देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : आवड समजून ती जोपासा-श्रेया राठी

0
श्रेया राठी

*  बुद्धिबळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन
*  एकाचवेळी विज्ञान शाखेचा अभ्यास आणि खेळ असा सुरेख संगम
*  स्केटिंगमध्येही राष्ट्रीय पातळीवर सहभाग

माझे नाव श्रेया राठी आहे. घरात मी सगळ्यात मोठी. मला एक लहान भाऊ आणि एक बहीण आहे. माझ्या बाबांची जाहिरात कंपनी आहे. आईदेखील त्यांना त्यात मदत करते आणि ती एल.आय.सी. एजंट आहे. मी १० वीपर्यंत विसडम हाय शाळेत होते. त्यानंतर ११ वी, १२ वी व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये पूर्ण केले आणि आता मी मोतीवाला होमियोपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बी.एच.एम.एस.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

मी तिसरीत होते तेव्हा मी राष्ट्रीय पातळीवर स्केटिंग करायचे. पण काही कारणांमुळे मला ते सोडावे लागले. पण त्याचवेळी मी स्वीमिंग, कराटेदेखील करायचे. पण मी कधीच एका जागी शांत बसत नव्हते. त्यावेळी माझ्या बाबांना अनेक जणांनी सांगितले की, हिला चेस शिकवा जेणेकरून तिची एकाग्रता वाढेल. त्यामुळे मग मी या खेळाकडे वळाले. मला तेव्हा हा खेळ फारसा आवडत नव्हता. तरीही माझी पहिली मॅच मी चौथीत खेळले. त्यात मला बक्षीसही मिळाले. त्यानंतर मला तो खेळ आवडायला लागला.

मी महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय पातळीवर खेळते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहे. १० वी झाल्यानंतर मला सगळे म्हणायला लागले की, विज्ञान शाखेत प्रवेश घेतलास तर तुला खेळासाठी वेळ मिळणार नाही. पण मला त्या लोकांना दाखवून द्यायचे होते की मी एकाच वेळी माझ्या विज्ञान शाखेचा अभ्यास आणि माझा खेळ हे दोन्ही करू शकते

. या सगळ्यामध्ये माझा सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे माझे आणि माझ्या बाबांचे नाते अधिक दृढ झाले. माझ्या बाबांनी मला आणि माझ्या बहिणीला खूप प्रोत्साहन दिले. यामुळे मला बाहेरचे जग बघता आले.

नवीन ओळखी झाल्या. मला समजले की नवीन लोकांशी कसे बोलायचे, कसे वागायचे. पण त्याचबरोबर वाईट अनुभव असा की, मला सारखे माझ्या घरापासून, शहरापासून सतत दूर जावे लागायचे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मी कधीच कोणत्या कॅम्पला गेले नाही. कधी कुठे फिरायला गेले नाही. त्यामुळे असे वाटते की, मी माझे बालपण काहीच जगले नाही. पण त्याचमुळे मी आज एवढी पुढे जाऊ शकते आहे, स्वतःच्या पायावर उभे राहत आहे.

खेळ म्हटले की हार-जीत होणारच. मी सुरुवातीला जेव्हा खेळायचे तेव्हा मी मोठ्या खेळाडूंसमोर हारायचे आणि लहान खेळाडूंसमोरदेखील खूप हारायचे. तेव्हा मला वाटायचे की मला काहीच करता येणार नाही. त्यामुळे या हारमध्येच तुझी जीत आहे हे सारखे स्वतःला समजून सांगणे हेच माझ्यासमोर मोठे आव्हान होते. त्याचबरोबर माझे शिक्षण सांभाळून मला खेळातदेखील पुढे जायचे होते.

या खेळात मुलींना स्पर्धा नाही, असे त्यावेळी म्हणायचे. ते माझ्यासाठी आव्हानच होते. त्यात मुले आणि मुली असे दोन विभाग होते. मुली मुलांच्या विभागातून खेळू शकतात पण मुले मुलींच्या विभागात खेळू शकत नाहीत. माझ्या बाबांनी मला मुलांच्या विभागातून खेळवले. मी जिंकलेदेखील आणि माझ्या आव्हानांना मी सामोरे गेले.

याबरोबरच मी एक कथ्थक नृत्यांगना आहे. विद्या देशपांडे यांच्याकडे मी शिकते आहे. कथ्थकच्या चार परीक्षा मी दिलेल्या आहेत. मला कादंबर्‍या वाचायला आवडतात. त्यात मला भय वाटणारे विषय वाचायला खूप आवडतात. त्याचबरोबर मला स्वीमिंग करायला पण खूप आवडते. या सगळ्याला मी विशिष्ट वेळ राखून ठेवली आहे. हे सगळे करायला थोडे कठीण जाते पण मला जेव्हा जसा वेळ मिळेल तसे मी हे सगळे छंद जोपासते.

मुलींना मला सांगायचेय की, आपली आई, आपले वडील आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला वेळ देतात, तर आपणही त्यांच्यासाठी २ ते ३ गोष्टी एका वेळी करायला हव्यात. जर मुलींचा स्वतःवर विश्‍वास असेल तर त्या काहीही करू शकतात.

मी पालकांना असे सांगेन की, आपल्या मुलीची आवड समजून घ्या. अभ्यासाबरोबरच तिची आवड तिला जोपासू द्या. तिला प्रोत्साहन द्या. तरच ती मुलगी आत्मविश्‍वासाने खूप पुढे जाईल.

LEAVE A REPLY

*