नाशिक l अमृता पवार (राजकीय) : समाजसेवेचे व्रत

0
शाळेत साधारणत: दुसरीत असताना मी माझ्या आजोळी म्हणजे कोपरगावला होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दंगल उसळली. ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी दंगल होती. तिथला एक समाज दुसर्‍या समाजाला भिडला. ती दाहकता, ती हिंसा राजकारणातील अमानवी कृत्याचा परिचय देऊन गेली. माझ्या बालमनावर त्याचे खोलवर परिणाम झाले. माझे आजोबा शंकरराव कोल्हे कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक. राज्याच्या राजकारणात त्यांनी मंत्रीपदही भूषवलेले. वडील डॉ. वसंतराव पवार यांच्याही रक्तात राजकारण आणि समाजकारण भिनलेले.

 नेते-कार्यकर्ते, जनसामान्य यांची घरातील ऊठबस मी जवळून न्याहाळायची. हे सारे अटळ, अनिवार्य असले तरी राजकारणाबाबत गोडी वाटण्याऐवजी तिटकाराच मनाच्या कोपर्‍यांनी व्यापला होता. एकीकडे अभ्यास करून खूप पुढे जायची सुप्तेच्छा, तर दुसरीकडे ऐन परीक्षेच्या वेळी लागलेल्या निवडणुकीमुळे माझ्या अभ्यासाच्या खोलीचा कार्यकर्त्यांनी घेतलेला ताबा माझ्यासाठी उद्वेग आणणारा होता.

माझे बाबा १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्याच काळात परीक्षा असल्याने माझ्यासमोर आव्हान उभे ठाकले. घरभर कार्यकर्त्यांचा माहोल मला अभ्यासापासून दूर ठेवत होता. मग कुठेतरी कोपर्‍यात बसून माझी शैक्षणिक उपासना मी सुरू ठेवली. राजकारण क्षेत्र वरवर ‘ग्लॅमरस’ दिसत असले तरी त्यामधील कडवटपणा पचवणे सोपे नसते. कौतुकापेक्षा दोष पदरात पडण्याचे प्रमाण अधिक असते. आम्ही राजकारणात पुढे असलो तरी टक्के-टोमणे खाण्यातही आमची आघाडी कमी नव्हती.

अर्थात, बाबा लोकसभेची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकले. त्यांची लोकसभेतील कामगिरीही फार उजवी राहिली. राजकीयदृष्ट्या ही आमच्यासाठी जमेची बाब राहिली. सन २००० मध्ये आर्किटेक्चरसाठी मी अहमदाबादला गेले. तिथे स्वत:ला अजमावले. गावापासून, कुटुंबापासून दूर राहिल्याने नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी ‘गेट’ची परीक्षा उत्तीर्ण झाले. मला स्कॉलरशीपदेखील प्राप्त झाली. माझा आत्मविश्‍वास दुणावला. साधारणत:, दोन वर्षांनंतर मी पुन्हा नाशिकला आले. बाबांसोबत काम करण्याच्या निर्धाराने मी सक्रिय झाले. प्रारंभ झाला तो सर्जन्सच्या ‘मॅसेकॉन’ परिषदेने. बाबांनी या परिषदेची काही जबाबदारी माझ्याकडे दिली. ती मी यशस्वीपणे पेलली. पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकांतही मी पक्षाला मदत केली.

पुढे आर्किटेक्टमधील मास्टर डिग्रीसाठी मी ऑस्ट्रेलियात गेली. चार वर्षांच्या ‘एन्व्हॉयरमेंटल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमासाठी मला तिथे राहावे लागणार होते. या काळात मी नाशिक, नाशिककर आणि नातलगांना खूप ‘मिस’ केले. कारण तत्कालीन परिस्थितीत संवादाची साधने खूप मर्यादित होती. ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर बाबांकडे हट्ट धरून इंटरनेट सुरू केले. माहितीच्या मायाजालातून माझ्या ज्ञानात चांगलीच भर पडली. आम्ही भावंडे बाबांची खूप लाडकी होतो.

तथापि, स्वत:च्या पायावर राहा, आपल्या कर्तृत्वातून स्वत:ची ओळख निर्माण करा, ही त्यांची शिकवण आम्हाला वेगळी दिशा देण्यास पूरक ठरली. बाबांचे या जगातून आमच्यासाठी कमालीचे धक्कादायक होते. माझ्या कुटुंबाचा आधारवड हरपला. माझे गुरू, मार्गदर्शक आणि पितृछत्र हरपले. पण वस्तुस्थिती स्वीकारून माझ्या आई (श्रीमती नीलिमाताई पवार), आम्ही बहिणी आणि भाऊ सार्‍यांनी सावरले. आजही ते सोबत असल्याची आमची भावना आहे. एरव्ही गृहिणी म्हणून वावरलेल्या नीलिमाताईंवर ‘मविप्र’ संस्थेची महत्तम जबाबदारी आली.

स्वाभाविक माझी कार्यकक्षा रूंदावली. लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा मला आपोआप राजकारणाच्या पायथ्याशी घेऊन आली. माझा पहिला परिचय झाला तो तेव्हाचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत. अतिशय साधा, पण भला माणूस भेटला. पुढे विनायक मेटे, अजितदादा पवार, सुप्रियाताई आणि पितृतुल्य शरद पवार साहेब यांच्यासोबत ओळख झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक प्रवासारंभ झाला. भाजप नेते नितीन गडकरी यांनाही भेटण्याचा योग आला. वाया जाणार्‍या पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर हॉवरक्राफ्टचा वापर व्हावा, याबाबत मी गडकरी साहेबांशी बोलल्यावर त्यांनी मला दिल्लीला निमंत्रित केले. तिथे आमची चर्चा झाली.

