नाशिक l आसावरी देशपांडे : इतनी शक्ती हमे दे ना…

0
एमएसडब्ल्यू करत असताना मला विवेक पंडितांच्या विधायक संसद संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून कामाची संधी मिळाली. विधानसभा प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचा सामाजिक संस्थांच्या दृष्टिकोनातून अभ्यास करून त्यातील निष्कर्षांचे सादरीकरण मला करायचे होते. ते काम मी केले. दरम्यान, विवाहानंतर मी नाशिकला आले. सामाजिक काम करायचे होतेच. संधी शोधत होते. कालांतराने प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या टारगेटेड इंटरव्हेशन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी माझी निवड झाली. हे काम खूप आव्हानात्मक होते. म्हणूनच मी ते स्वीकारले.

संस्थेतर्फे वारांगणांमध्ये ‘एचआयव्ही’ जागृतीसाठी आम्ही काम सुरू केले. नाशिकमध्ये देहव्यापार कुठे चालतो त्या ठिकाणांची माहिती घेण्यापासून सुरुवात केली. अशा कोठ्यावरील मॅनेजरशी संवाद साधून तिथे प्रवेश मिळवणे हे खूप आव्हानात्मक काम होते. तेथील महिलांच्या रक्ताची तपासणी, निरोध वाटप करणे आमच्या कामाचा भाग होता. काम सोपे नव्हतेच. माझे निरीक्षण सुुरू होते. काहीजणींची फसवणूक करून त्यांना बळजबरीने अशा कामात ढकलले होते. काहीजणी नाईलाज म्हणून यात आल्या होत्या. त्यांची जगण्याची उमेद हरवली होती. त्यांच्या वेदना, त्यांचे जगणे पाहून आमचे हृदय पिळवटून जाते. वारांगणांसाठी ‘ऍडोव्हकसी’ करत त्यांच्या उत्थानासाठी पोलीस आणि माध्यमांचे समर्थन मिळवणे गरजेचे होते.

त्या महिलांचा विश्‍वास संपादन करून त्यांना त्यांच्या भल्यासाठी कुणीतरी काम करतेय ही भावना तयार होणे गरजेचे होते. म्हणून सुुरुवातीला आम्ही त्यांच्या मुलांबरोबर काम सुरू केले. प्रारंभी त्यांच्या मुलांचे शिक्षण, वारांगणांचे आरोग्य आणि पोलिसांंना बरोबर घेऊन काम असे आमच्या कामाचे स्वरूप होते. तत्कालीन पोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी याकामी आम्हाला खूप मदत केली. वारांगणांचे पुनर्वसन हा केवळ गुन्ह्यापुरता सीमित विषय नाही तर त्याला सामाजिक पदरही आहेत. त्यावेळी नाशिकमध्ये सर्वप्रथम वारांगणा, पोलीस एकत्र येऊन त्यांच्यातील संवादाला प्रारंभ झाला. आपल्या भल्यासाठी हे लोक काम करत आहेत ही जाणीव त्यांना झाली. आमच्यावरचा त्यांचा विश्‍वासही वाढला. त्यातून आम्हाला त्यांचे सहकार्य मिळत गेले.

मालकीणी आणि मॅनेजर्ससोबतही आम्हाला काम करावे लागेे. व्यवसाय चालवणारे आणि मॅनेजर्स कायद्याने गुन्हेगार ठरतात आणि देहव्यापार करणार्‍या स्त्रीया ‘पीडित’ आहेत असे आम्ही पोलिसांसह सर्वांना सांगत होतो. सार्वजनिक ठिकाणी वारांगणा ग्राहकांना आकर्षित करत असतील तर त्याही कायद्याच्या कक्षेत येतात आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. या बाबी मालकिणींना आणि तेथील व्यवस्थापकांना सांगायचो. त्यामुळे ते आम्हाला सहकार्य करू लागले.
विशिष्ट वय उलटल्यानंतर अशा स्त्रियांना तेथील मालक वार्‍यावर सोडून देत होते. त्याला आम्ही विरोध केला. हे वागणे योग्य नाही हे पटवून दिले. अशा महिलांना मग इतर कामात वळवून त्यांची रोजीरोटी सुुरू ठेवली. या एका समस्येवर अनेक मार्गांनी काम सुुरू होते.

त्यामुळे अनेक सकारात्मक बदल दिसू लागले. वारांगणांचे प्रश्‍न मोठे होते. त्यांच्याशीही सार्वजनिकरीत्या दुर्वर्तन केले जायचे. ही गोष्ट आम्ही पूर्णत: बंद केली. एकही अल्पवयीन मुलगी या व्यवसायात असू नये म्हणून आम्ही लढा उभारला. परिस्थितीमुळे किंवा स्वत:च्या मर्जीने का होईना पण एकही अल्पवयीन मुलगी या दलदलीत फसू नये म्हणून आम्ही खूप काम केले. ज्यांना यातून बाहेर पडायचे होते त्यांना आम्ही बाहेर काढत गेलो. आज नाशिक जिल्ह्यापुरता विचार केला तर एकही महिला तिच्या मर्जीशिवाय या व्यवसायात नाही, हे मी सांगू शकते.

