मालेगाव l ऍड. ज्योती दीपक भोसले (सामाजिक) : कुटुंब अभंग रहावीत म्हणून…

0
माझे बालपण जालना जिल्ह्यातील अबंड येथे गेले. बालपणीचा काळ अत्यंत खडतर होता. चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार मोठा होता. लहान असताना आईचे निधन झाले. त्यामुळे आम्ही भावंडे आईच्या प्रेमला मुकलो. वडिलांचा वकिली व्यवसाय. ते चळवळीतले अस्सल कार्यकर्ते. सेवादल आणि छात्रभारती कामाचा त्यांच्यावर पगडा. आणीबाणीच्या काळात कारावासात होते. आमच्यावरही चळवळीचे संस्कार नकळत घडत गेले. अनुकूलतेच पुढारी घडतात अन् प्रतिकूलतेत कार्यकर्ते घडतात. माझी एक कार्यकर्ती म्हणून जडणघडण वडिलांच्या संस्कारात आणि याच प्रतिकूल परिस्थितीमुळे झाली.

महाराष्ट्रातील सर्वात तरुण वयाचे नगरसेवक म्हणून मालेगावातील दीपक भोसले यांची ओळख होती. माजी मंत्री निहाल अहमद यांच्यामुळे मला त्यांचेे स्थळ आले आणि विवाहानंतर मी मालेगावला आले. सासरीही चळवळीचे वातावरण होते. माझ्या चळवळ्या स्वभावला ते अत्यंत पोषक होते. पती आणि सासुबाई यांच्यामुळे मी विवाहानंतर कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली आणि वडिलांचा आदर्श घेऊन मी वकिली व्यवसायात उतरले.

प्रारंभीच्या काळात कौटुंबिक खटले माझ्याकडे येत होते. त्यांना कायद्याने लढून जोडपी विभक्त होताना मी पाहत. एक वकिली व्यवसायापुढे जाऊन तुटणार्‍या कुटुंबासाठी काहीतरी करावे असे वाटे. त्यामुळे मी घटस्फोटासाठी माझ्याकडे केस घेऊन येणार्‍या जोडप्यांच्या कायदा-न्यायालय याच्या बाहेर तडजोडी करण्यासाठी मी झटू लागले. पहिली केस एडस्ग्रस्त महिलेची मिळाली. तिची फसवणूक झाली होती. तिच्या पतीपासून तिला काडीमोड हवा होता. ती केस लढली. न्यायालयात लढण्यापेक्षा त्यांच्यात तडजोड करून त्यांना विभक्त होण्यापासून मी वाचवले. कारण मला तोडण्यापेक्षा तडजोड करुन संसार उभे करण्यात अधिक समाधान मिळे. या केसमध्ये मी सहा महिने दोघांनाही समुदेशन केले आणि ते दोघे घटस्फोट न घेता एकत्र राहू लागले.

तुटणार्‍या घरकुलाची आणि जोडप्यांच्या मनाची पुनबार्ंंधणी करणे, तडजोड करुन पुनर्उभारणीची प्रेरणा मला मिळाली. पुढेही हेच काम मी आवडीने करू लागले. वकिली व्यवसाय म्हणून बघताना मला पैशापेक्षा अशी दुभंगलेली मने आणि घरे जोडताना आनंद मिळू लागला. वकिलीच्या सुरुवातीच्या काळी विवाह झालेल्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण १० टक्के होते. आज ते ५० टक्के इतके वाढले आहे. हे बघताना माझे संवेदनशील मन आजही विषण्ण होते.

घरे तुटण्यापासून वाचवण्याची जबाबदारी कुणी घेत नाही म्हणून हे शिवधनुष्य स्वीकारले. संसार मोडून कुणाचेही भले होणार नाही, असे मला वाटते. एका व्यक्तीच्या विक्षीप्तपणाची शिक्षा अख्ख्या कुटुंबाने का भोगावी? माणसांच्या वृत्ती आणि प्रवृत्तीमुळे जोडप्यांनमध्ये मतभेद होतात. पण त्यांच्यात मनभेद होऊ नये, असे मला वाटते. केवळ स्त्रीला न्याय द्यायचा आणि पुरुषांकडे डोळेझाक करायची, असा एकांगी न्याय मला कधीच मान्य नाही. सामाजिक न्यायासाठी मी लढले आणि पुढेही लढणार.

