बहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ

0
आपल्या नाशिकची मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा विकास आहे. आता तर आपले शहर ‘स्मार्ट सिटी’ होणार आहे. यासाठी शासकीय स्तरावर मोठी कामे हाती घेण्यात आली आहेत. शहर स्मार्ट व्हावे, ही सर्व नाशिककरांची इच्छाच आहेच, परंतु हा विकास होताना केवळ इमारती, रस्ते, सिमेंटची जंगले वाढ होऊन चालणार नाही.

मुळात नाशिकची ओळख पुण्यभूमी म्हणून आहे. तसेच नाशिकचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला देखील आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात नाशिक शहर हे राहण्यायोग्य चांगल्या शहरांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास कारण अद्यापपर्यंत टिकून असलेेले पर्यावरण व यामुळे आटोक्यात आलेले प्रदूषण हे आहे.

यामुुळे नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा, परंतु त्यांच्या निसर्ग सौंदर्यालाही बाधा येता कामा नये. उलट हे निसर्ग सौंदर्य अधिक खुलण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

विकास हा समतोल सर्व सामावेशक असावा. हा होत असताना पर्यटन, मेडिकल हब, आयटी हब, शिक्षण, ऑटोमोबाईल, धार्मिक स्थळे तसेच ऐतिहासिक स्थळे आदींचा विचार होणे गरजेचे आहे. आपल्या नाशिकला नैसर्गिकरित्या लाभलेल्या पर्यटनस्थळांवर अधिक लक्ष केंद्रित केल्यास शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडण्यासह या परिसरातील नागरिकांना याद्वारे रोजगारही उपलब्ध होणार आहे.

यातून अधिक विकास शक्य आहे. शहरात पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे. एकीकडे महापालिका पार्किंगची सुविधा करत नाही तर दुसरीकडे पोलिसांची टोईंग व्हॅन कारवाई करत आहे. यामुळे नेमके काय करावे, असा नागरिकांना प्रश्न पडला आहे. शहरात उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या भुखंडांवर बहुमजली अथवा अंडरग्राऊंड पे अ‍ॅण्ड पार्किंग करणे सोयीस्कर ठरणार आहे. यातून नागरिकांच्या सुविधेसही महापालिकेलाही उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे.

शहरात सौर ऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सार्वजिक वाहतुकीचे बळकटीकरण, पायाभूत सुविधांवर भर, उद्योगांची गुंतवणूक यातून रोजगारनिर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी वातावरण अनुकूल आहे. मात्र, यासाठी सर्वपक्षीयांचा पुढाकार व शासकीय पातळीवर पारदर्शकता येणे गरजेचे आहे.

पुणे, मुंबई या शहरांमध्ये आयटी पार्क कार्यरत असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे रात्रंदिवस काम चालते. परिणामी सकाळ ते रात्री दहापर्यंत हॉटेल्स तसेच मॉल्स चालू असतात. याच धर्तीवर नाशिकमध्येही नाईट लाईफला परवानगी असावी. स्मार्ट शहरातील सर्व कामकाज पेपरलेस, पारदर्शी चालावे तसेच पर्यावरणाला अधिकाधिक चालना द्यावी, अशा पद्धतीने आपले शहर पर्यावरणपूरक स्मार्ट होणे शक्य आहे. फक्त गरज आहे ती सर्वांच्या इच्छाशक्तीची.

LEAVE A REPLY

*