीकर : बीजं अंकुरे…

0

‘कुठे शोधीसी काशी’

माझी काशी इथेच आहे, कामाच्या स्वरूपात. समाजाचे ऋण फेडणे, हाच आपला देव आणि धर्मही! आपण डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी, असे नेहमी वाटायचे. मूल का होत नाही इथपासून पालकत्वापर्यंतचा प्रश्‍नांचा मोठा आलेख आहे. या आलेखाला छेद देण्यासाठी मी माझ्या आयुर्वेदिक वैद्यकीय ज्ञानाचा वापर करायचा, असे ठरवले. जीवनात आपल्याला अनेक वाटा दिसतात, डॉक्टरी प्रॅक्टिसबरोबरच मी वंध्यत्व आणि पालकत्व या विषयांवर काम करते आहे. मी सटाणा तालुक्यातील जायखेड्याची.

आई शिक्षिका आणि वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने सामाजिक जाण लहानपणापासूनच आहे. डॉक्टर झाल्यावर नाशिकमधील वकीलवाडी इथे प्रॅक्टिस सुरू केली आणि मागे वळून पाहिलेच नाही. भारतातील डिझायनर बेबी म्हणजेच गर्भसंस्कारांची संकल्पना आता परदेशात रुळते आहे. मीही या विषयावर रुग्णांचे समुपदेशन करते. आयव्हीएफ करू इच्छिणारी जोडपी समुपदेशनासाठी येतात. बीज शुद्धीकरण तसेच योगा, ध्यानधारणा, गर्भातल्या बाळाशी कसे बोलायचे, याचे मार्गदर्शन करते.

शाळांमध्ये किशोरवयीन मुलींना व्याख्याने देते. मासिक पाळीचे चक्र आणि त्याबद्दलची स्वच्छता याचे महत्त्व समजावून सांगते. लिंगभेद समानता ही कामाच्या, शिक्षणाच्या संधींच्या, कर्तृत्वाच्या बाबतीत असली पाहिजे, असे माझे मत आहे. वाहवत चाललेल्या पिढीतली ऊर्जा चांगल्या दिशेला वळवली पाहिजे, असे नेहमी वाटते. त्यासाठी जमतील तेवढे प्रयत्न करते. कारण या वयात मुले आई-वडिलांचे ऐकत नाहीत. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असल्याने ती अधिक आक्रमक होतात. अशावेळी कधी पालक त्यांना लागेल असे बोलतात, कधी मारतात. जितका मार खातील तेवढी मुले रागीट होतात. प्रसंगी हिंसा करतात.

त्यांना जग वाईटच दिसते. त्यांच्यातली नकारात्मकता वाढीस लागते. त्याच काळात आईचेही वय रजोनिवृत्तीकडे झुकत असते. आईही चिडचिडी झालेली असते. घरातले वातावरण बिघडते. या सर्व विषयांना धरून मी समुपदेशन करते. आईने मुलांची मैत्रीण झाले पाहिजे. ते अवघड नाहीये. समानतेचे धडे घरातूनच दिले पाहिजेत. ‘बबन बॉल खेळ आणि कमल पाणी भर’ असे नको. हे पालकांना समजले पाहिजे. मुलांना आणि मुलींना दोघांनाही स्वयंपाक यायला हवा.

हे बदल पालकांपासूनच घडले पाहिजेत. ग्रामीण भागात मुलगा-मुलगी समानतेची बीजे रुजण्याची अधिक गरज आहे. त्यासाठीच मी आई या विषयावर व्याख्याने देते. एका आईबरोबरच बाळाचा, जबाबदारीचा, जाणिवेचा जन्म झालेला असतो. मुलांसाठी प्रेम, वात्सल्याबरोबरच आईचे पहिले दूध महत्त्वाचे असते. आजची आई आपल्या अपत्यांसाठी कधी सरोगसी होते, किडनी दान करते. पेहराव बदलला; पण वात्सल्य बदलले नाही. आईची महती सांगण्यासाठीच व्याख्याने देते.

महिलांमधल्या गर्भाशय मुखाच्या आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती करण्यासाठी मॅमोग्राफी आणि पॅपस्मीअर या चाचण्यांची शिबिरे आयोजित करते. हे काम मी २५ वर्षांपासून अव्याहत करते आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय अधिकारी असलेल्या माझ्या यजमानांचे चांगले प्रोत्साहन आहे. आम्ही मुलांचे वाढदिवस वृद्धाश्रमात साजरे करतो. पितरे न घालता त्या दिवशी गरीब लोकांना अन्नदान करतो. शाळांमधील समुपदेशन मोफत करते. सध्या मी आणि माझ्या बीडीएसला तसेच फॅशन इंडस्ट्रीत नाव कमावलेल्या मुलीने मिळून पाच मुलींना दत्तक घेतलेय. समाधानी आयुष्यासाठी अजून काय हवंय?

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*