घटस्फोटाच्या कारणांचा जेव्हा विचार येतो तेव्हा सोशल मीडियाचा अति वापर, यातून तत्काळ निर्माण होणार संंबंध, विवाहबाह्य संबंध, संशय हेच अलीकडच्या काळातले घटस्फोट वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे, यासह सुशिक्षीत मुली करिअरमध्ये पुढे गेल्या, परंतु त्यांना कौटुबिंक जबाबदार्‍या नकोशा झाल्यात हेही एक घटस्फोटाचे कारण आहे. यासह न्युक्लिअर कुटुंब, मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा लोप यामुळेही पती-पत्नीत बेबनाव होतात. कुटुंब दुभंगतात. संस्कार, मूल्य आणि तत्त्व नष्ट होत असल्याची फळे आपण माणसे भोगत आहोत.

माणसे घडवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. आजचे शिक्षण रोजगार, करियर देतेे. परंतु त्यात सुसंस्कृतपणाचा लवलेशही नाही. आपण शिकलो म्हणजे पुस्तके वाचली, पदव्या घेतल्या. शिक्षणाने येणारा सुसंस्कृतपणा, साम्यंजस्य, शहाणपण आले नाही. त्यामुळे घटस्फोटासारख्या सामाजिक समस्या वाढल्या. स्वातंत्र आणि स्वैराचार यातील यातील सीमारेषा नव्या पिढीला समजत नाही. यासाठी कार्य करावे, अशी माझी मनिषा आहे.

पैशांच्या मोहापायी नवी पिढी चंगळवाद, भौतिकसुखे, सुखलोलुपता याकडे वळाली. त्याग, आस्था, आपुलकी नष्ट होत जात आहे. अशा पिढीतील तरुण जोडपी झपाट्याने घटस्फोटाकडे वळत गेली. माझ्याकडे येणार्‍या घटस्फोटाच्या केसेस मी न्यायलयापर्यंत जाऊच देत नाही. न्यायालयाबाहेर त्यांचाच समझोता करण्याचा माझा प्रयत्न यशस्वी होत आहे. आजवर मी ३ हजारांहून अधिक जोडप्यांंच्या केसेस हाताळल्या. त्यातील अडीच हजाराहून अधिक खटले न्यायालयाबाहेर हाताळत घर-संसार मोडण्यापासून वाचवले. घटस्फोटासाठी येणार्‍या जोडप्यांना मी बाहेरच समुपदेशन देते. अनेकांचे संसार मोडण्यापासून वाचवू शकले, याचे समाधान वाटते.

आपले सर्व कायदे स्त्रियांच्याकडे न्याय देताना झुकलेले आहेत. मात्र, पुरुषही स्त्री स्वैराचाराला बळी पडत असतात. पतीही आज पत्नीच्या अत्याचारामुळे त्रस्त होऊन घटस्फोटाचा निर्णय घेताना मी पाहते. त्यांनाही न्याय देत मी त्याच्या पत्नीच्या चुका दाखवते. घरगुती हिंसा कायदा फार एकांगी आहे. स्त्रीला कायद्याने दिलेल्या अती संरक्षणामुळे पुरुषांची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे मला वाटते. स्त्रित्त्वाचा फाजिल अहंकार मला मान्य नाही. किंबहुना मी स्त्रीवादी वगैरे मुळीच नाही. सामाजिक न्याय हे माझे तत्त्व आहे आणि ज्या कुणावर अन्याय होतो, मग तो स्त्री असो अथवा पुरुष त्याला न्याय देणे हेच माझे काम आहे.

स्त्रियांनी कायद्याचा वापर न करता स्वत:ला न्याय देणारी स्त्री मला सक्षम वाटते. पती-पत्नीने कायदा, न्यायसंस्था यांचा आधार घेण्यापेक्षा स्वत:तील सामंजस्याने नातेसंबंध अबाधित ठेवावेत, असे वाटते. आजवर माझ्याकडे स्त्रियांच्या केसेस येत होत होत्या. आज पुरुषांच्या केसेसमध्येही वाढ होत आहे. स्त्रियांसारखेच पुरुषांच्याही केसेस मी लढवते आणि त्यातही न तोडता घरे उभे राहावी, यासाठी माझा कायम प्रयत्न सुरू आहे.