मी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचे काम सुरू केले. प्रारंभी नीलिमाताईंचा माझ्या थेट राजकीय प्रवेशाला विरोध होता. मात्र, कौटुंबिक चर्चेतून विरोध मावळला. पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र बसव्यवस्था, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडे आग्रही भूमिका, आरोग्य शिबिरांचे आयोजन, युवतींमध्ये जागृती आदी उपक्रम राबवले. नाशिक शहरापुरती असलेली कक्षा जिल्ह्यात विस्तारली. कालौघात बाबांनी स्थापन केलेल्या गोदावरी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. त्या माध्यमातून स्थानिक आर्टक्राफ्टला उत्तेजन देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी फर्म काढली.

लाल फडकी बनवणार्‍या आदिवासी बायकांचा आत्मविश्‍वास वाढवून त्यांना ‘प्रॉडक्ट डिझायनर’चा दर्जा दिला. त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शनही भरवले, जे त्यांच्या आत्मविश्‍वास वृद्धीसाठी पूरक ठरले. अर्थात, बँकेचा कारभार राजकारणाइतका सोपा नाही, हे देखील मला कळले. वर्षभरानंतर ‘ग्रीप’ आल्यानंतर काही नव्या व्यवस्था विकसित करण्यातही मला यश मिळाले.

राजकारणाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला तो जिल्हा परिषद निवडणूक लढवून. लोकांनी आग्रह करताना नीलिमाताई आणि बंधू प्रणवदादा यांच्यावर मला मैदानात उतरवण्यासाठी अक्षरश: दबाव आणला. अखेर निफाड तालुक्यातील देवगाव गटात लोकाग्रहास्तव मी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उभी राहिली. माझ्यासाठी सुप्रियाताईंनी जिल्ह्यातील एकमेव सभा घेतली. मी विक्रमी मतांनी निवडून आले. मी हा माझ्या बाबांच्या विचारांचा आणि स्थानिक नेते-कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय मानते. नांदुरमधमेश्‍वर गाव दत्तक घेऊन गटातील कामाचा शुभारंभ केला. कोळगावला पाण्याची अडचण लक्षात घेऊन आर.ओ. प्लान्ट बसवला.

बरीच विकासकामे सुश्रुत फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण केली. तिथली पाणीटंचाई लक्षात घेऊन जलचळवळ उभी केली. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवले, रस्ते उभारणी केली, घनकचरा नियोजन, दशक्रिया विधीसाठी शेड उभारणी, तीन गावांना प्रत्येकी एक कोटीच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी, पाटावरच्या दोन पुलांना मंजुरी, विंचूर ते देवगाव ३३ केव्हीचे काम, रस्ते कॉंक्रिटीकरण ही माझ्या कारकिर्दीतील जमेची बाजू होय. शिवाय, वर्षभरात चार हजार रुग्णांची तपासणी व उपचार केल्याचे देखील अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

पक्षनेतृत्वाने सांगितल्यास लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. जनकल्याणाचा रथ ओढायचा असेल तर राजकीय पदांसारखे दुसरे अस्त्र नाही. अर्थात, सामाजिक कार्याचा वसा आयुष्यभर जोपासण्याचा माझा संकल्प आहे. ‘जेंडर इक्वॅलिटी’वर देखील काम करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रसंगी चळवळ उभी करण्याचीही तयारी आहे. सामाजिक व राजकीय कार्याच्या जोरावर परिवर्तनशीलतेशी जोडलेले नाते अव्याहत राहील, अशी यानिमित्त मी ग्वाही देते.

राजकारण हा व्यवसाय नव्हे, स्वत:ला लोकांसाठी वाहून घेण्याचे ते प्रबळ व विश्‍वासार्ह साधन आहे, या तत्वज्ञानावर माझा गाढा विश्‍वास आहे. किंबहुना आजवर मिळालेल्या यशाचा मी तो पाया समजते. सामाजिक कार्याच्या परीघ विस्तारासाठी राजकीय पदे पूरक ठरतात. म्हणूनच राजकारणाच्या शिडीवरून समाजकारणाचे शिखर गाठण्याचा माझा संकल्प आहे. याबाबत माझे कुटुंब आणि आप्तस्वकीय माझ्यामागे ठामपणे उभे आहेत

माझे बाबा (दिवंगत डॉ. वसंतराव पवार) हेच माझे गुरू, शिक्षक आणि मार्गदर्शक. त्यांच्या शिकवणुकीचा माझ्या प्रत्येक निर्णयावर प्रभाव आहे. घराण्याऐवजी स्वत:च्या कार्यकर्तृत्वातून ओळख निर्माण करण्याचा त्यांचा आग्रह मी सतत प्रमाण मानला.

राजकारणाचा तसा मला तिटकारा. मात्र, बाबांच्या अचानक जाण्याने आणि आईच्या सार्वजनिक जीवनातील प्रत्यक्ष सहभागामुळे मला या क्षेत्रात प्रवेशण्याची अपरिहार्यता स्वीकारावी लागली. राजकारणाहून गोदावरी बँकेचे अध्यक्षपद आव्हानात्मक वाटले. ते आव्हान मी स्वीकारले आहे.

(शब्दांकन : मिलिंद सजगुरे)

LEAVE A REPLY

*