देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ : मुलींच्या सबलीकरणाचा ध्यास – समीना मेमन

0
समीना मेमन
 * मुलींचा आत्मविश्‍वास वाढवला तर मुली निर्भिडपणे बाहेर पडून काम करू      शकतील हा विश्‍वास होता
 * मौला बाबा ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली
 * इंग्लिश स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, पाककला, फॅशन डिझायनिंग आणि सरकारच्या नवीन कोर्सेसद्वारे स्वावलंबनाचे धडे
 * डिजिटल लायब्ररी उभारली
 * जेवण बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते.
मस्कार, मी समीना मेमन. माझे माहेर अमरावतीचे. माझे शिक्षण बी.एस्सी. बायोलॉजी झाले आहे. मुस्लीम कम्युनिटीमध्ये असल्याने लहानपणापासूनच महिलांना काय अडचणी येतात ते पाहिले आहे. त्यांना हवे तसे स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे आधीपासूनच मला या स्त्रियांसाठी काही करावे, असे वाटत होते. समाजकार्याची आधीपासूनच आवड होती. माझी आत्या कॉंग्रेसमध्ये आहे. नंतर लग्न करून नाशिकमध्ये आले.
माझे सासरे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यांच्याबरोबर माझे पती गेल्या २५ ते ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु १० वर्षांपूर्वी महिला आरक्षणामुळे मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि मी त्यात यशस्वीही झाले. प्रचाराच्या वेळी प्रभागात फिरताना माझ्या पतीने मला नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून दिली. जेणेकरून मला कामाची दिशा मिळाली.
माझ्या पतीचाही मला कायम पाठिंबा होता. त्यांनी कधीही मला कोणत्याही गोष्टीसाठी थांबवले नाही. कायम चांगले काम करण्याची प्रेरणा ते मला देत. जरी मला नगरसेविका पद मिळाले असले तरीही मी कायम समाजसेविका म्हणूनच काम करते.
मला लोकांसाठी काम करायला आवडते. लोक माझ्यावर जो विश्‍वास टाकतात की आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तर तुम्ही आमच्यासाठी काय करत आहात? हा विश्‍वास आम्हाला गमवायचा नव्हता. जुने नाशिक हा भाग तसा प्रगत नाही. त्यातील महिला, तरुणी बाहेर पडून शिक्षण घेऊ शकत नाहीत. काम करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे.
जर शिक्षणच घेतले नाही तर प्रगती कशी होणार? हे मी फक्त मुस्लीम कम्युनिटीबद्दल नाही तर संपूर्ण जुन्या नाशिकबद्दल बोलत आहे. मी या विचारात होते की शाळा किंवा महाविद्यालय सुरू करावे. परंतु त्याने फक्त येणार्‍या पिढीसाठी काम होईल आणि जुनी पिढी मात्र बदलणार नाही.
घरातील मोठ्या लोकांचे विचार जेव्हा बदलतील तेव्हाच येणारी पिढी बदलू शकेल. जर घरातल्यांनीच मुलींचा आत्मविश्‍वास वाढवला तर मुली निर्भिडपणे बाहेर पडून काम करू शकतील, हा विश्‍वास मला त्या महिलांना द्यायचा होता.
म्हणूनच मी मौला बाबा ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली.
ज्यामध्ये मी पहिल्यांदा ब्यूटी पार्लरच्या कोर्सची सुरुवात केली. खरेतर याला कसा प्रतिसाद मिळेल, याची काहीच कल्पना नव्हती. पण पहिल्याच महिन्यात १०० हून अधिक मुलींनी प्रवेश घेतला. मग यानंतर कधीही मागे वळून न बघता मी ब्यूटी पार्लरबरोबरच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे विविध कोर्सेस सुरू केले.
ज्यात इंग्लिश स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, पाककला, फॅशन डिझायनिंग आणि सरकारच्या नवीन कोर्सेसचादेखील समावेश केला. जास्तीत जास्त अनुभवी आणि चांगले शिक्षक उपलब्ध करून दिले आणि आजपर्यंत ८ हजारहून जास्त मुली आणि महिलांना प्रशिक्षित केले. मी अभिमानाने सांगेन की, यातील बहुतांशी महिला, मुली आज स्वतःचा काही ना काही व्यवसाय त्याचबरोबर नोकरी करून आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
नगरसेविका म्हणून प्रभागात जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ज्याप्रमाणे या मुलींना आणि महिलांना माझा पाठिंबा असतो त्याचप्रमाणे माझ्याही इतर कामांमध्ये त्यांचा मला नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे. हे काम करताना अनेक बरे वाईट अनुभवही आले.
परंतु कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांची साथ असल्यामुळे मी त्यावर मात करू शकले. माझ्या कामातील सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे मुलींना आणि महिलांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करणे आणि त्यात मी यशस्वी झाले. माझाही काम करण्याचा आत्मविश्‍वास अजून वाढला.
मुलींना वाचनाची गोडी लागावी यासाठी ट्रेनिंग सेंटरच्याच बाजूला जयप्रकाश छाजेड यांच्या आमदार निधीतून मुलींसाठी डिजिटल लायब्ररी मी उभारली. या धकाधकीच्या कामांमधून स्वतःसाठी वेळ मिळणे तसे अवघडच. त्यामुळे माझे छंद जोपासायला मला वेळ मिळत नाही. तरीही मला जेवण बनवायला आणि खाऊ घालायला खूप आवडते. त्याचप्रमाणे मला गाण्याचीसुद्धा आवड आहे.
पण तरीही मी या गोष्टी कारण्याचा प्रयत्न करते. म्हणून सर्व महिलांना आणि मुलींना माझे एकच सांगणे आहे की, स्वतःवर विश्‍वास ठेवा. आत्मविश्‍वास हेच सामर्थ्य आहे. याबरोबरच प्रत्येकीला स्वतःचे संरक्षण हे करता आले पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या अधिकारांची जाणीव आपल्याला हवी आणि त्याचा योग्यवेळी वापरही करता यायला हवा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*