देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : जनजागृतीसाठी प्रयत्न – रितू शर्मा

0
रितू शर्मा
*  १५ वर्षांपासून आर्किटेक्ट क्षेत्रात,१३ वर्षांपासून महाविद्यालयात अध्यापिका
*  मासिकामध्ये ११वर्षांपासून लिखाण
*  ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ५ वर्षांपासून इनटेकच्या माध्यमातून जनजागृती सुरू
*  त्र्यंबकेश्‍वर देवस्थानवर तीन वर्षे संशोधन
निसर्ग आणि इतिहास यांचे नाते समजून घेत आर्किटेक्ट क्षेत्रात कामाला सुरुवात केली. स्वत:चा स्वतंत्र असा व्यवसाय उभा केला. त्याबरोबर महाविद्यालयात शिक्षणाचे धडेही देते. हे काम करत असताना राष्ट्रीय पातळीवरील मासिकांसाठी लेखन सुरू आहे. लोकांना आपला ऐतिहासिक वारसा समजावा, त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी (INTECH) च्या माध्यमातून काम करत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून मासिकामध्ये लिखाण करत आहे. गत ५ वर्षांपासून इनटेकचेही काम सुरू आहे.
मी मूळची औरंगाबादची. घरात माझ्या शिक्षणाला घेऊन आई-बाबा प्रचंड आग्रही होते. त्यामुळे माझे दोन्ही भाऊ इंजिनिअर झाले. मला मात्र आर्किटेक्टचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी थेट दिल्लीतल्या नामांकित कॉलेजमध्ये पाठवले. औरंगाबादमधला असलेला ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग मला खूप आवडतो. स्थापत्यशास्त्रात निसर्गासोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोघांचा सुरेख मिलाफ असल्यामुळे माझा ओढा या क्षेत्राकडे राहिला. दिल्लीत मी लॅण्डस्केप या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. स्थापत्यशास्त्र शिकताना सामाजिक जबाबदारीचे भान कसे जपता येईल, याचे धडे गिरवले.
पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००७ नाशिकमध्ये येऊन आर्किटेक्ट संजय पाटील यांच्याकडे कामाला सुरुवात केली. सोबतच मविप्रच्या महाविद्यालयात शिकवत होते. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली असताना एकदा युनायटेड बिल्डर्सचे मालक ऑफिसमध्ये येऊन माझ्या इमारतीसाठी काम करशील का, असे विचारले आणि तिथून माझ्या स्वतंत्र कामाला सुरुवात झाली. त्यावेळी आठव्या मजल्यावर स्विमिंगपुलाचे काम करणे मोठे आव्हानाच. ते पण केले.
पुढे पार्टी लॉन्स, बंगलो, रेस्टॉरंट, ग्रुप हौसिंग, भगर मिल, पुनर्बांधणी अशी विविध कामे केली. पाटील सरांकडे काम करत असताना इंडियन आर्किटेक्ट अँँड बिल्डर्स या मासिकासाठी लिखाण केले होते. तेव्हा पाटील सरांसाठी काम केले होते. नंतर हेच काम विस्तारत गेले. पुढे याच मासिकाच्या संपादकीय टीममध्ये चार वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले.
दरम्यानच्या काळात पती डॉ. नीलेश शर्मा उच्च शिक्षणासाठी पाच वर्षे पुण्यात होते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबरोबर पुण्याला गेले होते. तिथेही मी माझे काम सुरूच ठेवले. भानूबेन नानावटी कॉलेजमध्ये मास्टर्स डिग्रीच्या मुलांना शिकवण्याची संधी मला मिळाली. तिथेच मी त्या संस्थेची पाच पुस्तके प्रकाशित केली. त्यामुळे एकाच वेळी माझे लिखाण, प्रॅक्टिस, शिकवण अशा तीनही गोष्टी होत्या. या सगळ्या कामांमुळे माझे व्यक्तिमत्त्व अधिक चांगल्या प्रकारे घडले. माझी युनिक पर्सनालिटी तयार झाली.
ही सगळी कामे सुरू असताना इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँँड कल्चरल हेरिटेज इनटेक या ऐतिहासिक वारसाचे संवर्धन करणार्‍या राष्ट्रीय पातळीवरच्या सामाजिक संस्थेशी ओळख झाली. या संस्थेची मेंबरशीप घेऊन नाशिकमध्ये शाखा सुरू केली. यातून आपल्या ऐतिहासिक वारसाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू केले.
नाशिकमध्ये तर हे काम करण्यासाठी खूप वाव आहे. आज पन्नास ते पंचावन्न आजीव सदस्य यात एकत्र आले असून प्रदर्शन, हेरिटेज वॉक, व्याख्याने, शाळांमध्ये क्लब तयार करून, शिक्षकांना माहिती देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. त्यासोबत दस्तावेज आणि नोंदणी लिखाणाचे काम सतत सुरू असते. या सगळ्याच्या जोडीला त्र्यंबकेश्‍वरवर तीन वर्षे संशोधन करून त्यावर रिसर्च पेपरही सादर केला आहे. ही सगळी कामे मला मनापासून आवडतात. जे मिळाले ते काम मी करत गेले. त्यामुळे अडचणी, अडथळे आल्याच मला कधीच जाणवले नाही.
या कामांमधून वेळ मिळाला की, मला फिरायला, कथा सांगायला आणि ग्राफिक्स बनवायला खूप आवडतात. मला बाली आणि श्रीलंका हे दोन देश खूप आवडले आहेत. त्या ठिकाणी लोकांनी ऐतिहासिक वारसा खूप सुंदर पद्धतीने जतन करत आहेत.
मला मैत्रीणींना सांगावेसे वाटते की, महत्त्वाकांक्षेकडे कधीही स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करून पाहता येत नाही. त्यामुळे आयुष्यातल्या कुठल्याच गोष्टीकडे समस्या, अडथळा म्हणून पाहू नका. कुठल्याही नैसर्गिक मर्यादांना अडथळा मानू नका. त्याकडे सकारात्मक आणि संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

*