Type to search

Special माझं नाशिक

पर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर

Share
नाशिकची वाटचाल मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासारखा जागतिक महोत्सव नाशिकमध्ये आयोजित केला जातो. नाशिकचा विकास जरी झपाट्याने होत असला तरी नाशिकला निसर्गाची एक अभूतपूर्व असे सौंदर्य लाभले आहे. आज शहरात अनेक पुरातन वास्तू आहे.

नाशिकचे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्वही खूप आहे. दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक, पर्यटक नाशिकला येत असतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यात आहेत. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभुमी, भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावकरांची जन्मभूमी, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकचा धार्मिक, पौराणिक वारसा जपताना नाशिकच्या पर्यटनाला चालना देणे खूप महत्त्वाचे आहे.

आज नाशिक शहरात पर्यटक कुणाकडे पाहुणे म्हणून आले तर त्यांना कोणतेही प्रेक्षणीय स्थळ दाखवायला म्हणावे तर असे पर्यटन केंद्र नाही. धार्मिक पर्यटन म्हणून मंदिरे आहेत, परंतु त्यांची योग्य ती निगा राखली जात नाही. धार्मिक स्थळांचा देखील चांगल्या प्रकारे विकास केला गेला पाहीजे. गुजरात, राजस्थानसारखे राज्य पर्यटन विकासात अग्रेसर आहे. कारण पर्यटनाचे उत्कृष्ट माकर्र्ेटिंग या राज्यांद्वारे केले जाते.

नाशिकमध्ये देखील यासाठी पुरेसा वाव आहे. नैसर्गिक साधनसंपदा येथे आहे. परंतु, या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबरोबरच त्यांचे मार्केटिंगही होणे फार आवश्यक आहे. पर्यटनाबरोबरच ट्रॅिंकंग, मेडिकल टूरिझम, अ‍ॅग्रो टूरिझम, डॅम टूरिझम, वाईन टूरिझम अशा नाशिकच्या कक्षा रूंदावलेल्या आहेत. केवळ याला चालना मिळण्याची आवश्यकता आहे.

या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटक नाशिककडे आकर्षिला जाऊन येथील रोजगाराच्या संधीही वाढतील. पर्यटनस्थळांचे चांगल्या प्रकारे मार्केटिंग झाल्यास लोकांना फारसे माहीत नसलेल्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांचा समृद्ध वारसा नाशिकलाही लाभला आहे.

या भागात सुमारे 50 हून अधिक गड, किल्ले आहेत. त्यामुळे साहसी पर्यटकांचाही मोठा राबता असतो. शासनाच्या पर्यटनविकास निधीतून या गड, किल्ल्यांचा विकास होणे आवश्यक आहे. तसेच ट्रेकिंगसाठी येथे प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे.

नाशिकला ‘किचन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. नाशिकचा शेतकरी प्रयोगशील आहे. इथली रसाळ द्राक्षे, कांदा देशातच नव्हे तर परदेशात निर्यात केला जातो. मुंबईसह देशाच्या विविध भागात नाशिकमधून भाजीपाला पाठवला जातो. त्यामुळे येथे कृषी विकासाला मोठा वाव आहे. अर्थात त्या द़ृष्टीने नाशिक प्रगतीमय वाटचाल करत आहे, यात शंका नाही. मात्र, फळप्रक्रिया उद्योग येथे स्थापन होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. ज्याद्वारे कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून शेतीचे उत्पन्नही वाढेल आणि शेतकरीही समृद्ध होईल.

नाशिकमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार होत आहेत, मात्र आजही या खेळाडूंना सरावासाठी मुंबई, बंगळुरू आदि शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे नाशिकमध्येच साधने मिळाल्यास अव्वल खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. मग वॉटर स्पोर्टस्, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् किंवा इतर क्रीडा प्रकारांसाठी चांगली मैदाने आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. बंगळुरूला देशाची ‘सिलीकॉन व्हॅली’ म्हटले जाते. त्याचप्रमाणे नाशिकलासुध्दा ‘स्टार्ट अप’ला चालना देणे आवश्यक आहे.

नाशिकमधील युवकांमध्ये खूप सारे टॅलेंट आहे. मात्र, संधी निर्माण होत नसल्याने हे युवक नोकरीसाठी इतर शहरांकडे जातात. याकरिता नाशिकमध्ये ‘स्टार्ट अप’चा विकास करणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नवीन ‘स्टार्ट अप’ या क्षेत्रात आल्यानंतर युवकांना चांगले मार्गदर्शन मिळावे.

वित्तीय सहायता, शासकिय योजना, प्रशिक्षण पेटंट, फायलिंग, ट्रेड मार्क, रजिस्ट्रेशन यासंह विविध कामांसाठी हेल्प डेस्क असावी. उद्योग, शेती, शिक्षण, ऊर्जा, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन आदि क्षेत्रात काम करण्याचे अनेक नवउद्योजकांचे स्वप्न आहे. त्याकरिता मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही ‘स्टार्ट अप’ पार्कची उभारणी करण्यात यावी.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!