नाशिक | अश्विनी बोरस्ते : आत्मनिर्भरता हेच ध्येय

0

बचतगटासाठी काम करताना जो अनुभव घेतला तो पुढच्या पिढीसाठी प्रेरणा, संस्कार देणारा ठरावा यासाठी पुस्तक लिहीत आहे. माझ्या बचतगटांच्या चमूमधील 11 टीम लीडरच्या जीवनातील बारकावे मी अनुभवले आहेत. त्यावर प्रकाश टाकत आहे. सामान्य महिलाही स्वावलंबी व्हाव्यात आणि बचतगटाचा प्रवाह अखंडित सुरू राहावा यासाठीच हे प्रयत्न आहेत.

अवघ्या सातशे महिलांना घेऊन मी केवळ दीड लाखांचे भागभांडवल घेऊन 30 बचतगटांच्या माध्यमातून प्रवास सुरू केला. आज 15 वर्षे पूर्ण झाली. 807 बचतगट, 15 हजार महिला सभासद झाले असून पावणेतीन कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

माझे पती एकदा म्हणाले होते, मुलांचे संगोपन आणि संसाराचे राहटगाडगे यापुढे जाऊन ‘अश्विनी बोरस्ते’ म्हणून तुझे स्वतंत्र अस्तित्व निर्माण कर. हे वाक्य मला माझ्या जीवनला कलाटणी देणारे ठरले. यासाठी मी आजही काम करत आहे… यापुढेही करत राहणार आहे.

विवाह झाल्यानंतर प्रत्येक महिलेला स्वत:चे वेगळे अस्तित्व कसे निर्माण करावे हा एक प्रश्न असतो. काहीजणी नोकरी-व्यवसायात स्वत:ला सिद्ध करतात, काहीजणी समाजकार्यातून वेगळी वाट निवडतात. माझ्यासमोरही हा प्रश्न होता, परंतु माझे पती अशोक बोरस्ते यांनी मला खूप छान प्रेरणा दिली.

महिला स्वत:च्या पायावर उभा राहिल्या पाहिजे, त्यासाठी तू महिलांसाठी आर्थिक क्षेत्रात काम करावे, असे सांगितले. एक महिला स्वावलंबी झाली तर ती कुटुंब आणि समाजाला उभे करते, असे सांगितले. त्यातून मी बचतगटातून काम करावे ही प्रेरणा मिळाली. त्याच काळात मी बांगलादेशमधील बचतगटात मोठे कार्य करणारे मोहम्मद युनूस यांची पुस्तके वाचली. यातून मलाही महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

नाशिक मधील ओझरसारख्या छोट्याशा गावातून बचतगट चळवळीला प्रारंभ केला. तिथे महिलांसाठी चालवल्या जाणार्‍या छोट्याशा पतसंस्थेत मी कामाला सुरुवात केली. त्या संस्थेला पुनर्जीवन देणे आणि बचतगटाच्या माध्यमातून ही योजना महिलांना चांगल्या पद्धतीने समजून सांगणे यासाठी खेडोपाडी जाऊन प्रचार आणि प्रसाराचे काम मी करत होते. यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, शासन स्तरावरही हे काम मात्र त्यामध्ये ‘बीपीएल’ आणि ग्रामीण भागात याचे काम होत आहे. मात्र ‘एपीएल’ स्तरावरील महिलांसाठी कुठल्याही प्रकारचे काम होत नाही. त्यांनाही आर्थिक भक्कमतेची तितकीच गरज आहे. अशा महिलांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर एक पतसंस्था निर्माण करण्याचे माझ्या मनात आले आणि मी काम सुरू केले.

मी एक स्त्री असल्याने दुसर्‍या स्त्रीच्या भावना, कुटुंब चालवताना कुठल्या आर्थिक अडचणींचा तिला सामना करावा लागतो याचे भान, तिचे शिक्षण, परिस्थिती याचा मला अंदाज बांधता येऊ लागला. एखादा मानसोपचारतज्ञ जसे रुग्णाचे सर्व पैलू जाणून घेऊन त्यावर विश्लेषण आणि इलाज करतो त्याप्रमाणे मीही याचा अभ्यास करून महिलांना वाचायला शिकले. त्यावेळी लक्षात आले की प्रत्येकीलाच एक जीवभावाचा ‘आपला माणूस’ हवा आहे, जो अडीअडचणीला आधार देईल.

