Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Ground Report / Video : सौर कृषी पंपावर अडीच एकर शेती झाली ‘बागायती’; फुलेनगरचा युवा शेतकरी बनला सधन

Share

सिन्नर | टीम देशदूत

शाश्वत जलसरोत उपलब्ध असणाऱ्या परंतु सिंचनासाठी  पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लाभदायी ठरली असल्याचे चित्र आहे. दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या सिन्नरच्या पूर्वेकडील फुलेनगर येथील नितीन भगवान अत्रे या युवा शेतकऱ्याने  चार महिन्यांपूर्वी मिळालेल्या सौर पंपाच्या जोडणीमुळे अडीच एकर शेती फुलवली असून सोबतीने कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला देखील पाण्याची उपलब्धी झाली आहे.

वावी – नांदूरशिंगोटे रस्त्यालगत अत्रे यांची शेती असून तेथे खोदलेल्या बोअरवेलसाठी त्यांनी महावितरणकडे जोडणी मागितली होती. मात्र परिसरात शेतीला वीजपुरवठा होण्यात येणाऱ्या अडचणींमुळे दूरवर असलेल्या विहिरीचे पाणी वस्तीपर्यंत आणणे अशक्य असल्याने त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंपासाठी नोंदणी केली होती.

 

90 टक्के अनुदान असलेल्या तीन अश्वशक्तीच्या पंपासाठी त्यांना महावितरणकडे 20 हजार रुपये इतकीच रक्कम भरावी लागली. चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या शेतात या योजनेतील पंपाची जोडणी मिळाली आणि घरालगतच्या अडीच एकर असलेल्या शेतात जनावरांसाठी चारा, मका आणि कांदा या पिकांची लागवड देखील करता आली.

दिवसभर सुरु असलेल्या सौर पंपामुळे या पिकांना पाणी देणे सुलभ झाले असून इतर शेतकऱ्यांप्रमाणे रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी भरण्याचा त्यांचा त्रास देखील वाचला आहे. याशिवाय पाच पक्षांच्या पोल्ट्री साठी आणि दहा-बारा गायींसाठी पाण्याची सोया देखील झाली आहे. या योजनेच्या लाभाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले असून अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.


असे आहेत सौर कृषी पंपाचे फायदे 

दिवसा सिंचन करता येते. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्याने वीजबिलांचा किंवा इंधनाचा खर्च नाही. कमी देखभाल आणि विद्युत अपघातांची भीती नाही. बॅटरी चार्जिंगची सोया असल्याने बॅटरीद्वारे शेतातील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध असतो. हा सौर पंप सुमारे 25 वर्षे सेवा देऊ शकतो.

पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच वर्षे तर सौर पॅनलसाठी दहा वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत सौर कृषिपंप किंवा पॅनलची विनामूल्य दुरुस्ती करण्याची किंवा ते नवीन बदलून देण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असणार आहे. सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलिसठाण्यात करून महावितरणच्या कार्यालयात देता येते.

या संपूर्ण साहित्याचा पाच वर्षांचा विमा काढलेला असल्याने शेतकऱ्याला संपूर्ण भरपाई मिळते. सौर पॅनल हे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आले आहे.


वावी उपकेंद्रांतर्गत 40 शेतकऱ्यांची निवड 

महावितरणच्या वावी कक्ष कार्यालयांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंपाच्या लाभासाठी दीडशेहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र पाण्याची शाश्वत उपलब्धी आणि पारंपरिक वीजपुरवठ्याची सोय नसणाऱ्या अर्जदारांना प्राधान्य देत त्यापैकी 40  जणांची निवड झाली. 22 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून 18 शेतकरी प्रतिक्षा यादीत आहेत.

त्यांनाही लवकरच योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेत राज्यातील केवळ दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. अत्रे यांच्या शेतात एल ऍण्ड टी या कंपनीमार्फत युनिट बसवण्यात आले आहे. या सयंत्रात पंप सुरूर केल्यावर किती ऊर्जा वापरली गेली याची नोंद थेट कंपनीच्या नियंत्रण कक्षात होते.

सयंत्रातील बिघाड देखील शेतकऱ्याला कंपनीद्वारेच कळवले जातात. दुरुस्तीसाठी दोन दिवसांच्या आत तंत्रज्ञ देखील पाठवले जातात अशी माहिती महावितरणचे अजय सावळे यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!