सिन्नर l अलका जपे : सुप्त गुणांना वाव द्या…

0
स्त्रीमध्ये एक विश्‍व उभे करण्याची ताकद असते. ती शहरातली असो वा खेड्यातली, शिकलेली असो वा अडाणी, तिच्यात एक उद्योजक दडलेला असतो. रोजच्या आयुष्यात एका वेळेला अनेक कामे ती सांभाळत असल्याने झटपट निर्णय घेऊन ते तडीस लावण्याचे गुण तिच्यात जन्मजातच असले पाहिजेत. नाहीतर चौथीपर्यंतची चार बुके शिकलेली मी आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करू शकले नसते. कर्म केले तरच चांगले फळ मिळते यावर माझा विश्‍वास आहे. मी माहेरची अलका आनंदा डावखर. माझे शिक्षण चौथीपर्यंत झालेय. माझे माहेर सिन्नरमधले भुकणी गाव तर सासर कुंदेवाडीचे. २००३ मध्ये माझे लग्न झाले. घरचा व्यवसाय शेती आहे.

या भागात पाण्याचा मोठा प्रश्‍न होता. सहा जणांचे कुटुंब आहे. शेतीसाठी विजेची सोय नसल्याने शेती तोट्यातच जात होती. काय करायचे? घर कसे चालवायचे, प्रश्‍न पडला. त्यामुळे मी यांना म्हणाले, आपण काहीतरी व्यवसाय सुरू करूया. त्यानंतर मी नेरू आणि सायगलचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी सुरुवातीला फारसे भांडवल नव्हते. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांनी टाकून दिलेला रगडा गोळा करून तो शेतात आणून आम्ही कुटायचो. वाळूच्या चाळणीने तो रगडा चाळून त्यातून निघालेल्या पावडरपासून आम्ही सायगल तयार केला. तयार झालेला माल गाडीत भरून सिमेंटच्या कारखान्यांमध्ये थेट घेऊन जायचो. त्याची विक्री झाल्यावर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटायचे. दोन वर्षे प्रचंड संघर्ष केला. काबाडकष्ट केले. मार्केटिंग हे करायचे.

त्याला चांगली मागणी वाढली. मागणीइतका पुरवठा करण्यासाठी काही काळानंतर आमच्या कंपनीत कामगारांची भरती केली. व्यवसाय वाढला होता. त्यामुळे २००४ साली मुसळगाव औद्योगिक वसाहतीत जागा भाड्याने घेतली. तिथे नेरू आणि सायगल तयार करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री आणली. त्यामुळे उत्पादनातही आणखी वाढ झाली. आमच्या उत्पादनाचा दर्जा चांगला असल्याने पुणे, मुंबई येथूनही सिमेंट विक्रेते आमचा माल खरेदी करू लागले. तीन वर्षांनंतर आम्ही स्वतःच्या जागेत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि २००७ मध्ये औद्योगिक वसाहतीत स्वतःची जागा घेतली. या कामासाठी नामकर्ण आवारे आणि कमलाकर पोटे यांची मदत झाली. त्यानंतर वाटू लागले, यापेक्षा मोठे स्वप्न बाळगले पाहिजे.

आमचा उद्योग इतका वाढला की आणखी जागेची गरज भासू लागली. मग कारखान्याजवळचीच जागा विकत घेतली आणि कामाचा अधिक विस्तार केला. ओमकार इंडस्ट्रीज आणि वैष्णवी एन्टरप्रायजेस या दोन कंपन्यांची स्थापना केली. या दोन्ही फर्मचे मार्केटमध्ये चांगले नाव झालेय. प्लास्टरसाठी लागणार्‍या नेरू आणि जिप्समचे त्यात उत्पादन केले जाते. मी आमच्या उद्योगाचे पूर्ण व्यवस्थापन पाहते. त्यानंतर आम्ही २०१७ मध्ये बलवान सिमेंटचे लॉचिंग केले. आता माझे सिन्नरमधील मुसळगावला बलवान सिमेंट या नावाने युनिट आहे.

त्याची वार्षिक ५ ते ६ कोटी रुपये इतकी उलाढाल आहे. दरमहा ४० ते ४५ लाख रुपयांचा टर्न ओव्हर आहे. एकूण ९१० एजन्सींना आम्ही माल पुरवतो. आमचा माल धुळे, जालना, पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, गुजरात, राजस्थानला जातो. जलद वाहतूक हेही आमचे वैशिष्ट्य आहे. आमच्या स्वतःच्या चार-पाच गाड्या आहेत. जेसीबीही घेतले. त्याचाही व्यवसाय उत्तम चाललाय. आमचे बरेचसे ऑनलाईन काम चालते. आपुलकीने वागणे, प्रसंगी स्वतः काम करणे आणि चांगल्या दर्जाचा माल वेळेवर देणे यामुळे आम्ही एवढा पल्ला पार पाडू शकलो, असे वाटते.

मी उभ्या केलेल्या या व्यवसायामुळे पन्नास ते पंचावन्न कुटुंबांना रोजगार मिळालाय. यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो असे मी म्हणेन. कारण निर्णयप्रक्रियेपासून काम करण्यापर्यंत यांनीच माझी साथ दिली. वाचक महिलांना एवढेच सांगायचेय की, प्रत्येक स्त्रीमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्याकडेही त्यांनी लक्ष द्यावे.

(शब्दांकन : शिल्पा दातार-जोशी)

LEAVE A REPLY

*