देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार २०१९ : ‘सिस्टीम’ बदलण्यासाठी राजकारणात – प्रियांका घाटे

0
प्रियांका घाटे
 * २१ वर्षी वडिलांचा राजकीय वारसा घेऊन सक्रिय राजकारणात प्रवेश
 * सर्वात कमी वयाच्या (२३व्या वर्षी) प्रियंका घाटे,
 * झोपडपट्टीतील मुलांसाठी सरकारी शिक्षणाचे, विविध कोर्सचे कार्य.
 * महिला सक्षमीकरणासाठी ज्यूदो क्लासेससारखे उपक्रम.
 * युवा पिढीतील तरुणांना संघटित करून विधायक कामांसाठी सह्याद्री युवा फाऊंडेशनची स्थापना..
राजकीय वारसा घरातूनच मिळाला. वडील गेल्या २५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. २१ वर्षांची असताना वडिलांचा आदर्श घेऊन राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. १९९२ यावर्षी झालेल्या निवडणुकीत माझे वडील उमेदवार म्हणून उभे राहिले. पण त्यावेळी ते निवडणूक जिंकले नाही. राजकारणातून समाजकारण आणि पर्यायाने जनसेवा हे त्यांचे ध्येय आहे. हेच त्यांनी माझ्यामध्ये बिंबवले.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये मी उमेदवार म्हणून उभे राहिले. आरक्षणामुळे माझ्या घरच्यांनी मी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला आणि निवडणूक लढवत यशस्वी झाले. याच ठिकाणी राजकीय जीवनाचा प्रवास सुरू झाला. समाजसेवेची आवड पूर्वीपासूनच होती. नगरसेविकापदाच्या भूमिकेतून मी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले याचा मला खूप अभिमान वाटतो.
खरेतर महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने अगदी कमी वय असूनही निवडून आले. त्यामुळे पहिल्यांदाच काम करताना मोठे दडपण यायचे. परंतु माझे वडील आणि भाऊ यांचे कायम सहकार्य, मार्गदर्शन लाभत असल्याने माझ्यातला आत्मविश्‍वास दुणावला. यातून शिकून मी आता स्वतंत्रपणे उत्तम प्रकारे काम करत आहे. माझ्या प्रभागामध्ये १० जास्त झोपडपट्ट्या आहेत. त्या भागातील प्रश्‍न खूप गंभीर आणि विविध पातळीवर सोडवावे लागणार असल्याचे मला जाणवले.
आर्थिक विवंचनेमुळे या कष्टकरी लोकांच्या पाल्यांचे शिक्षण नाही. त्यामुळे नोकरी नाही. या दृष्टचक्रात अडकलेली कुटुंबे आहेत. मुला-मुलींना शिक्षण दिले जात नाही. यासारख्या गोष्टींवर काम करावे लागणार होते. म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. घराजवळ एका हॉलमध्ये झोपडपट्टीतल्या मुलींना सरकारी कोर्सेसचे शिक्षण देण्याचे काम सुरू केलेे.
मुलांना रोजगारक्षम बनवण्याची कामे करत असताना माझे स्वत:चे शिक्षणही सुरू ठेवले आहे. एसएमआरके महाविद्यालयात एम.कॉम पूर्ण करत आहे. कॉलेजमध्ये किंवा इतरत्र जे वातावरण तरुणाईमध्ये दिसते ते पाहता युवावर्गामध्ये प्रचंड शक्ती आहे. याचा अनेक वेळा प्रत्यय येतो. तिचा सदुपयोग करून घ्यायला हवा ही भावना बळावू लागली आहे.
आजची युवा पिढी खूप हुशार असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. त्यांना करिअरसह समाज, देश यामध्ये बदल घडवून आणायचे आहेत. त्यामुळे युवावर्गाला एकत्र करून काम करण्याची माझी इच्छा आहे.त्यादृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महिलांच्या सबलीकरणासाठी मला काम करायचे आहे. माझ्या प्रभागामध्ये त्यांच्यासाठी मी ज्यूदोचे प्रशिक्षण सुरू केले आहे. कारण आज महिला घराबाहेर पडून आत्मविश्‍वासाने काम करत आहेत आणि याचे प्रमाण वाढतच राहावे अशी इच्छा आहे. त्याचवेळी त्यांना अन्याय-अत्याचाराविरोधात खंबीरपणे उभे राहता यावे यासाठी स्वयंपूर्ण करण्याचा उद्देश आहे.
युवा पिढीला संघटित करून विधायक कामे व्हावी या उद्देशाने सह्याद्री युवा फाऊंडेशनची स्थापना केली. युवा पिढीचे विविध प्रश्‍न संस्थेमार्फत सोडवले जातात. वडील बहुजन समाजासाठी मागील २५ वर्षांपासून कार्य करीत आहेत. त्यांचा हाच वारसा पुढे नेत आहे. युवकांना प्रबोधन करून प्रशिक्षित करण्यासोबतच त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच माझा प्रयत्न राहणार आहे.
कोणतेही काम सुरू करायच्या आधी वडील आणि आमचे बंधू यांच्याशी सल्लामसत करते. हे अपरिहार्य आहे. अनेक गोष्टींचा अनुभव घेत शिकत आहे. तेव्हा कामाची सुरुवात करण्याआधी त्यांच्याशी सल्लामसलत केल्याने आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही याचा अंदाज घेता येतो. वडील किशोर घाटे आणि भाऊ रोशन हे खंबीरपणे माझ्या मागे उभे असल्याने सर्व आव्हाने, समस्या, अडथळे यावर आत्मविश्‍वासाने मात करण्याचे बळ मिळत आहे.
प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा माझा पिंड आहे. म्हणून शिक्षण घेत एमपीएससीची तयारी करत आहे. अभ्यासासाठी विशिष्ट वेळ राखून ठेवलेला असून शिक्षणामुळेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो यावर माझा ठाम विश्यास असल्याने माझ्यासह प्रभागातील नागरिकांना सुशिक्षित व सक्षम करण्याचा प्रयत्न राहिला आहे.
युवा पिढीनेदेखील राजकारणाकडे करिअर म्हणून पाहावे हेच युवावर्गाला माझे सांगणे आहे. आपण राजकारणाला नावे ठेवतो. मात्र प्रत्यक्षात सिस्टिम बदलायची असेल तर सिस्टिममध्ये येऊन परिवर्तन करणे गरजेचे आहे. तरुणाईमध्ये जग बदलण्याची प्रचंड ऊर्जा, ताकद आहे. गरज फक्त या ऊर्जेला विधायक मार्गदर्शन देण्याची आहे. याच ऊर्जेमुळे भारत जगात महासत्ता होण्याचे दिवस दूर नाहीत.

LEAVE A REPLY

*