Type to search

मेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे

माझं नाशिक

मेडिकल टुरिझम नवे आयाम – डॉ. नीलिमा अहिरे

Share
कुंभमेळ्यामुळे जागतिक नकाशावर पोहोचलेल्या नाशिक शहराचा वैद्यकीय आयामही तितकाच मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळ अन् देशातील मेट्रो सिटीमधून स्वस्त आणि सुरक्षित आरोग्यसेवांसाठी नाशिकसाठी पसंती वाढीला लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मेडिकल टूरिझम प्लेस म्हणूनही उदयाला येण्याची क्षमता या शहरात आहे. मात्र, यासारख्या ध्येयासाठी सर्वांच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

द्राक्ष, वाईनसह थंड हवेचे ठिकाण अशी ओळख आजही राखून ठेवणार्‍या नाशिकला या वातावरणाचा लाभ मेडिकल टूरिझम क्षेत्रातील प्रगतीसाठी होऊ शकतो. उत्तम हवापाणी हा जसा त्याकरिता पोषक घटक आहे, तसेच सर्व प्रकारची वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालय, आरोग्य विद्यापीठ यामुळे स्थानिक पातळीवर तज्ञ मनुष्यबळ उपलब्धीची शाश्वती यांचीही चांगलीच रेलचेल असल्याने धार्मिक, कृषी व औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक आगामी काळात मेडिकल टूरिझम डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येऊ शकते आणि ते आले पाहिजे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मुंबई किंवा पुण्याच्या तुलनेत औषधांसाठी तसेच हॉस्पिटल्ससाठी अत्यल्प दर, राहण्यासाठीच्या अल्पदरातील सुविधा, मुंबईची असलेली जवळीक, स्वच्छता आणि अत्याधुनिक उपकरणांचा वापर, परिणामकारक आणि यशस्वी उपचार यामुळे नाशकातील मेडिकल टूरिझम वाढणे शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. उपचारार्थ नाशकात येवून परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढीस लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

नाशकात आजही आठ ते दहा हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. मुंबईत सुविधा असल्यातरी त्या महागड्या आहेत. त्या तुलनेत नाशकात या सुविधा अल्प दरात आहेत. तसेच मुंबई-पुणे अंतरही जास्त नाही. त्यामुळे भारतात आणि खासकरुन नाशकात उपचारार्थ येणारे परदेशी पेशंटस नाशकात उपचार घेण्याला प्राधान्य देतात.

येत्या काळात योग्य मार्केटिंग झाल्यास नाशिक मेडिकल टूरिझममध्ये अग्रेसर राहणार आहे. जनतेला योग्य व गुणवत्तापूर्ण सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे हे आरोग्य व्यवस्थेचे मुख्य ध्येय आहे. चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील वंचित भाग आणि समाजघटकांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मुळात आदिवासी बहूल असा नाशिक जिल्हा आहे. मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठा असून यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बालके दगावतात.

तर बालामातांचा प्रश्नही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. यामध्ये मोठे काम होण्याची गरत आहे. तसेच या दृष्टिकोनातून नाशिकला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असला तरी त्याची ती क्षमता अभ्यासाने पुढे येत आहे. जिल्ह्यात कार्यरत सामाजिक संस्था तसेच आरोग्य यंत्रणांचे यावर चांगले नियंत्रण आहे. आरोग्य सेवेसाठी ज्यांची उपलब्धी गरजेची ठरते, त्यात नाशिक तसूभरही मागे नाही.

शहरात दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहेत. 108 सह रुग्णांच्या सेवेसाठी मोठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर विभागातील मेट्रो ब्लड बँक या ठिकाणी असून कोणत्याही क्षणी कोणत्याही गु्रपचे रक्त उपलब्ध होत आहे. यापूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इअर अ‍ॅम्बुलन्सची चाचपणीही झाली होती. तर आगामी काळात ही सुविधाही नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे.

तसेच पुढील काळात साखळी रुग्णालये येऊ घातली आहेत. या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध होत असलेल्या सर्व सुविधांचा या उपक्रमास मोठा हातभार लागू शकतो. सुवर्ण त्रिकोणातील एक कोन ठरलेल्या नाशिकला भविष्यात मेडिकल टूरिझमच्या माध्यमातून आपली नवीन ओळखही निर्माण करता येईल. या दृष्टीने सर्व घटकांचा समन्वय होऊन योग्य दिशेने विकास व वाटचाल करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा परवडतील अशा दराने उपलब्ध होणे आवश्यक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!