Type to search

Featured Karmayogini maharashtra नाशिक

देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार-२०१९ : मी विद्यार्थी घडवते – मनीषा जगताप

Share
*  शक्ती विकास अ‍‍ॅकेडमीच्या माध्यमातून योगदान
*  गरजू आणि गरीब मुलांची विविध स्पर्धा परीक्षांची तयारी
*  आतापर्यंत ३८ मुले-मुली पोलीस आणि सैन्य दलात
मी मनीषा जगताप. मूळची मालेगावची. शक्ती विकास अ‍‍ॅकेडमी या संस्थेत सचिव म्हणून काम करते. लग्नानंतर काहीतरी करावे, बाहेर पडावे म्हणून भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेविका म्हणून कामाला लागले. कॉलेजला असतानाच काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ इच्छा होती. नेहरू युवा केंद्रात काम करायला लागल्यावर ही इच्छा अजूनच वाढली आणि कामाची आवडदेखील निर्माण झाली.
खरेतर बाहेर पडण्याची आवड मला आधीपासूनच होती. पण माहेरी या गोष्टींना कधीच वाव मिळाला नाही. मुली म्हणजे चूल आणि मूल हेच लहानपणापासून शिकवले गेले होते. परंतु लग्नानंतर पतीची साथ मिळाली आणि पुन्हा काम करण्याची उमेद निर्माण झाली. नेहरू युवा केंद्रात काम करत असताना पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात काम करण्याचा मोठा अनुभव मिळाला.
खेडोपाडी जाऊन लोकहिताच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यांना त्याबद्दल जागरूक करणे, ही कामे मी मनापासून करत होते. या कामाचा अनुभव घेऊनच मी आणि माझ्या मिस्टरांनी शक्ती विकास अ‍‍ॅकेडमी सुरू केली. गरजू आणि गरीब मुलांसाठी आम्ही या संस्थेतून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो. तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. मागील दिवाळी आणि दसर्‍याला आदिवासी पाड्यांवर कपड्यांचे वाटप केले. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी कपडे आमच्याकडे जमा करावे, असे आवाहनदेखील केले.
आमच्या या उपक्रमाला भरभरून साथ मिळाली आणि आम्ही दिवाळीत दहा पोते कपडे गरीब आणि गरजूंमध्ये वाटले. तसेच १५ ऑक्टोबरला नॅशनल ब्लाइंड असोसिएशनचा ‘अंध काठीदिन’ असतो. या दिवशी त्यांची शहरात मोठी रॅली निघते. आम्ही आणि आमचे कार्यकर्ते या मुलांना दरवर्षी मदत करतो. त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. दरवर्षी आम्ही स्वेच्छेने या अंध मुलांना मदत करतो.
आमच्या या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनीदेखील घेतली आणि आम्हाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शासनाच्या अनेक अशा योजना असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्नदेखील आम्ही करतो. पेठ या आदिवासी भागात काम करताना जनधन योजना आदिवासींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पेठच्या तहसीलदारांना आणि बँकेचे व्यवस्थापक यांना बरोबर घेतले आणि पेठमधील अनेक आदिवासी लोकांचे आधार कार्ड बनवून, त्यांचे खाते बँकेत उघडून दिले.
आदिवासी म्हणा किवा इतर सामान्य लोक म्हणा, कोणासाठीही काम करताना पहिले त्यांचा विश्‍वास संपादन करावा लागतो, तरच आपण आपले काम नीट करू शकतो. तसेच आम्ही आदिवासी असो किंवा मग आमच्या केंद्रात येणारी मुले असो त्यांच्याकडून ध्यानधारणा करून घेतो. जेणेकरून लक्ष केंद्रित करून काम करण्याची सवय त्यांना लागावी.
शक्ती विकास केंद्रातून शिक्षण घेऊन पेठ तालुक्यातील तीन मुले आम्ही सीआयएसएफमध्ये कामाला लावली आहेत. तसेच नाशिकच्या स्लम भागातील दोन लग्न झालेल्या मुलींना प्रशिक्षण देऊन त्या आता मुंबई पोलीस दलात सेवा बजावत आहेत. आमच्या संस्थेतून आत्तापर्यंत ३८ मुले-मुली हे पोलीस दलात आणि भारतीय सैन्यात भरती झाले आहेत.
मुला-मुलींना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आमचे लक्ष असते. तसेच हे सगळे करताना आर्थिक अडचणीसुद्धा आम्हाला बर्‍याच येतात, कारण आमची संस्था ही नफा कमावणारी संस्था नाही. तेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेताना अगदी मोजकेच शुल्क आम्ही मुलांकडून घेतो. आम्ही आरोग्याचे महत्त्वसुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संस्थेत दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत सूर्यनमस्कार प्राणायाम, ध्यानधारणा आमच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतो.
मी आजच्या स्त्रियांना हेच सांगेन की, कोणतीही चांगली गोष्ट करताना घाबरू नका. हळूहळू एखाद्या चांगल्या कार्याला सुरुवात केली तर ते कार्य नक्कीच समाजोपयोगी होऊ शकते. दुसर्‍यांना देण्याची वृत्ती सतत ठेवली पाहिजे, जर तुम्ही आर्थिक मदत करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या ज्ञानाचे दान नक्कीच समाजाला देऊ शकतात.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!