देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : सोन्याहून पिवळे माझे गोधन – प्रियदर्शीनी पाटील

0
प्रियदर्शीनी पाटील
*  ‘सारजागीर गाई संवर्धन केंद्रा’ची सुरुवात
*  केंद्राला भारत सरकारचा २०१८ सालचा ‘गोपालरत्न’ पुरस्कार
*  केंद्रात गाई संवर्धनासोबतच दुधापासून विविध पदार्थांची निर्मिती
*  विषमुक्त शेतीसाठी पुढाकार

पुण्यातल्या डी.वाय. पाटील महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले असले तरी आज गीर गाईचे संवर्धन करत आहे. या प्रकल्पातून स्वत:सोबतच अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. सारजा गीर गाई संवर्धन केंद्राला भारत सरकारचा २०१८ सालचा ‘गोपालरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. गाईचे दूध याच्या पुढचा विचार करून वैदिक तूप, गोमूत्र अर्क, गाईंचे संवर्धन, औषधनिर्मिती, पावडरनिर्मिती सुरू केली आहे. लोकांना शुद्ध आणि पौष्टिक पदार्थ देता यावे आणि विषमुक्त शेती असावी याच उद्देशाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

माझे बालपण सटाणा गावात गेले. घरात शेती असल्यामुळे नकळतपणे शेतीचे संस्कार होत गेले. शेतीची माहिती होत गेली. माझे शिक्षण कॉम्प्युटर सायन्समध्ये झाले आहे. पुण्यातल्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातून मी एमएस्सी केले आहे. त्यानंतर २०११ मध्ये लग्न झाले. मात्र पती पुण्यातच राहत असल्यामुळे तिथेच राहणे झाले. आधीपासूनच आमच्या दोघांच्या घरी शेती असल्यामुळे काहीतरी व्यवसाय करायला हवा असा विचार आमच्या दोघांच्या मनात सतत येत होता.
शेवटी गीर गाईंच्या संवर्धानासाठी काम करायचे ठरले आणि २०१६ मध्ये पुण्यातील सगळे आवरून पुन्हा सटाण्यात दाखल झालो. गावापासून जवळच ५ किलोमीटरवर असलेल्या तरसाळी येथे आजीच्या नावावरून सारजा गीर गाई संवर्धन केंद्र सुरू केले. कामाला सुरुवात केली त्यावेळी मनात प्रचंड भीती होती. सगळे नीट होईल ना? जमेल का? असे खूप प्रश्‍न होते. मग मात्र हळूहळू जम बसला.
सुरुवातीला आमच्याकडे फक्त १० गाई होत्या. मग टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता दीडशे गाई झाल्या आहेत. या संपूर्ण केंद्राच्या उभारणीसाठी आम्ही दोघांनी आधी पूर्ण अभ्यास केला. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी, तज्ञांचा सल्ला घेतला. माझ्या शिक्षणाचा यात उपयोग करून घेतला. जिथे जिथे संगणक, मशीनचा वापर शक्य आहे तिथे सगळीकडे मशीनचा वापर होतो. गाईचे खाद्य पूर्णपणे आमच्या शेतात उगवले जाते. यात त्यांना खायला मका, भरडा, जिंजवा सीओथ्री आदी दिले जाते. याशिवाय वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. वजनाची दररोज तपासणी असते.
या प्रकल्पातून आम्ही विविध प्रकारची कामे करतो. यामध्ये सकाळ, संध्याकाळ दुधाची प्रत्यक्ष विक्री करते. सोबतच दुधापासून बनणारे पदार्थ बनवतो. यात वैदिक पद्धतीने बनवलेले तूप, दही, लोणी आदी आहेत. पंचगव्यापासून बनवलेले नऊ प्रकारचे गोमूत्र अर्क आहेत.
विषमुक्त शेतीसाठी गोमूत्र आणि गाईच्या शेणाचा वापर करतो. या सगळ्या गोष्टींसोबतच गीर गाईचे संवर्धन आणि प्रजनन यासाठी विशेष लक्ष देतो. आमच्याकडे जीम करण्यासाठी प्रोटीन पावडर, खरवस पावडर, त्वचेसाठी शतधृत, रिकोटा चीज, नेत्र औषधी, शेणापासून धूप आदींचेही उत्पादन घेतले जाते. ही सगळी उत्पादने शुद्ध आणि भेसळमुक्त स्वरुपाची आहेत.
आता आमचा हा प्रकल्प पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. आम्ही घेत असलेल्या उत्पादनांची विक्री आम्ही प्रत्यक्ष पद्धतीने अर्थात फेस टू फेस विकतो. अनेक जण येऊन या औषधांचा खूप फायदा झाला असल्याचे सांगतात. सध्या या प्रकल्पात मदतीसाठी सहा कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. तर काही लोक दूध वितरणासाठी काम करतात.
याशिवाय घरातील प्रत्येक सदस्याचा मोलाचा हातभार लागतो. या केंद्राच्या उभारणीत आम्हाला घरच्या लोकांची मोठी साथ मिळाली. सुरुवातीला दोन वर्षे काहीच उत्पन्न आले नाही. तेव्हा कुटुंबियांनी सांभाळून घेतले. आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे माझी आर्यवीर आणि राजवीर ही दोन्ही मुले सांभाळली जातात.
मला फक्त मैत्रिणींना नाही तर सगळ्यांना सांगावेसे वाटते की, गावात असलेली साधी जीवनपद्धती आत्मसात करा. आताच्या शहरी भागातल्या धावपळीत आपण जगणे विसरून गेलो आहोत. सूर्य कसा उगवतो, पाऊस कसा पडतो अशा अगणित आनंदाचे क्षण विसरून गेलो आहोत. मॉल्स, हॉटेलमध्ये आनंद शोधत आहोत. या सगळ्यापेक्षा जास्त आनंद हा निसर्गात आहे. मी शहर आणि गाव अशा दोन्ही ठिकाणी राहिली आहे. मात्र मला आनंद गावातच मिळतो.

LEAVE A REPLY

*