देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती शक्य – संगीता पानगव्हाणे-मुठाळ

0
संगीता पानगव्हाणे-मुठाळ
*  केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका
*  मराठी विज्ञान परिषदेच्या विकासासाठी सिंहाचा वाटा
*  समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी आग्रही
*  मराठीतून विज्ञानाच्या प्रचारासाठी पुढाकार
मी संगीता पानगव्हाणे- मुठाळ. माझा जन्म सिन्नर तालुक्यातील चोंधीमेंढी गावातला. पण आम्ही माझ्या चौथीनंतर नाशिकमध्ये स्थायिक झालो. माझे शिक्षण एम.एससी.एम.एड. झाले आहे आणि मी आता एम.फिल करत आहे. त्याचबरोबर मी केटीएचएम महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. माझे पती आरवायके महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मी घरात सगळ्यात मोठी. आमच्याकडे मुलगा-मुलगी असा भेदभाव कधीच झाला नाही. मला लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती.
आपण जे शिक्षण घेतोय त्याचा आपल्या वागणुकीत फायदा झाला पाहिजे, असे मला सतत वाटायचे. त्याप्रमाणे मी स्वतःला बदलत होते. लग्नानंतरदेखील आमचे कुटुंब काळानुरूप बदलणारे होते. आपण म्हणतो की एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब साक्षर करते. परंतु आज मी म्हणेन की जर एक स्त्री विज्ञान साक्षर असेल तर पुढच्या अनेक पिढ्या विज्ञान साक्षर होतील. मराठी भाषेतून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे हा मराठी विज्ञान परिषदेचा मुख्य हेतू आहे.
मी एक प्राध्यापिका आहे. त्यामुळे माझ्या कामातून मी याचा प्रसार सहज करू शकेन, असे मला वाटले. अचानक २००९ ला मला मराठी विज्ञान परिषदेची एक व्यक्ती भेटली. त्यांच्याशी संवाद झाल्यावर मला लक्षात आले की या कामासाठी कार्यकर्त्यांची खूप गरज आहे. मग मी त्या परिषदेमध्ये काम करायला सुरुवात केली. वार्षिक अभ्यासक्रम बनवला. वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून, खेळांमधून, प्रत्यक्ष कामातून मुलांना विज्ञान, भूगोल, इतिहास असे वेगवेगळे विषय आम्ही शिकवतो. यात काम करताना चांगले-वाईट दोन्ही अनुभव आले.
एकदा मी सकाळी रस्त्याने जात असताना एका चहावाल्याने एक कप चहा सूर्याला अर्घ्य म्हणून दिला. मी त्याला सांगितले की, तुमची भावना अशीच असू द्या. पण चहा फेकण्यापेक्षा त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करा. तो एखाद्या गरिबाला द्या, एखाद्या आजारी माणसाला द्या. दैनंदिन कामामध्ये मी वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल जनजागृती करायला सुरुवात केली आणि मला त्यात यश मिळत गेले. पण वाईट अनुभव म्हणजे आपण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगितली तर ती त्याला पटलेच असे नाही. त्यांना ती पटवून देणे हे खूप अवघड होते. सुरुवातीला मला त्यात अपयश आले. पण हळूहळू यशस्वी होत गेले.
या परिषदेची शाखा मुंबईशी संलग्न आहे, परंतु यासाठी जिल्हा पातळीवर कोणताही निधी येत नाही. सुरुवातीला काम करण्यासाठी निधी गोळा करणे खूप मोठे आव्हान होते. म्हणून आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या कार्यशाळा भरवतो व त्यासाठी मूल्य ठेवतो आणि त्या माध्यमातून निधी उभा करतो. तो निधी आम्ही मुलांच्या प्रयोगासाठी लागणार्‍या वस्तू आणण्यासाठी वापरतो आणि उरलेला निधी नगरपालिकेच्या शाळांमध्ये वापरतो.
आता मी मोठ्या वर्गातील मुलांना शिकवते. पण त्यांच्या संकल्पनाच स्पष्ट नसतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. त्यांना शिकवायला मला खूप अडचण येते. त्यामुळे आपण जर लहानपणापासून मुलांना प्रयोगातून शिक्षण दिले तर त्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात. त्यामुळे मुले मोठी होऊन त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जर ती लहान असतानाच जर आपण लक्ष दिले तर तीच मुले पुढे विज्ञान शाखेतल्या विविध परीक्षा सहज पार करू शकतील, असे मला वाटते.
या संपूर्ण कामामध्ये मी प्रचंड गुंतलेली असते. पण माझी आवड आणि माझे काम हे एकच असल्यामुळे मला वेगळा वेळ काढावा लागत नाही. करण रोज नवीन लोक भेटतात, वेगवेगळे प्रयोग आम्ही करतो. त्यामुळे मराठी विज्ञान परिषदेचे काम हाच माझा विरंगुळा आहे.
आमचे मराठी विज्ञान परिषदेमध्ये जे काम चालते त्यात आमच्याकडे तिसरी, चौथीच्या मुलांपासून ते दहावीच्या मुलांपर्यंत वेगवेगळे वर्ग चालतात. त्यात मुले स्वतःच्या हाताने प्रयोग करतात. त्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता वाढते, निरीक्षण शक्ती वाढते. त्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड हे आपल्यासाठी किती चांगले आणि किती घातक आहे हे समजावून सांगून मुलांकडूनच आम्ही उत्तरे काढून घेतो. यामध्ये पालकांचे जसे मुलांनी ऐकले पाहिजे तसेच मुलांमधले काही सकारात्मक बदल पालकांनीदेखील आत्मसात करायला पाहिजेत.

LEAVE A REPLY

*