यातून एक एक करत अनेक महिला जोडल्या गेल्या. बचतगटांच्या माध्यमातून त्याचे लोकशाही तत्त्वावर सुरू असलेले काम, कार्यकारिणी, छोट्यातल्या छोट्या व्यवहारासाठी सर्वांची संमती घेऊन लिहून त्याला बँक लिंकेज करून त्याचा उत्पादनवाढीमध्ये कसा उपयोग करू शकता याचा मी अत्यंत पारदर्शी, सर्वसमावेशक आणि सर्वमान्य व्यवहार महिलांसमोर मांडून त्यांच्या सहकार्याने हे उभे केले. यावेळी माझ्या संयमीपणाची कसोटी लागली, परंतु ईश्वरकृपेने मला हे करता आले आणि अनेक महिलांचे प्रश्न समाजावून घेऊन त्यावर बचतगटातून उपाय शोधण्यात मी यशस्वी होत गेले.

माझ्या परिवारात भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान आहे. माझे आजोबा कै. शंकरराव चौधरी स्वाध्याय परिवारातले. त्यांनी पांडुरंगशास्त्री आठवलेंचे तत्त्वज्ञान अंगिकारले होते. आजी वारकरी संप्रदायातली. ज्या समाजात आपण राहतो त्याचे देणे कुठल्यातरी स्वरुपात दिले पाहिजे ही शिकवण बालपणापासून माझ्याही मनावर बिंबवली गेली. आपल्या समाजातील घटकांची मदत करताना आपण निमित्तमात्र, तर परमेश्वर ते काम आपल्या माध्यमातून करून घेतो. कुठलेही काम करताना त्यामागचा उद्देश चांगला असेल, स्वार्थी वृत्ती नसेल तर त्या कामात तुम्ही यशस्वी होतातच. त्यामुळे आपणही समाजासाठी काहीतरी करावे हा संस्कार मिळाला. त्यातून छोट्या प्रमाणावर काही महिलांना घेऊन प्रवास सुरू केला.

आपल्याकडे अनेक बचतगट आहेत, मात्र आमच्या माध्यमातून स्त्रीमध्ये आमच्याकडे आत्मनिर्भरणाचे कार्य अत्यंत चांगले केले जाते. रचना शिल्पमधल्या मनीषा पवार याचे उत्तम उदाहरण ठराव्यात. प्रारंभी दीड किलो मुगाची चकली त्यांनी मला करून दिली. तिची चव उत्तम होती. त्याला बाजारात मागणी होईल असे मला वाटले. त्याची गुणवत्ता, दर, ब्रॅण्डिंग केली, फूड लायसन्स कसे काढले जाते ते सांगून तेही काढले. उत्पादनाचा दर्जा कसा राखावा हे मी त्यांना शिकवले आणि दीड किलोपासून सुरू झालेला प्रवास सहा वर्षांत साडेनऊशे किलोवर जाऊन पोहोचला. दिवाळीत त्यांच्या चकल्यांची विक्रमी विक्री होत आहे.

नव्या युगात उत्पादनांचे पॅकिंग आकर्षक असेल तर ग्राहक आकर्षित होतातच.आतल्या जिन्नसाची चव नंतर कळते, परंतु चकाकणार्‍या व्यवस्थित वेस्टनासह पॅक केलेेले उत्पादन अधिक लवकर विकले जाते, हे वास्तव आहे. ग्राहक उत्पादनाकडे प्रथमदर्शनी आकर्षित होेतो. नंतर चव पाहिली जाते. त्यासाठी चव आणि दर यांची योग्य सांगड घातली गेली की ते उत्पादन ग्राहकांना आवडणारच, हेच आम्ही बचतगटातून सांगितले. प्रारंभी फराळाचे पॅकिंग मेणबत्तीच्या ज्योतीवर केले गेले, परंतु सीलबंद करताना त्याची काजळी वर येत होती. बाजारात उत्पादन द्यायचे तर हे मुळीच चालणार नाही असे मी महिलांना सांगितले.

त्यासाठी दिवाळीच्या काळात फराळासाठी मुंबईत जाऊन त्याच्या पॅकिंगच्या साधनाचा शोध घेऊन त्यामध्ये आमच्या कल्पना ओतून आम्ही पॅकिंग आधिक आकर्षक केले. चविष्ट, गुणवत्तापूर्ण खाद्यमाल आणि त्याची आकर्षक पॅकिंग यामुळे अल्पावधीत याचे चांगले परिणाम आम्हाला मिळाले.

माझ्या भावाच्या पीएच.डी पदवीप्रदान कार्यक्रमासाठी मी अमेरिकेला गेले होते. तेव्हा अनेक महिलांशी संवाद साधला. त्यावेळी लक्षात आले की, तिकडे मराठी लोकांना घरची चव देणारा मसाला, लोणची, पापड यासह दिवाळी फराळ मिळत नाही. तेथे मॉल संस्कृतीत पॅकबंद कमर्शियल उत्पादने असतात. त्याला घरची चव नसते. ही चव तुमच्या माध्यमातून मिळेल का, अशी मला विचारणा करण्यात आली. आपल्याकडील तेथे राहणार्‍या मंडळींच्या माध्यमातून फराळ विदेशात निघाला आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला.

