समानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ

0
कोणत्याही शहर, गाव, देशाचा विकास ह्या त्या देशातल्या स्त्रियांच्या विकासावर अवलंबून आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहेे. मी एक स्त्री रोगतज्ञ आहे आणि मला स्वतःला आंबेडकरांचे हे मत 100 टक्के मान्य आहे. आज आपण अनेक समस्यांना तोंड देतोय.

बाहेरील शत्रूपेक्षा मोठ्या समस्या खुद्द आपण अंजारून गोंजारून मोठ्या केल्यात. लिंग भेदभाव, जाती पाती, भ्रष्टाचार, बेसुमार लोकसंख्या, गुन्हेगारी, कायद्याचे उल्लंघन ह्या सगळ्या समस्यांना कळत नकळत आपणच खतपाणी घातलेय. भारतातली प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहून फक्त होम मेकर नाही तर विनर ही बनेल, रात्री उशिरापर्यंत कधीही कुठेही बिनधास्त फिरेल, योग्य वयात मातृत्व स्वीकारेल, अन्याय करणार नाही, तेव्हाच खर्‍या विकासाला सुरुवात होईल. ही विकासाची सुरुवात माझ्या नाशिकमधून व्हायला हवी.

मी नेहमी विचार करते. आपल्या शहरातील 90 टक्के स्त्रिया ह्या गृहिणी अथवा होम मेकर असतात, म्हणजे सकाळी नवरा, मुले डब्बा घेऊन ऑफिसात, कामावर, शाळेत गेली की, संध्याकाळपर्यंत ह्या बायकांना काहीच काम नसते, यावरून भारतातल्या स्त्रियांची शिक्षण घेऊन किंवा कमीतकमी एखादा गृहउद्योग करून स्वावलंबी असण्याबद्दलची उदासीनता लक्षात येते. हे माझेे निरीक्षण आहे, वैयक्तिक मत.

जेव्हा स्त्रिया अन्नवस्त्र आणि निवार्‍यासाठी आधी वडील आणि नंतर नवर्‍यावर अवलंबून असतात, तेव्हा त्यांना विकसित आणि मुक्त म्हणावे का? मी नाही म्हणू शकत. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची हळूहळू शाळेतून गळती चालू होते. स्वतः नोकरी व्यवसाय करून कमीत कमी महिन्याला 5 ते 10 हजार रुपये कमवू शकणार्‍या स्त्रियांची संख्या अजूनही खूपच कमी आहे भारतात.

इथे भारताचा विकास जो काही झाला आहे, तो स्त्रियांपर्यंत खरंच पोहोचला आहे का, हा प्रश्न पडतो. कायदा असला तरी अजूनही ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टीत राहणार्‍या मुलींची लग्न 18 वर्षांच्या आत होताहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याकडे कोणाचे लक्ष आहे का? ह्या अशाप्रकारे कमी वयाच्या, जेमतेम सहावी, सातवीपर्यंत शिकलेल्या मुली, पुढे लग्न करून कमी वयात मातृत्व पेलतात. अनारोग्य, रक्तक्षय, कुपोषण, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या विळख्यात सापडतात, अज्ञान आणि अशिक्षित असल्यामुळे कुटुंबावर आणि नकळत समाजावर आणि देशावर बोजा बनतात.

पुढे चालून परावलंबित्व पत्करल्यामुळे न्यूनगंड आणि औदासीन्यतेने ग्रासून जातात. अशिक्षित आई, तिच्या पोटी जन्मलेले कुपोषित मूल, घरात एकटा कमावणारा पुरुष, कुटुंबनियोजनाच्या उपायांबाबत असलेल्या आणि एकंदरीतच सर्वच अनास्थेमुळे जन्माला येत राहणारी मुले, ह्यामुळे पुन्हा वाढत जाणारी भस्मासुरासारखी देशाची लोकसंख्या ह्या दुष्टचक्रात भारत अडकलाय.

मासिक पाळीच्या संबंधित समज गैरसमज आणि सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाट करण्यासंदर्भात वयात येणार्‍या मुलींपासूनच समुपदेशन करायला हवे. नाशिक शहरात आणि जिल्ह्यातही मोठ्या संख्येने डॉक्टर्स आणि सामाजिक संस्था आता ह्या कार्यात सहभागी होत आहेत.

करियरच्या महत्त्वाच्या वळणावर म्हणजे साधारण 9वीपासून आई, वडील आणि शिक्षक ह्यांनी मुला-मुलींकडे सजगपणे पण मैत्रीपूर्ण आणि सामंजस्याने बघणे आवश्यक आहे. आपला पाल्य कुणाबरोबर आपला वेळ घालवतो/घालवते, इथपासून ते शाळा, कॉलेज आणि क्लासला नियमित हजर आहे की नाही, नसेल तर काय, कुठे, कोणाबरोबर ह्याची खात्री करून घेतली तर अनेक तात्कालिक आणि भविष्यात निर्माण होणार्‍या समस्यांपासून सुरक्षित रहाता येईल.

याशिवाय गल्लोगल्ली कोपर्‍यांवर, टपर्‍यांवर उभ्या राहिलेल्या,येणार्‍या जाणार्‍या मुलींना आणि एकूणच समाजाला घातक ठरणार्‍या टोळक्यांशी सुसंवाद साधून आणि वेळप्रसंगी त्यांच्या आई-वडील आणि पोलिसांशी संपर्क साधून बर्‍याच दुर्घटना टाळता येतील.

LEAVE A REPLY

*