देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : प्रयत्न महत्वाचा – संगीता फुके

0
संगीता फुके
*  २३ वर्षांपासून एसटी महामंडळात कार्यरत
*  विविध माध्यमातून समाजसेवेचे व्रत कायम सुरू
*  ‘आभास’ या पहिल्याच कवितासंग्रहाला पारितोषिक
मी संगीता फुके. देवळा तालुक्यातला माझा जन्म. घरातल्या वातावरणाचा विचार केला तर सगळे सुशिक्षित आहे. वडिलांची बदलीची नोकरी होती. त्यामुळे दर तीन वर्षांनी बदल ठरलेला असायचा. माझ्या वडिलांना सात ते आठ भाषा येत होत्या. त्यांच्याकडूनच मला भाषेविषयीची गोडी निर्माण झाली. दुसरीकडे मला समाजसेवा आणि लिखाणाचीही मुळातच आवड आहे. त्यामुळे आयुष्यात पुढे संधी मिळाल्यानंतर त्यांचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे.
अकरावीत नाशिकच्या एचपीटी कॉलेजमध्ये आले. राज्यशास्त्रातून एमए करत असताना माझे लग्न झाले. पुढे संसार सुरू झाला. त्यानंतर एसटी महामंडळात नोकरी लागली. आता गेल्या तेवीस वर्षांपासून माझी नोकरी सुरू आहे. दुसरीकडे पुढे संसारात मुलांची जबाबदारी वाढत गेली. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. त्यामुळे मग त्यांच्या संगोपनात व्यस्त राहिल्यामुळे मात्र काहीसा खंड पडल्यासारखे झाले. त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी पुन्हा एकदा शिकण्यासाठीचा श्रीगणेशा केला.
मुक्त विद्यापीठातून एमबीए इन एचआर, पत्रकारिता आणि रशियन भाषा यांचे शिक्षण घेतले. सोबतच हळूहळू इतर सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागही घेतला. शहरातल्या ‘दिलासा’ या आधाराश्रमासाठी मी काम करते. तिथल्या ज्येष्ठांसाठी खाण्याचे पदार्थ बनवून घेऊन जाणे, फळांचे वाटप, कीर्तन, संगीतसंध्याचे आयोजन अशा विविध माध्यमातून मी सेवा करते. यासोबतच इंदापूरच्या ‘श्रावणबाळ’ अनाथआश्रमातही सेवा करते. आमचा हॅलो जिंदगी नावाचा व्हॉट्सऍप ग्रुप आहे. त्याच्या माध्यमातून लहान मुलांना कायमच मदत केली जाते.
मला लिखाणाची खूप आवड आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आवर्जून मी लिहिते. पुणे केसरी, मुंबई नवशक्ती, औरंगाबादचे शिवनातीर या दैनिकांसाठी लेखन केले आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारच्या महान्यूज या वेबपोर्टलवर सामाजिक विषयावर लेखन करत आले आहे. २०१८ मध्ये ‘आभास’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. तर लवकरच ‘पूर्वार्ध’ ही माझी आत्मकथा आणि ‘अनन्या’ हा नामवंत महिलांच्या मुलाखतीवर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
‘आभास’ कविता संग्रहाला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा पुरस्कारही मिळाला आहे. मला यु. म. पठाण यांच्या हस्ते साहित्य गौरव पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, राज्यस्तरीय नारी पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. कलाकुंज २०१५ या दिवाळी अंकासाठी मी सहसंपादनाचे काम केले असून मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार या मासिकाला मिळाला आहे. याशिवाय विविध मासिकांसाठीही लेखन केले आहे.
काही संघटनांची महत्त्वाची पदे मी भूषवित आहे. यात अक्षर मानवचे राज्यकार्यकारिणी सदस्य, कला विभाग प्रमुख, इंटक राज्य कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय नाट्य परिषद सभासद सदस्य आदीचा यात समावेश आहे. याशिवाय काही बुद्धिमत्तेवर आधारित सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेत आले असून कायमच यश मिळाले आहे. यात मिसेस अ‍‍ॅक्टिव्ह २०१७ चा किताब, समाजसेवारत्न, नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आदी स्पर्धांचा यात समावेश आहे.
मला मैत्री करायला खूप आवडते. लोकांशी संवाद साधत सतत काही नवे शोधण्याचा, नवी माणसे जोडण्याचा माझा प्रयत्न असतो. याशिवाय मला वाचन, लेखन, नाटक, संगीत, गायन, फोटोग्राफी, पाककला, अभिनय याचीही आवड आहे. ही आवड मी कायम जोपासत आली आहे. यासाठी वेगवेगळ्या तज्ञांकडून मार्गदर्शन आणि शिकत आले आहे. यासाठी मी अनेक कार्यशाळा, शिबिरे यांनाही हजेरी लावत शिकत आले आहे. याशिवाय मला योगा आणि गिर्यारोहणाचीही आवड आहे. हिमालयातील मनाली, पर्वती अशा अनेक ठिकाणी मी ट्रेकिंग केले आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, प्रमुख पाहुणे, परीक्षक अशा पदांची जबाबदारी पार पाडली आहे.
या सगळ्या वाटचालीत मला घराच्या लोकांची मोलाची मदत मिळाली आहे. त्यांनी कायमच पाठिंबा देत प्रोत्साहन दिले. त्यामुळेच या वेगवेगळ्या भूमिका मला यशस्वीरीत्या बजावता आल्या. मला मैत्रिणींना सांगायचे आहे की, आयुष्यात कधीही उशीर झालेला नसतो. सुरुवात करणे आवश्यक असून पुढे काम करत राहिले पाहिजे आणि सकारात्मक विचारसरणी ठेवली पाहिजे, असे मला वाटते.

LEAVE A REPLY

*