Type to search

जलयुक्त शिवारचा झिरपा – किरण मोघे

माझं नाशिक

जलयुक्त शिवारचा झिरपा – किरण मोघे

Share
लोकसहभागातून जलसंधारणाचे महत्त्व गावपातळीपर्यंत पोहोचवण्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरले आहे. या अभियानामुळे टंचाईग्रस्त गावात जलसंधारणाची चळवळ जोमाने पुढे जाताना दिसत आहे. या अभियानासोबतच ‘वॉटर कप’ स्पर्धा आणि ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन ग्रामीण भागात कृषी विकासालाही चालना मिळाली आहे.
  • डॉ. किरण मोघे जिल्हा माहिती अधिकारी

ज्या शासनाने 2015-16 या वर्षात या अभियानाला सुरुवात केली. पहिल्याच वर्षी नाशिक जिल्ह्यातील 229 गावांत 183 कोटींची 8 हजार 110 कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे 37 हजार 388 टीसीएम जलसाठा निर्माण झाला आणि त्यामुळे 74 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा झाला.

पहिल्याच वर्षी या अभियानाला मिळालेला लोकसहभाग लक्षणीय होता. विशेषत: जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात टंचाईग्रस्त भागातील गावांना या अभिनामुळे दिलासा मिळाला. पाणीसाठा उपलब्ध झाल्याने गाव टँकरमुक्त होण्याबरोबर काही भागात रब्बीचे पीकही शेतकर्‍यांना घेणे शक्य झाले.

पुढील वर्षी 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 218 गावांत सहा हजार कामे करण्यात आली. त्यात 15 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. 48 हजार मीटर लांबीच्या क्षेत्रात रुंदीकरण किंवा खोलीकरण करण्यात आले. अभियानावर 154 कोटी रुपये खर्च करण्यात आला. झालेल्या कामांमुळे 41 हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला.

सन 2017-18 च्या आराखड्यात 201 गावांचा समावेश करण्यात आला.त्यापैकी 197 गावे जलपरिपूर्ण झाली असून 190 गावांत 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. या गावांमध्ये जलसंधारणाची तीन हजार 916 कामे करण्यात आली.
चालू आर्थिक वर्षात 301 गावांची निवड करून गावपातळीवर आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

शिवारफेरीच्या माध्यमातून गावाची गरज ओळखून हा आराखडा तयार करण्यात येत आहे. या वर्षापासून आराखडा बनवताना गावाच्या ‘वॉटर बजेटींग’चादेखील विचार करण्यात येणार आहे. पावसाचे उपलब्ध पाणी, गावाची पिण्याच्या पाण्याची गरज, खरिपासाठी लागणारे पाणी, बाष्पीभवनात कमी होणारा जलसाठा, रब्बीसाठी उपलब्ध पाणी, त्यानुसार घ्यावयाची पीकपद्धत आदी बाबींचा शास्त्रोक्त अभ्यास या प्रणालीमध्ये होत असल्याने पाण्याचा नियोजित वापर करता येणे शक्य आहे.

गावपातळीवर पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि त्याचा योग्य तसेच काटकसरीने वापर या त्रिसूत्रीवर काम केल्यास जलयुक्त अभियान गावासाठी वरदान ठरणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पारंपरिक जलस्रोताचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच दुरुस्तीची कामे झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. साखळी सिमेंट बंधार्‍यांमुळे भूजलस्तरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वनविभागातर्फे करण्यात आलेल्या कामांमुळे वनक्षेत्रातील वनस्पती आणि प्राण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पूर्व पट्ट्यातील गावात मातीनाला बांधचा प्रयोग यशस्वीपणे केल्याने तसेच मजगीच्या कामांमुळे भातशेतीसाठी पाणी अडविण्यात यश आले आहे.

अभियान राबवताना गावात पहायला मिळणारी एकजूट आणि लोकसहभाग हे अभियानाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. गावाच्या विकासाचा एकत्रित बसून विचार होत असल्याने गावाच्या एकूणच विकासाला चालना मिळते आहे. गांगोडबारीसारख्या गावात पथदर्शी प्रयोगामुळे पाझर तलावाची गळती रोखण्यात यश येऊन गतवर्षी चांगला पाणीसाठा निर्माण झाला होता. अभियान राबविल्यामुळे बर्‍याच ठिकाणी विहिरीची पाणीपातळी एक ते दीड मीटरने वाढली आहे.

ग्रामीण अर्थतंत्र शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसाठी पाणी आवश्यक आहे. गावात पाणी उपलब्ध झाले तर प्रत्येक गाव आर्थिकदृष्टीने सक्षम होऊ शकणार आहे. जलयुक्तच्या माध्यमातून शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याने ही चळवळ आता गावाच्या सक्षमीकरणाच्या चळवळीत रुपांतरीत होताना दिसत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच अंमलबजावणी अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना लोकसहभागाची साथ मिळाल्यास जिल्ह्यातला ग्रामीण भाग सुजलाम् सुफलाम् होण्यास वेळ लागणार नाही.

जलयुक्त शिवार अभियान

तालुका     कामे सुरू केलेली गावे संख्या,  पूर्ण झालेली कामे संख्या
त्र्यंबकेश्वर        32                                  1214
इगतपुरी          25                                     701
पेठ                53                                     93
निफाड            19                                     440
चांदवड            56                                   1998
सिन्नर            74                                   1597
येवला             47                                   1501
कळवण           51                                   1221
दिंडोरी             36                                   1292
सुरगाणा          57                                    1158
देवळा             30                                      952
मालेगाव          57                                     2082
बागलाण          13                                      553
नांदगाव           53                                      1326
सटाणा            45                                     1120

एकूण         648                                           18148

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!