देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी स्वीकारते आव्हाने – सुप्रिया नाथे

0
सुप्रिया नाथे
*  गेली २५ वर्षे आर्किटेक्ट क्षेत्रात कार्यरत
*  गत १० वर्षांपासून योगाभ्यास करत आहेत
*  इंटिरिअर डेकोरेटर म्हणूनही काम
*  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझायनिंगचा पुरस्कार, वूमन आर्किटेक्ट आर्टिस्ट डिझाईनचा पुरस्कार
मी आर्किटेक्ट सुप्रिया नाथे. माझा जन्म पुण्यातला असून माझे संपूर्ण शिक्षणही पुण्यामध्येच झाले. लग्नानंतर नाशिकमध्ये आले. माझे सासरे दत्तात्रय नाथे, नाशिकमधले नामवंत आर्किटेक्ट आणि माझे पतीसुद्धा आर्किटेक्ट आहेत. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर झाल्यानंतर माझे लग्न झाले. मला दोन मुली आहेत. मोठी मुलगी आर्किटेक्ट तर लहान मुलगी बी. बी. ए. च शिक्षण घेत आहे. लग्न झाल्यानंतर मी काम करण्यास सुरुवात केली. गेली २५ वर्षे मी आर्किटेक्ट म्हणून काम करत आहे.
मला घर सजवणे, ते नीटनेटके ठेवणे या गोष्टी खूप आवडतात. आमच्या ऑफिसमध्ये इंटिरिअरचे काम कोणी बघत नव्हते. म्हणून मी इंटिरिअर डेकोरेटर म्हणूनही काम बघण्यास सुरुवात केली. संपूर्ण कुटुंब या क्षेत्रात काम करत असल्याने मला कामासाठी कोणीच कधी नाही म्हंटले नाही. प्रत्येकवेळी ते माझ्या पाठिशी ठामपणे उभे असतात.
माझे वडील पुण्यात बिल्डर आहेत. माझी लहानपणापासून चित्रकला उत्तम होती. हे पाहून बाबांनी मला आर्किटेक्चरच शिक्षण घेण्यास सुचवले. जेणेकरून पुढे जाऊन त्यांनाही मी त्यांच्या कामात मदत करू शकेन. पुढे माझाही रस त्यात वाढला आणि मी आर्किटेक्ट झाले.
माझे सासरे नाशिकमधील नामवंत आर्किटेक्ट असल्याने मला काम करताना अडचणींना सामोरे जावे लागले नाही. काम करताना खूप चांगले अनुभव आले. एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो, दागिन्यांच्या दुकानाचा एक क्लायंट आमच्याकडे आला आणि आम्हाला म्हणाला की, मला एका महिन्यामध्ये आमच्या दुकानाची सुरुवात करायची आहे.तर तुम्ही आम्हाला एका महिन्यात काम पूर्ण करून द्याल का? ते दिवस पावसाळ्याचे होते. अगदी काटेकोरपणे आम्हाला हे काम करावे लागणार होते. पण एका महिन्यात त्यांना आम्ही काम पूर्ण करून दिले. त्या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी तिथे आमचा सत्कारही केला.
मला अशाप्रकारची आव्हानात्मक कामे करायला आवडतात. मी अशी आव्हाने नेहमीच स्वीकारते आणि काम करते. मी नेहमी हा विचार करते की, क्लायंटची मागणी काय आहे? त्याच्या मागणीनुसार त्यांना हवे तसे मी देत आहे का? मी जर क्लायंटच्या जागी असेन तर मला काय वाटते? अशाप्रकारे क्लायंटच्या दृष्टीने विचार केल्याने त्याला हवे तसे काम करून त्यांना समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न करते.
मराठा विद्या प्रसारकचे बरचसे काम आम्ही केलेले आहे. डॉ. वसंत पवार मराठा विद्या प्रसारक मेडिकल कॉलेजचे कामसुद्धा आम्ही केलेले आहे. आमच्या ऑफिसचे नाव ‘असोसिएटेड आर्किटेक्टस अँड इंजिनियर्स’ असे आहे. या ऑफिसची संकल्पना खूप वेगळी आहे. ऑफिसमध्ये बसल्यानंतर आपण झाडाखाली बसलेलो आहोत, असे वाटते.
या ऑफिसच्या इंटिरिअरसाठी बरीचशी पारितोषिकेही आम्हाला मिळालेली आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझायनिंग (आय.आय.आय.डी)चा पुरस्कार, वूमन आर्किटेक्ट आर्टिस्ट डिझाईनचा पुरस्कार इत्यादी.
मी माझ्या कामामध्ये नेहमीच समाधानी असते. अर्थात चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत आणि कामाच्या नवनवीन संधी मिळाव्यात, अशी इच्छा आहेच. पण मला असही वाटते की, आर्किटेक्टने केलेल्या कामाची काळजी क्लायंटनेसुद्धा नंतर घ्यायला हवी. त्या प्रोजेक्टची देखभाल त्या क्लायंटने घेतली पाहिजे.
माझ्या कामाबरोबरच मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला खूप आवडते. त्याचप्रमाणे मला योगाभ्यास करायला आवडतो. मी गेल्या दहा वर्षांपासून न चुकवता योगाभ्यास करते.
मला युवा आर्किटेक्टसला हेच सांगावासे वाटते की, तुम्हाला खरेच या क्षेत्रात रस असेल तरच तुम्ही या क्षेत्रात या. या क्षेत्रात येताना तुमची कष्ट करण्याची तयारी हवी. तुमच्यामध्ये संयम हवा. क्लायंटला चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी संयम गरजेचा आहे. तिथे तुम्ही कटकट करून चालत नाही.
आपण त्यांच्यासाठी घर बनवतो. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकाचे राहणीमान वेगळे असते. यावेळी तुम्ही असे नाही म्हणू शकत की, मी जसे घर बनवेल त्यातच त्याने राहायचे. त्यामुळे त्याचा, कुटुंबाचा, विचारसरणीचा विचार करून मग काम करणे गरजेचे आहे. या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याला हवे ते तुम्ही तुमच्या शैलीत फुलवू शकता.

LEAVE A REPLY

*