दलदलीत अडकलेल्या महिलांची या व्यवसातून सुटका करून त्यांना मदत करणे हे पोलिसांचे काम असते. एखाद्या महिलेला या व्यवसायातून बाहेर पडायचे असेल तर तिने पोलीस स्टेशनला जाऊन सांगणे गरजचे असते. मात्र त्या काळात अशा महिलांना पोलिसांची इतकी भीती होती की त्या अशा कामांसाठीदेखील पोलिसांकडे जात नसत. त्यांना गुन्हेगार न मानता ‘पीडित’ म्हणून वागणूक दिली जावी, अशी पोलिसांकडून अपेक्षा होती. मात्र पोलीस स्टेशनमध्ये नैतिकता आणि कायद्यात गल्लत होत असलेली दिसत होती. हे बदलण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणे गरजेचे होते. तो मी घेतला. त्यावेळी पोलिसांनाच अनकेदा कायद्याची व प्रोटोकॉलची समग्र माहिती नसायची. आम्ही पिटा (प्रिव्हेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट) कायद्याचा अभ्यास केला.

कोठा मालकीण व यांना गुन्हेगार समजून त्यांच्याशी वर्तन केले जायचे. पण वारांगणांना तशी वागणूक देऊ नये यासाठी मी हालचाली सुुरू केल्या. त्यावेळी अनेकदा मध्यरात्री माझा फोन खणखणयाचा. आवाज यायचा, मॅडम रेड पडली. आम्हाला तुमची मदत हवी आहे. लगेच या. अशावेळी मध्यरात्री धाव घ्यावी लागायची. छापा पडल्यानंतर जेव्हा अशा स्त्रियांना सुधारगृहात पाठवले जाते तेव्हा तिच्या कमाईवर अवलंबून असलेली मुले आणि इतर सदस्य उद्ध्वस्त होत रस्त्यावर येेत असत. अशावेळी या महिलांना सुधारगृहात टाकून त्यांच्यात खरेच सुधारणा होणार आहे का, हा प्रश्‍न मला छळू लागला.

म्हणूनच अशा स्त्रियांंमध्ये बदल घडवून आणायचा असेल, त्यांना ‘अशा’ दलदलीतून बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या मानसिकतेत बदल घडवणे गरजेचे होते. म्हणूनच आम्ही तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांशी बोललो. पोलिसांची भूमिका कशी हवी, त्यांनी कोणते प्रोटोकॉल पाळावेत, कोणत्या ‘प्रोसिजर्स’ पाळाव्यात यासाठी खूप पाठपुरावा केला. पोलिसांच्या आणि माध्यमकर्मींच्याही कार्यशाळा घेतल्या. या दोन्ही घटकांमध्ये याबाबत जागृती दिसून आली. या विषयाशी संबंधित बातम्या जबाबदारीने छापून येऊ लागल्या होत्या.

एकीकडे वारांगणांसोबत काम सुरू होते तर दुसरीकडे एमएसएम आणि तृतीयपंथी यांच्यावरही काम करणे गरजेचे होते. पाथ फाईंडरसोबत काम करताना एचआयव्हीची अधिक शक्यता असणारा समूह शोधून काढून त्याच्यासोबत काम करायचे होते. अशी लागण होणार्‍यांमध्ये वारांगणा आणि तृतीयपंथी यांंचे प्रमाण अधिक असते. पण समलैंगिक पुरुषांचे प्रमाणही मोठे असते. अशावेळी तृतीयपंथी आणि समलैंगिकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप आव्हानात्मक काम होेते. कारण हे लोक भूमिगतासारखे छुपे जीवन जगतात. तृतीयपंथी नजरेला दिसतात परंतु समलैंगिक नाशिकसारख्या शहरात नसावीत असा आमचा समज होता जो प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर साफ खोटा ठरला.

नाशिक जिल्ह्यात आज सातशेहून अधिक समलैंगिक लोकांची नोंद आहे. याव्यतिरिक्त नोंदणी न झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. अशाप्रकारे आम्ही एमएसएम (पुरुषांसोबत संबंध ठेवणारे) आणि ट्रान्सजेंडरपर्यंत पोहोचलो. त्यातून एचआयव्हीचा अटकाव होण्यासाठी काम सुरू केले. समलैंगिक आणि ट्रान्सजेंडरर्समध्ये जागृती करण्यासाठी त्यांच्यातील शिकलेले, नेतृत्वाचे गुण असलेले लोक निवडले आणि समलैंगिकांच्या समूहासोबत कामाला प्रारंभ झाला. त्यांचे समुपदेशन, आरोग्याची काळजी घेणे असे काम सुरू केले. सन २०१० मध्ये सेक्सवर्कर्स महिलांची पहिली दिशा महिला संघटना तर सन २०१२ मध्ये मनमिलन ही तृतीयपंथी, गे, ट्रान्सजेंडर, बायसेक्सुअल्स यांच्यासाठी कार्य करणारी संघटना स्थापन झाली. ‘दिशा’ आणि ‘मनमिलन’ या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कामातून पुढे आलेल्या नोंदणीकृत संस्था आहेत.

