नागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख

0

नाशिक शहराचा अपेक्षेप्रमाणे विकास होत असून त्याला काही प्रमाणात रस्त्यांची व वाहतुकीची मात्र मोठी अडचण होऊन बसली आहे. शहराच्या विविध भागात रस्ते छोटे असल्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे.

मात्र, या एकेरी वाहतुकीचा नाशिकमधील दुचाकीधारक आणि रिक्षाचालक तसेच छोटे चारचाकी खासगी वाहनधारक पाहिजे, त्या प्रमाणात उपयोग करत नाहीत. ही एक शोकांतिका आहे.

दुचाकी व छोट्या चारचाकी वाहन धारकांकडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नको तेथे पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात कोंडमारा होतो.ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्वतःपासूनच प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

महात्मा गांधी रस्त्यावर तर नियमांचे पालन होतच नाही.सर्रासपणे नियम तोडले जातात.त्यामुळे नियमांचे पालन प्रत्येकाने केले तर येणार्‍या अडचणींना कोणालाही सामोरे जावे लागणार नाही. पिवळ्या पट्ट्याच्या आत आपले वाहन लावणे गरजेचे आहे. मात्र, असे होतच नसल्याने पोलिसांनाही अशी वाहने उचलावी लागतात.

जर आपणच पिवळ्या पट्ट्यात वाहने लावत स्वत:लाच शिस्त लावली तर कोणाला अडचण येणार नाही. वाहनचालक सर्रास नियमांना आव्हान देतात. सिग्नल पाळत नाहीत. एकेरी मार्गावर दोन्ही बाजूने वाहने ये-जा करत असतात. बसथांब्यांवर वाहने मन मानेल तशी थांबवली जातात. विनाकारण कर्कश्य हॉर्न वाजवले जातात. हे नाशिकच्या वाहतुकीचे सध्याचे चित्र आहे. तथापि वाहनधारकांप्रमाणेच वाहतूक विभागही आपले कर्तव्य योग्य रितीने बजावताना दिसत नसल्याची वाहनचालकांची तक्रार असते. ती काही प्रमाणात खरी असली तरी त्याविरुद्ध दाद मागितली जाऊ शकते. सप्रमाण सिद्ध करता येऊ शकते.

नाशिक शहरात वाहतूक कोंडीची अडचण सोडल्यास येथील इतर सगळे वातावरण अत्यंत चांगले आहे. हवामान चांगले आहे. मात्र, वाहतूक व्यवस्थित झाली तर कोणालाही अडचण येणार नाही. मात्र, दुचाकी व चारचाकी धारकांवर कारवाई होत असते. कायदा मोडला तरी कारवाई व्हायला हवी यात कोणाचेही दूमत असणार नाही. पण त्याच वेळी रिक्षाचालक मात्र सिग्नल तोडताना, इतर वाहतूक नियम तोडत नियम न पाळता सर्रास निघून जातात.

त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नसावी? अनेकदा बसथांब्यावर पोलिसांचे वाहन आले की, परिस्थिती काहीशी नियंत्रणात येते पण ते वाहन निघून गेले की, ती पुन्हा जैसे थे होते. मग याचा काय उपयोग? बेशिस्त वाहनचालकांना शिस्त कधी आणि कोण लावणार? ही बाब अत्यंत खेदजनक आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था जर सुरळीत झाली तर शहरात कुठलीही अडचण भासणार नाही. त्यासाठी वाहतूक विभाग आणि नागरिकांनी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजे. याबरोबरच शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे.

नाशिकमध्ये होणारा कुंभमेळा आणि त्यामुळे शहरातील रस्त्यांची दिशा बदलून गेली आहे. धार्मिक महत्त्व असणार्‍या त्रंबकेश्वरला जाण्यासाठी असणार्‍या रस्त्याचा कायापालट झाला. सिंहस्थात या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरणही झाले आहे रुंदीकरण करताना महानगरपालिकेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी दुभाजकांमध्ये अंतर ठेवले ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे.

मात्र,त्याचा वापर योग्य रीतीने वाहनधारकांकडून होत नाही. तो होणे गरजेचे आहे. शहर विकास हे शासनाचे प्रमूख कर्तव्य आहेच. पण ती फक्त शासनाचीच जबाबदारी मानून चालेल का? त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तो कसा आणि किती वाढेल, यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. वाहतूक विभागानेही कायदा सर्वांना सारखाच लागू करावा, ही अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

*