Deshdoot Exclusive : मुक्त विद्यापीठ वेगळ्या उंचीवर नेऊ! – नवनिर्वाचित कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांची ग्वाही

0

नाशिक (प्रवीण खरे) : मुक्त विद्यापीठातील विविध विभागांतील माहिती घेत त्यातील त्रुटी दूर करण्यात येतील. या त्रुटी दूर केल्यानंतर दूरस्थ शिक्षण सर्वांपर्यंत पोचवत विद्यापीठाला एक वेगळी उंची नेऊ, अशी ग्वाही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन यांनी ‘देशदूत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.

राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सोमवारी (दि. 6) दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी घोषणा केली. डॉ.वायूनंदन यांनी ‘देशदूत’शी बोलताना पुढील पाच वर्षात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार यावर मनोगत व्यक्त केले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात मी 1987 पासून काम करीत आहे. त्यामुळे दूरस्थ शिक्षणाचा 30 वर्षांचा भक्कम अनुभव गाठीशी आहे. या अनुभवाचा फायदा घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध विभागांची सुक्ष्मपणे माहिती घेतली जाईल.

ती स्थिती जाणून घेतल्यानंतर त्याचा योग्य अभ्यास करून विद्यापीठाचा सर्वांगाने विकास करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापीठाचे काम राष्ट्रीय पातळीवर चालते. त्यामुळे तेथील अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची मानसिकता याची जाणीव मला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नावलौकीक मिळविलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कारभार सुधारून त्यात नाविन्यता आणण्यात येईल.

जेणे करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होवू शकतो. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेवून त्यापध्दतीने विद्यापीठाचा अभ्यासक्रम व इतर तांत्रिक गोष्टींचा विकास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवसात विद्यापीठाचा कारभार हाती घेणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दि. 19 ऑगस्ट 2016 रोजी, नियत मुदतीपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

त्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. दिल्लीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रो. अजय कुमार शर्मा तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे हे समितीचे अन्य सदस्य होते.

कुलगुरूच्या स्पर्धेत नागपुर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.मोहन काशिकर, तसेच याच विद्यापीठातील प्र कुलगुरू डॉ.पी.जी.येवले यांचाही समावेश होता. परंतु समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती मागील आठवडयात घेतल्यानंतर राज्यपालांनी वायुनंदन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर सोमवार दिनाक.6 मार्च रोजी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अधिकृतरित्या त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

LEAVE A REPLY

*