वारांगणा, तृतीयपंथी, एमएसएमसाठी उत्थानांचे काम आधी मी मानधन घेेऊन करत होते. पण आता सेवा म्हणून करत आहे. नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झाली आहे. या कामामुळे मला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला आहे. त्यातून माझा माझ्याशी संवाद विकसित होत आहे. यातून मी माणूस कमावला. सेक्स वर्कर्स, तृतीयपंथी, समलैंगिक यांचे खूप प्रेम मला मिळाले, मिळत आहे. माझ्या मुलाच्या मौंजीत ही सर्व मंडळी आली होती. समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलण्यास वेळ लागेल पण मी त्यांना वेगळे मानत नाही. शोषितांवर होणारा अन्याय, समलैंगिकांची कुचबंणा, त्यांना समाजामध्ये नसलेले स्थान, भूमिगतांसारखे आयुष्य जगायला लागणे हे सुुरू असताना मी कशी शांत बसू शकते? समाजातील काहींचा लैंगिक कल, जीवशास्त्रीय जडणघडण, आवड वेगळी आहे म्हणून आपण त्यांना नाकारायचे का? त्यांच्यातही सर्जनशीलता, नावीन्याचा ध्यास, कल्पकता, अभिनवता असतेच. मग त्यांच्या गुणांसह त्यांच्या वेगळेपणाचा आपण कधी स्वीकार करणार आहोत की नाही?

अशांची दु:खे कमी करण्यासाठी ईश्‍वर मला बळ देत राहो अशी मी रोज प्रार्थना देवाकडे करत असते. काम करत असताना प्रत्येक क्षणी माणूसपण महत्त्वाचे आणि मानवता हाच खरा धर्म हा विचार अधिक प्रबळ होत जातो. मग अशावेळी नकळतपणे प्रार्थना ही ओठांवर येते…‘इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्‍वास कमजोर हो ना…’

नैतिकता आणि कायदा

या व्यवसायातील महिलांंवर पोलीस पिटाअंतर्गत कारवाई करतात. सिन्नरमध्ये वारांगणांच्या वस्तीवर धाड पडली असता तिथेही हेच झाले. त्यावेळी आम्ही ‘पिटा’ कमिटीकडे गेलो आणि सांगितले, हे चुकीचे आहे. तुम्ही वारांगणांना हा कायदा लावून गुन्हेगार करू नका. राज्य तसेच जिल्हा पातळीवर पिटा कमिटी असते. तुमचे म्हणणे लेखी द्या, असे आम्हाला सांगण्यात आले. परंतु असे करण्यात आमचा वेळ खूप जाणार होता आणि दरम्यानच्या काळात एफआयआर दाखल झाली असती. मी याचा विरोध केला. कायद्याने जे गुन्हेगार नाहीत त्यांना पोलीस कस्टडीत ठेऊ नये हा नियम आहे. त्यामुळेे अशा महिलांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येऊ नये, ही माझी ठाम भूमिका होती. मी त्यांना सांंगितले, तुम्ही विशेष न्यायदंडाधिकार्‍यांकडून जाऊन ऑर्डर काढा आणि अशा महिलांना महिला आणि बालकल्याणच्या वात्सल्य वसतिगृहात ठेवा, असे सांगितले. आमचा एक स्वयंसेवक सिन्नरला गेला आणि या महिलांना गाडीत घेऊन अशोकस्तंभावरील वात्सल्यमध्ये घेऊन आला. ही घटना खूपच माईलस्टोन होती. कारण त्यानंतर पोलिसांकडून ‘पिटा’अंतर्गत सर्वांना जेलमध्ये टाकण्याची कारवाई पुन्हा कधीही झाली नाही. मला याच कामातून समाधान मिळते. यातून मिळणारे समाधान माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे.

अन्याय मी सहनच करू शकत नाही. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग ती वारांगणा, तृतीयपंंथी, गे, समलैंगिक कोणीही असो. तीही माणसेच आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मी अखेरच्या श्‍वासापर्यंत झगडत राहणार. या लोेकांसाठी सेवा देणे माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग, माझी पॅशन झाली आहे.

सेक्सवर्कर्स समाजातील सर्वात नाकारलेला घटक आहे. समाजात त्यांना प्रतिष्ठा नाही. कायद्याच्या दृष्टीनेही त्या गुन्हेगार आहे. अशांसाठी जेव्हा मी काम करते त्यावेळी संघर्ष अटळ आणि न संपणारा आहेे. समाजाशी डोकं लावून कधीतरी थकायला होते.

 राजकारणाचा फायदा घेत काही समाजकंटकांनी आमच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली होती. मलाही पोलीस स्टेशनला जावे लागले होते. त्यावेळी भद्रकालीतील या व्यवसायातील सर्व महिला माझ्यासोबत पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. आसावरीताई आमच्या चांगल्यासाठी झटतात. आमच्या समस्या सोडवतात, असे या महिलांनी पोलिसांना सांगितले होते.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

LEAVE A REPLY

*