देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार -२०१९ : फक्त हिमतीने लढा – ज्योत्स्ना दौंड

0
ज्योत्स्ना दौंड
*  तीन राज्यस्तरीय पुरस्कार
*  आदर्श महिला द्राक्ष उत्पादक पुरस्कार, कृषिथॉनमध्ये बेस्ट वूमन फार्मर   अ‍‍ॅवॉर्ड,अ‍‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचा पुरस्कार
*  प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत शेती व्यवसायात ओळख
*  शिक्षण : एम. एस. सी.
मी ज्योत्स्ना विजय दौंड. निफाड तालुक्यातील लोणवाडी या लहानशा गावात राहते. शेती व्यवसाय करते. घरात आई, बाबा, भाऊ असा छोटासा परिवार आहे. आई, वडिलांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. भावाचे बी.एस. सी. पूर्ण झाले.
मी चार- पाच वर्षांची असताना वडिलांचा अपघात झाला आणि त्यांच्या दोन्ही पायांना इजा झाली. तेव्हा सात महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. शेतीच्या सर्व कामांची जबाबदारी माझ्या आईवर आली. तीन चार वर्षांनी बरे झाल्यावर पुन्हा त्यांनी कामास सुरुवात केली. मात्र २०१० मध्ये परत पाय घसरल्याने त्यांना काम करणे शक्य झाले नाही. त्यावेळी माझे शिक्षण चालू होते.
ओझरच्या महाविद्यालयात मी शिकत होते. रोज ओझरला येऊन जाऊन शिक्षण चालू होतं. सकाळी शेतातील काम करून कॉलेजला जायचे आणि घरी आल्यावर पुन्हा उरलेली कामे करून रात्री अभ्यास करायचा अशी दिनचर्या होती. बी. एस. सी., एम. एस. सी. पूर्ण होईपर्यंत असेच चालू होते. दोन्ही वर्षी मी उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. एम. एस. सी. झाल्यांनतर महाविद्यालयामधूनच माझी नाशिकच्या आय. टी. कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी निवड झाली.
गवत काढणे, बाग बांधणे, बागेची इतर काम करणे, ट्रॅक्टरने स्प्रे मारणे, मशागत करणे, आईला इतर कामांमध्ये मदत करणे अशी सगळी कामे नोकरी करत असतानाच चालू होती.
बाबा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा वातावरण आणि परिस्थिती कशी आहे, हे मी आई-बाबांना फोन करून सांगायचे. फोनवरूनच ते मला कशाची फवारणी करायला हवी, हे सांगायचे आणि त्याप्रमाणे मी कामे करत. नोकरी आणि शेती दोन्ही करत असताना ओढाताण व्हायची. शिवाय मी नोकरीला गेल्यावर सगळी कामे माझ्या लहान भावाला करावी लागत. त्यामुळे त्याच्याही शिक्षणात अडथळा येत. या सर्व परिस्थितीचा विचार करून मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
खरंतर हा निर्णय घेणे अवघड होते. पण तरीही मी नोकरी सोडली आणि पूर्णपणे शेतीकडे लक्ष द्यायचे, हे ठाम केले. घरात आर्थिक हातभार लागावा म्हणून या काळात मी घरी लहान मुलांचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली.
आम्ही शेतात मजूर लावून कामे करून घेत नाही. ज्यामुळे सगळी कामे व्यवस्थित होतात आणि आर्थिक बचतही होते.
द्राक्ष येण्यासाठी जेव्हा झाडे तयार झाली, तेव्हा मी परत नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पिंपळगाव बसवंतमध्ये आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरीस लागले. आजपर्यंत मी शिक्षिका म्हणून नोकरी करते आणि शेती अशा दोन्ही गोष्टी सांभाळते.
आजपर्यंतच्या कामासाठी मला तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. द्राक्ष विज्ञान मंडळातर्फे २०१८ साली आदर्श महिला द्राक्ष उत्पादक पुरस्कार, कृषीथॉनमध्ये बेस्ट वूमन फार्मर अ‍‍ॅवॉर्ड, अ‍‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून गुणगौरव व पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आतापर्यंत परिस्थितीने खूप शिकवलेले आहे. शेतीच्या कामांबद्दल बोलायचे झाले तर हे सगळे कामे पावसावर अवलंबून असते. पाऊस कमी झाला तर टँकरने मणी आणून द्यावे लागत आणि अतिवृष्टी झाली तर गुडघ्यापर्यंत पाण्यात कामे करावे लागत. रात्रन्रात्र कामे करावी लागत.
जेव्हा मी शेतीची कामे करायला लागले, तेव्हा टँकरपण चालवता येत नव्हता. बाबांनी तोंडी सांगितले की, कसा चालवायचा आणि मी चालवायला लागले. आता मी ट्रॅक्टरची दुरुस्तीपण करू शकते. माझ्या प्रत्येक कामामध्ये माझ्या आई- बाबांचा पूर्ण पाठिंबा असतो. त्यांना खूप अभिमान आहे की, मी इतक्या चांगल्या पद्धतीने काम सांभाळते.
मला जेव्हा जेव्हा कामांमधून वेळ मिळतो, तेव्हा मी वाचन करते. बोधकथा, कादंबर्‍या वाचायला मला खूप आवडतात. त्याचप्रमाणे मी इंटरनेटच्या साहाय्याने शेतीविषयक वेगवेगळे व्हिडीओ बघते. जेणेकरून वेगवेगळ्या गोष्टींची माहिती होते आणि त्याचा वापर आपल्या कामात करता येतो.
जर कोणा महिलांना शेती करायची असेल तर त्यांना मी हे सांगेन की, शेती कारणे अवघड आहे. पण जी परिस्थिती समोर येईल, त्याला जर तुम्ही हिमतीने, मेहनतीने आणि जिद्दीने सामोरे गेलात तर अशक्य असे काहीच नाही.

LEAVE A REPLY

*