Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या संपादकीय

अतिरेकामुळे पर्यटन धोक्यात

Share

 मंजिरी ढेर

 

ध्या पर्यटन व्यवसाय बराच बहरला आहे. ही चांगली बाब असली तरी पर्यटनस्थळांवर प्रचंड ताण येऊ लागला आहे. पर्यटकांच्या वाढत्या

संख्येमुळे पायाभूत सोयी-सुविधा पुरत्या

कोलमडून जात आहेत. प्रचंड कचरा, वाहतूक कोंडी, पाणी आणि विजेची कमतरता अशा समस्यांचा सामना पर्यटनस्थळी राहणार्‍या स्थानिकांना करावा लागत आहे. पर्यटकांना

सामावून घेण्यासाठी हॉटेल्सची संख्याही वाढू लागली आहे. परिणामी एकेकाळी हिरवाईने नटलेली पर्यटनस्थळे आता सिमेंटची जंगले होऊ लागली आहेत.  याच कारणामुळे परदेशातील बर्‍याच पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत, तर काही पर्यटनस्थळे काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात कास पठारावर फुललेली फुले बघण्यासाठी पर्यटक दाखल होतात. मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे इथल्या निसर्गसौंदर्याला घरघर लागली आहे. कास पठारावर फुलणार्‍या फुलांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. फुले पर्यटकांच्या पायांखाली चिरडली जाऊन काही फुलांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पर्यटनस्थळी गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. याचा त्रास स्थानिकांना होऊ लागला आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत असला तरी बर्‍याच गैरसोयींना सामोरे जावेे लागत आहे. डोंगर उतारांवरचे पाईन आणि ओकचे वृक्ष दिसेनासे झाले आहेत. रात्रीच्या प्रहरी निरभ्र आकाशातले तारे

मोजण्याचा, तारकांच्या मंद प्रकाशात निजण्याचा आनंद आता घेता येत नाही. कारण सगळीकडे हॉटेल्स आणि रिसॉर्टसची गर्दी झाली आहे. स्वच्छ, पारदर्शी पाण्याच्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या नद्यांमध्ये प्लॅस्टिक आणि इतर कचर्‍याचेे प्रमाण वाढताना दिसत आहे. रस्त्यांवर पर्यटकांच्या बसेस आणि गाड्यांची गर्दी झाल्यामुळे पर्यटनस्थळांचा श्वास घुसमटू लागला आहे.

हिमाचल प्रदेशमधले सिमला हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ. उन्हाळ्यात सिमल्याला जाणार्‍या पर्यटकांच्या संख्येत बरीच वाढ होते. एका आकडेवारीनुसार उन्हाळ्यात दररोज किमान पाच हजार वाहने सिमल्याच्या हद्दीत प्रवेश करतात. आठवड्याच्या शेवटी तर या संख्येत भरच पडते. ही वाहने उभी करण्याचा प्रश्न आ वासून उभा राहतो. जागा मिळेल तिथे वाहने पार्क केली जातात. याचा परिणाम वाहतुकीवर होतो. सुगीच्या काळात सिमल्यातल्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक तैनात केली जाते.

सिमला एकेकाळी प्रदूषणमुक्त होते. मात्र सध्या इथल्या प्रदूषणाच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे. थंड हवेचे ठिकाण असणारे सिमला जागतिक तापमानवाढीला बळी पडत आहे. ही अर्थातच धोक्याची घंटा आहे. मसुरीसारख्या सुंदर पर्यटनस्थळाची हीच अवस्था झाली आहे. इथल्या हिरवाईचे प्रमाण घटले आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये मसुरीने पाण्याचा तुटवडा अनुभवला. मसुरीमध्ये आजवर असे कधीच झाले नव्हते. उटीची निर्मिती फक्त दहा हजार लोकांसाठी करण्यात आली होती. याच कारणामुळे उटीची क्षमताही मर्यादित आहे. पण आज इथे सुमारे सव्वा लाख स्थानिक नागरिक आहेत. त्यातच दर महिन्याला येणार्‍या पर्यटकांमुळे समस्यांमध्ये भरच पडते.

पाण्याची आणि जागेची कमतरता जाणवू लागते. मोठ्या संख्येने येणार्‍या पर्यटकांना सामावून घेण्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्टस्ची गरज आहे आणि यासाठी इथली झाडे तोडली जात आहेत. यामुळे उटीमधला निसर्ग धोक्यात आला आहे.  महाबळेश्वरचेही व्यावसायिकरण झाले आहे.

इथे पर्यटनाचा अतिरेक झाला आहे.  महाबळेश्वरला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला दरवर्षी जवळपास साडेतीन लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे इथला निसर्ग धोक्यात आला आहे. स्थानिकही याबाबत तक्रारी करू लागले आहेत.

हे सगळे थांबवण्यासाठी फक्त पर्यटनस्थळाची प्र्रसिद्धी करून भागणार नाही तर इथल्या निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कठोर कायदे, त्यांची अंमलबजावणी तसेच पर्यटकांकडून पर्यटन कर वसूल केला तरच या ठिकाणांचे अस्तित्व टिकून राहील.

अन्यथा ही ठिकाणे वैराण व्हायला वेळ लागणार नाही.  पर्यटनाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या वेळी प्रसिद्ध ठिकाणे टाळणे योग्य ठरते. प्रत्येक जण जात असणार्‍या ठिकाणी आपणही जायला हवे हा अट्टाहास नको. फारशी गर्दी नसणारी वेगळी ठिकाणे निवडावीत. निसर्गाची हानी होईल असे काहीही करू नये.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!