एक घटना माझ्या चांगली लक्षात राहिली. काही वर्षांपूर्वी मी एका तरुण मुलीचा घटस्फोट होण्यापासून वाचवले. तिच्या पतीची दारू माझ्यामुळे सुटली. अनेक वर्षांनंतर तीने एका विवाह समारंभात माझ्यासमोर आली म्हणाली, मॅडम तुमच्यामुळे माझा तुटणारा संसार वाचला. आज माझा पती दारुमुक्त झाला आणि हे सर्व तुमच्यामुळे साध्य झाले, असे म्हणत तीने सर्वांसमोर माझा पायाला स्पर्श केला. त्या दिवशी तिने दिलेला तो शब्द आणि माझे मानलेले आभार हे माझ्यासाठी जगातला सर्वोच्च पुरस्कार वाटला.

दुभंगणारे अनेक घरे आज मजबूतपणे उभे आहेत. त्यांच्या संसारवेलीवर फुले उमलली आहेत, यापेक्षा वेगळा आणि मोठा पुरस्कार काय असू शकतो ? माझ्यातली सच्ची कार्यकर्ती मी नेहमीच जिवंत ठेवते. त्यामुळे कौटुंबिक न्यायालायतील खटल्यांव्यतिरिक्त मी सामाजिक कार्यात देता येईल तितके योगदान देते. पर्यावरण रक्षण हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. वटसावित्री पौर्णिमेला पर्यावरणाची झालर देत मी हा सण साजरा केला.

त्यावेळी ५१ वडांची झाडे लावली. अशावेळी लोकसहभागाची गरज जाणवते. यापुढे लोकवर्गणीतून लोक सहभाग असा उपक्रम राबवून मी सामाजिक कामे करणार आहे. त्यादृष्टीने मी महिलांमध्ये पर्यावरणाची जागृती अभियान राबवण्यास प्रारंभ केला आहे. सोशल माध्यमांमुळे नव पिढी बरबाद होत असताना मी पाहतेे. या व्यसनातून तरुणाईला बाहेर काढण्यासाठी मी येत्या काळात मोठी चळवळ उभी करणार आहे.

माणूस म्हणून एकमेकांच्या अडचणी समजून घेत तडजोडी स्वीकारल्या तर कायदा, न्यायालये याची गरज राहणार नाही. अखंड कुटुंब ठेवायची असतील तर पती-पत्नीने परस्परांना समजून घेत तडजोड करावी. स्वत: घर तोलून धरताना समाज तोलून धरणारी प्रत्येक स्त्री कर्मयोगिनीच आहे.

समाजात आईपण हरवत चालले आहे, असे मला वाटते. मला समाजाची आई व्हायचे आहे. माझ्यात एक संवेदनशील कवयित्री लपली आहे. कामाचा क्षीण, थकवा आल्यास मी शब्दातून अभिव्यक्त होते. माझ्याच कवितेतून मी कशी हे सांगायचे झाल्यास..
कुणाशीही स्पर्धा न करता स्वत:च स्वत:चा स्पर्धक बनणारी,
वाईटला वळणावरच सोडून चांगल्याची कास धरणारी,
पतीने दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर स्वैराचाराने न करणारी,
मुलांना वेळ कमी दिला म्हणून दोन आसवे गाळणारी,
उद्याचा सकाळ हसत झेलणारी,
माणुसकीचा अनमोल ठेवा पावलोपावली जपणारी,
अशी मी अत्यंत सामान्य जीवन जगणारी…….

कुटुंबांचे प्रश्‍न सोडवता मी त्यांची आई होते. समाजाची आईपणे स्वीकारताना प्रबोधन आणि शिस्त याचे धडे मी देत असते. अनेक तुटणारे संसार जेव्हा मी वाचवते, त्यावेळी मला विलक्षण अनुभूती येते ती शब्दात नाही सांगता येणार.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*