आयटी वर भर द्या – जितेंद्र बेळगावकर

0
नाशिक शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ याप्रमाणेच ‘मेक इन नाशिक’ म्हणून नाशिककडे बघणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये विविध इंडस्ट्रीज येतात. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिका व येथील इंडस्ट्रीने अशा विविध कंपन्या येथे आणण्यावर भर देणे गरजेचे आहे.

नाशिकमध्ये मल्टिनॅशनल कंपन्या आल्या तर रोजगार वाढेल आणि अशा कंपन्यांमधून नाशिककरांना रोजगार मिळेल. नाशिकमध्ये ज्याप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या मोठ्या कंपन्या आल्या. मात्र, त्या आल्यानंतर दहा वर्षांत त्यांच्याप्रमाणे मोठ्या कंपन्या अजूनही नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा कंपन्या नाशिकमध्ये येण्याकरिता लोकप्रतिनिधी, नाशिक महानगरपालिका व इंडस्ट्रीने भर देणे गरजेचे आहे.

नाशिक शहरातील वडाळा रोड येथे आयटी पार्कसाठी जागा देण्यात आली. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात आयटी कंपन्या नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. पुणे शहराची ज्याप्रमाणे वाढ होत आहे. त्याप्रमाणात नाशिकमध्ये ही वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुंबई, बंगळुरू, पुणे येथे आयटी कंपन्या येतात, तशा कंपन्या नाशिकमध्येही येणे गरजेचे आहे.

वरील मोठ्या शहरांमध्ये असणार्‍या या कंपन्यांना आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात मासिक वेतन द्यावे लागते. त्या तुलनेत नाशिकमध्ये जर अशा मोठ्या कंपन्या आल्या तर या कंपन्यांना अल्प वेतनात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. यातून नाशिक शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांना व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.

नाशिकमधील अनेक तरुण आयटी, उच्च शिक्षण घेऊन इतर शहरांत नोकरीसाठी जात आहेत. इतर शहरात जाण्याचा हा ओघ जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर निश्चितच कमी होईल. नाही म्हणता नाशिक येथे कुंभमेळा भरत असल्यामुळे शहरामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी अशी कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.

मुंबई, पुणे येथून मोठे बिल्डर यांनी नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. मात्र, सध्या या व्यवसायाला मंदीचे दिवस आहेत. त्यातच जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर या व्यवसायालाही तेजी येऊ शकते. त्यासाठी मोठ्या इंडस्ट्री व आयटी पार्क नाशिकमध्ये होणे गरजेचे आहे.

नाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास, नाशिक शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत भारतात तेविसावा तर महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक लागतो. याचाच अर्थ राज्यात नाशिक हे पहिल्या पाचमध्ये आहे. मुंबई शहराची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.

त्याबरोबर पुण्यातही अशीच वाढ असून महाराष्ट्रातील नाशिक शहर हे आता आयटी पार्कसाठी एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडूनही निधीची उपलब्धता होते. त्यातून लोकप्रतिनिधींनी नाशिक येथे आयटी पार्क होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

नाशिकमध्ये आयटी पार्क झाल्यास कराची रक्कम ही इतर शहरांच्या तुलनेत कमी राहील. त्यामुळे याचा फायदा नाशिकमध्ये येणार्‍या कंपन्यांनाही होऊ शकतो. सिन्नर येथे सेझ येणार येणार म्हणून त्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, दहा वर्षांपासून हा सेझ सिन्नरमध्ये अजूनही आलेला नाही, ही एक शोकांतिका आहे.

LEAVE A REPLY

*