त्यामुळे आमची उत्पादने देशासह विदेशातील ग्राहकांनाही भावली. आज देश-विदेशात आमच्या महिला बचतगटाच्या माध्यमातून फराळ जात आहे. माझ्या आयुष्याचे ध्येय महिला समक्षीकरण हेच आहे. मात्र या कामाला राजकारणाची जोड दिली तर अधिक कामे सत्तेतून करता येतील, असे मला वाटते. माझ्या सोबत काम करणार्‍या महिलांनाही असे वाटत होते. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला. परंतु या क्षेत्रात खुर्च्या बदलत असतात, मात्र समाजकारणाला कधीच मरण नसते. राजकारणात मी नगरसेविका, महिला आणि बालकल्याण सभापती, नवीन नाशिक सभापतिपदावर गेले. अशा अनेक पदांवर जबाबदारीने कामे केली.

बाबा आमटे, मदर तेेरेसा ही माझी आदर्शस्थाने आहेत. त्यांच्यासारखीच बचतगटाची एक लस टोचून घेतली आहे. ही आता नसानसांत भिनली आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर गोविंदनगरसारख्या विस्तारीत भागात एक वॉर्ड एक नगरसेवक यानुसार मोकळ्या भूखंडावर कचराकुंड्या होत्या. त्या जागी 7 ते 8 नवीन उद्याने विकसित केली. महिला बालकल्याणाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्व योजना राबवल्या. ज्येष्ठ नागरिक संघाची उभारणी केली.

वाचनालये उभारणे, जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जीम, विविध धार्मिक, पर्यावरणाचे उपक्रम, महिलांसाठी नृत्य स्पर्धा, कराटे, योगासन वर्ग यातून सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहिला. पुरस्कार हे तुमच्या कामाची पावती आणि पाठीवर शाबासकीची थाप असते. मलाही आदर्श नगरसेविका म्हणून पुरस्कार मिळाला. बाहेर कितीही काम केले तरी कुटुंबात एक स्त्रीने आदर्श आई, पत्नी होणे गरजेचे असते. त्यामुळे मी बाहेरचे राजकारण, कार्य आणि एक गृहिणी म्हणून करावयाची कर्तव्ये याचे संतुलन कधीच ढळू दिले नाही. पतीचे सहकार्य, मुलांचा समजूतदारपणा मिळाल्यानेच मी इथवर वाटचल करू शकले.

अजून खूप काही करणे बाकी… सकारत्मक प्रवृत्ती, लोकं जोडणे त्याच्यातून काय चांगले टिपून घेता येईल ते चिमणीच्या चोचीप्रमाणे टिपून घेणे आणि त्यातून आयुष्य समृद्ध करणे हा माझा गुण मला खूप काम करण्याची ऊर्जा देतो. याशिवाय नित्यक्रमाने मी ईश्वर पूजा, योगा, चालण्याचा व्यायामही करत असते. त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. मला वाचायला खूप आवडते. अनेकांना माहितीही नसेल कदाचित परंतु विविध खाद्यसंस्कृतील चविष्ट पदार्थ तयार करणे आणि ते खाऊ घालणे हा माझा अत्यंत आवडीचा भाग आहे. याशिवाय मी सुगम गायन शिकत आहे.

मी नृत्यही शिकत आहे. कधीतरी कला मनुष्याला सुंदरपणे कसे जगता येते हे शिकवतात. त्यामुळे व्यग्र जीवनशैलीत बदल म्हणून बर्‍याच वेळा मी नृत्यातूही व्यक्त होेते. महिलांनी आहे त्या परिस्थितीचे भांडवल न करता त्यावर मात करून आपल्या घरातील पातळीवर आत्मनिर्भर व्हावे आणि अगदी कुटुंबापुरते का असेना एक वेगळे अस्तित्व निर्माण करावे, असा सल्ला मी महिलांना देईल. कर्मयोगाच्या वाटेवर चालत राहणे यापेक्षा दुसरे जीवनात सुख नाही. त्यातून तुमचे आणि तुमच्यासह इतरांचेही आयुष्य समृद्ध होत जाते. आजची वाटचाल इथपर्यंत केली, परंतु अजून खूप काही करणे बाकी आहे. त्यासाठी सतत चालत राहणे गरजेचे आहे. ईश्वर शक्ती देतोच, तुम्ही फक्त समर्पीत भावनेेने काम करत राहिले पाहिले. जे व्रत घेतले त्यासाठी व्रतस्थ राहिले पाहिजे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*