आता प्रौढत्व जाणवले पाहिजे!

0

भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आहे. वर्षभर ऋतुमानानुसार बरेच सण-उत्सव साजरे केले जातात. भेदभाव, कटुता विसरून सर्वांनी एकत्र यावे व सुख-दु:खे वाटून आनंद साजरा करावा हाच या सणांमागील हेतू आहे. याशिवाय देशात दोन राष्ट्रीय सण वर्षानुवर्षे उत्साहात साजरे होतात.

एक देशाचा स्वातंत्र्यदिन व दुसरा प्रजासत्ताक दिन! 26 जानेवारी 1950 रोजी देशाने लोकशाही राज्यघटना स्वीकारली. देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. भारताचे प्रजासत्ताक आता सत्तरीकडे जात आहे. म्हणजे ते प्रौढत्वात पोहोचले आहे. तथापि देशातील राजकारणात मात्र त्या प्रौढत्वाला अनुरुप सौष्ठव अद्याप का जाणवत नाही?

लोकांच्या राज्यात लोकहिताऐवजी सत्ताप्राप्ती हेच सर्व राजकीय पक्ष व नेत्यांचे ध्येय कसे बनले? ही उणीव कोण व कशी दूर करणार? राजकीय नेतृत्व त्याबाबत सजग कधी होणार? दहशतवाद, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, स्त्रियांवरील अत्याचार, जाती-धर्मभेद असे बरेच प्रश्न देशापुढे आ-वासून उभे आहेत. देशाचे नेतृत्व या प्रश्नांचा गांभिर्याने विचार करीत आहे का?

जनतेला तसे भासत नाही ही वस्तुस्थिती नाकारणार का? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सात दशकांत देशाने बरेच चढउतार पाहिले. अडचणींवर मात करून देशाची प्रगतीपथाकडे वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय विचारप्रवाह असूनही देशाचा मानबिंदू ठरलेली ‘इस्त्रो’ ही अंतराळ संशोधन संस्था विविध मोहिमा यशस्वीपणे पार पाडत आहे. गेल्या आठवड्यापूर्वी ‘इस्त्रो’ने अंतराळात उपग्रह प्रक्षेपित करण्याचे शतक साजरे केले.

अलीकडे भारतीय सैन्य बरेच आक्रमक झाले आहे. गतवर्षी पाकव्याप्त काश्मिरात ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचा बराच गाजावाजा झाला. तरीही पाकच्या आगळिकीला पायबंद का बसलेला नाही? गेल्या तीन वर्षांत पंतप्रधानांनी अमेरिकेसह अनेक देशांना भेटी देऊन त्यांच्याशी मैत्र वाढवले आहे. अमेरिका, जपान, इस्त्रायल आदी देशांसोबतच्या संबंधांमुळे जगात भारताचा दबदबा वाढला आहे.

देशाची अर्थव्यवस्थाही सक्षमपणे वाटचाल करत आहे. विविधतेत एकतेचा नारा दिला जात असला तरी राष्ट्रीय एकात्मतेवर मात्र तर्‍हेतर्‍हेचे आघात सुरू आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येऊ पाहत आहे. सत्तेविरुद्ध आवाज उठवणार्‍यांना ‘देशद्रोही’ ठरवले जात आहे. गोरक्षणाच्या नावावर निरपराधांवर अन्याय होत आहेत.

हे सगळे प्रकार थांबवण्याची जबाबदारी कोण व कशी पेलणार? भारतीय प्रजासत्ताकाचा शतकोत्सव पाहण्यासाठी व त्यावेळीसुद्धा देशाचा एकसंघ ‘नकाशा’ कायम राहावा यासाठी सर्वांनीच ‘जागे’ राहण्याची आवश्यकता आहे. किमान तेवढे प्रौढत्व तरी पुढील काळात जाणवावे.


आशादायक बदल

नुकतेच विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्यांना त्यांचे नातलग अथवा मित्रमंडळींकडून एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘काय मग, पेढे केव्हा देता’? या सूचक प्रश्नातून ‘मुलगाच हवा’ हा संदेश नकळतपणे आजही दिला जातो. नवपरिणित जोडप्यांना हा प्रश्न वर्षानुवर्षे विचारला जातो. ‘पेढा’ व ‘बर्फी’ ही मिठाई अनुक्रमे ‘मुलगा’ आणि ‘मुलगी’ या शब्दांना पर्यायी संकेत म्हणून वापरले जातात.

मात्र ‘बर्फी केव्हा देता?’ असे विचारणारी माणसे दुर्मिळच! कन्या जन्माचा आनंदोत्सवही तुरळक दिसतो. मुलाचा अट्टाहास धरला गेला नसता तर चौकाचौकांत सोनोग्राफी केंद्रे का थाटली गेली असती? स्त्रीभ्रूणहत्या का वाढल्या असत्या? या सगळ्या प्रकारांतून हजार मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटला आहे. तो वाढावा म्हणून सरकारी व सामाजिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुलींना जन्म देणार्‍या माता-पित्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम काही प्रमाणात आता दिसत आहेत. ‘मुलगाच हवा’ ही मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे सांगितले जात आहे. त्याला पुष्टी देणारा आशादायक निष्कर्ष राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून स्पष्ट झाला आहे. ‘वंशाच्या दिव्या’चा अट्टाहास आता काहींनी तरी सोडला असावा, असा निष्कर्ष त्यावरून काढावा का?

‘मुलगी हवी’ म्हणणार्‍या स्त्री-पुरुषांची संख्या देशात वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 15 ते 49 वयोगटातील सुमारे ऐंशी टक्के महिला आणि 15 ते 54 वयोगटातील तेवढ्याच संख्येच्या पुरुषांनी आपल्याला किमान एक तरी मुलगी हवी, अशी इच्छा प्रदर्शित केली आहे. ‘मुलगा-मुलगी भेद नको’ असे मत मांडणार्‍यांचे प्रमाणही वाढत आहे.

शहरातील पंचाहत्तर टक्के व ग्रामीण भागातील ऐंशी टक्क्यांहून जास्त महिला मुलीच्या जन्माला प्राधान्य देऊ लागल्या आहेत. अक्षरशत्रू असलेले पुरुषही ‘मुलगी हवी’चा आग्रह धरत आहेत. समाजातील पुरुषी मानसिकता बदलत आहे, हेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील या निरीक्षणातून स्पष्ट होते. भारतीय समाजासाठी आणि समस्त स्त्रीवर्गासाठी ही काहीशी दिलासादायक बाब आहे.

मुलांच्या तुलनेत मुली तसूभरही कमी नसल्याचे विविध क्षेत्रांत सक्षमपणे काम करणार्‍या लेकी समाजाला पटवून देत आहेत. मुलगा नसलेल्या कुटुंबांतील ज्येष्ठांचा सांभाळ काही मुली आपुलकीने करीत आहेत. मुलींबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणार्‍या स्त्री-पुरुषांचे प्रमाण शंभर टक्क्यांवर पोहोचेल तेव्हाच मुला-मुलींमधील गुणोत्तर अपेक्षित पातळीवर स्थिरावू शकेल.

LEAVE A REPLY

*